डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! माझ्या एका मित्राकडे घरी कांदा आणि लसूण खाण्यावर कायमची बंदी. यामुळे हा पठ्ठ्या बाहेर मित्रांकडे गुपचुप कांदा – लसूण खायचा. माझ्या अन्य दोन व्यापारी मित्रांची मुले – सुना बाहेर लपून – छपून मांसाहार व मद्यपान करतात. घरी मात्र पूर्ण सोवळेपणा. अगदी कोल्ड्रिंक पिण्यावरही मनाई. म्हणजे प्रश्न असा उद्भवतो की कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान नि कोल्ड्रिंक्स न घेण्याचे “तत्वज्ञान” असे तकलादू कसे व का ठरते ? – की यांचे पालक त्यांना हवे ते संस्कार करण्यात कमी पडतात ? अथवा मुलांनाच हे तत्वज्ञान ‘भंपक’ वाटते ? किंवा याबाबतीतला पालकांचा ‘दुटप्पीपणा’ मुलांना आवडत नाही ! हा दुटप्पीपणा म्हणजे खानपानातील सोवळेपणा पाळणारी बरीच ढोंगी मंडळी करबुडवेगिरी करणार, भोंदू बाबांच्या अचाट आचरणासाठी देणग्या देणार, घरातील स्रियांना कस्पटासमान लेखणार, चातुर्वर्ण्यव्यवस्था पाळणार, भंपक कथांचा कपटी वापर करीत स्वतःचं वर्णश्रेष्ठत्व दाखवत राहणार, देशभक्तीच्या पुचाट वल्गना करणार इ.इ. यांची मुले आपल्या पालकांच्या आदरापोटी, भिती वा संकोचापोटी, आत्मविश्वासाच्या अभावापोटी उघडपणाने ‘सत्याचरण’ करण्यास धजावत नाहीत.
‘भंपकगिरी’ ही काही एकाच धर्माची मक्तेदारी नाही. चमत्कारांच्या संख्येवरून एखाद्या समाजसुधारकाला ‘संतपद’ दिले जाण्याची पद्धत प्रचलित आहेच. वैज्ञानिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सुधारकी धर्मातील विवेकवादी लोक संतपदाच्या अशा परिमाणांविरुद्ध पुरेसा आवाज उठवत नाहीत. ‘छोटा जिहाद’ म्हणजे अध्यात्मिकदृष्ट्या बाहेरील वैचारिक कुप्रथांशी संघर्ष करणे. ‘मोठा जिहाद’ म्हणजे मनातील षडरिपुंशी संघर्ष करणे. परंतु काही धर्मांधांनी या संज्ञांचा अर्थ वेगळाच लावला. अपरिग्रह, अस्तेय आणि अहिंसा यामधील फक्त दिखाऊ कर्मकांड करणारे मी खूप पाहिलेत. सामान्यजनांना विविध प्रकारे लुटत ‘माया’ जमवायची आणि याच मायेचा थोडा हिस्सा ‘दानधर्म’ केल्यागत याच सामान्यजनांवर खर्च करायची उदारता तर मी नेहमीच पाहतो. सुदैवाने या सामान्यजनांच्या तरुण पिढीला हे अश्लाघ्य खेळ आता कळू लागले आहेत. चातुर्वर्ण्याला न मानणाऱ्या महात्म्याचे वारसदार ‘शिवतत्वा’शी एकरुप होण्याची प्रक्रिया एकाबाजूला राबविताना दुसऱ्या बाजूला मोठ्या सामाजिक कलहात गुंतलेले असतात. विवेकाच्या मार्गाने जिवंतपणीच ‘निर्वाण’ मिळवू शकतो असा श्रेष्ठ उपदेश देणाऱ्या गुरुचे बरेच शिष्य कालच्याच अंधश्रद्धा आजही पाळताना दिसतात. या सर्व गोष्टी बारकाईने पाहू गेल्यास एक साधा निष्कर्ष दुर्दैवाने निघतो की बरेच अनुयायी त्या त्या तत्वज्ञानाचा पराभव स्वतःच्या स्वार्थासाठी करीत असतात. हा पराभव कधी लबाडीतून केलेला दिसतो तर कधी तो मूर्खपणाचे प्रदर्शन ठरत असतो.
संस्कारांनाच संपत्ती समजणाऱ्या संतांना, महात्म्यांना आणि समाजसुधारकांना सोन्याच्या मुकुटाने सजविणारे तथाकथित भक्त एकतर अत्यंत लबाड असतात किंवा टोकाचे मूर्ख असतात. विरक्तभाव बाळगणाऱ्या संतांना ‘आसक्तीची चिन्हे’ का आवडतील ? – असा साधा विचारही सामान्यजनांच्या मेंदूस शिवत नाही कारण यांच्या मनावर विवेकाचे नियंत्रणच नसते. भक्तांचे लबाड म्होरके एक नेहमीचं विधान करीत असतात – “अहो, प्रेमापोटी भक्तगणच सोन्याचा मुकुट गुरुमाऊलीला अर्पण करतात.” अशा उदात्त प्रेमाबद्दलच्या विधानाने मग भक्तगणही चित्तविभोर होऊन जातात. सोने – हिरे – माणके – चांदी इत्यादी जिन्नसांना विवेकी व विनम्र विरोध करणाऱ्यांना ‘नास्तिक’ ठरवणे निर्बुद्धांच्या गर्दीत सहजशक्य असते. विरक्तीचं तोंडदेखलं कौतुक करीत आसक्तीत शिताफीने रमणाऱ्या कुटीलकंपूस जोपर्यंत सामान्यजन ओळखत नाहीत तोपर्यंत संतांचं ‘सुवर्णमुकुट’ पुढे करीत जगणाऱ्या बांडगुळांचा बंदोबस्त होणार नाही.
अध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या आवरणाखाली अब्जावधीची संपत्ती बाळगणाऱ्या एका बाबाचे अनुयायी अत्यंत निष्ठेने त्याच्या मरणानंतरही आपली भक्ती चालू ठेवतात तेव्हा मला निरागस भक्तांची खूप कीव येते. या भक्तांमध्येसुद्धा नव्वद टक्के भाबडे असतात आणि यांना वापरणारे दहा टक्के लबाड असतात. दुसऱ्या एका बापूच्या कुटुंबियांमध्येच बापूच्या मरणानंतरची इस्टेट आणि भोळ्या अनुयायांचं नेतृत्व करण्यावरून मारामाऱ्या चालू आहेत. अनुयायांना साधा प्रश्न पडत नाही की “बापूंच्या शिकवणीचा – संस्कारांचा हा पराभव आहे की बापूंच्याच काही मर्यादा होत्या ?” अशाच दुसऱ्या एका आचार्याचे शिष्य असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांमधील ‘सांपत्तिक कलह’ आचार्य सोडवत नाहीत. हे तथाकथित आचार्य स्वतःच्या समाजातील प्रश्नांना धाडसाने व विवेकाने भिडत नाहीत. म्हणजे तत्वज्ञानाच्या बाबतीत “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?”
मला आठवतं, काही वर्षांपूर्वी भारतातील एका बलाढ्य व प्रभावशाली उद्योगपतीने एक मजेशीर विधान केलं होतं – “जग हे माया आहे !” या लबाडीच्या (की मूर्खपणाच्या ?) विधानावर मी खूप हसलो होतो. “ब्रम्ह सत्य, जगत् मिथ्या”च्या धर्तीवर हे विधान होतं. बरेच उद्योगपती, राजकारणी व बरेच अध्यात्मिक नेते हे एकमेकांच्या सहकार्याने भाबड्या जनतेला ‘टोप्या’ लावत असतात. सतत निश्क्रीय, निस्तेज व निष्काळजी ठेवणारे तत्वज्ञान हे लोक खुबीने प्रसवत राहतात, जेणेकरून निरागस जनतेने अन्यायी – कपटी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करु नये. ही गोंधळात टाकणारी नि बेसावध ठेवणारी विधाने भाकड कथांमधून ही मूर्ख जनता तन्मयतेने दूरचित्रवाणीवर पहात राहते. अशाप्रकारे ‘मेडिया’चा मालक असलेला उद्योगपती लोकांना ‘ऐंगेज’ ठेवत स्वतःची माया वाढवत राहतो, राजकारणी या उद्योगपतीचं भलं करताना त्याच्याच भ्रष्ट पैशाने निवडणुका जिंकत राहतो नि अध्यात्मिक नेता आपला गोतावळा, प्रसिद्धी, सामर्थ्य आणि संपत्ती वाढवत राहतो. अनुयायांसाठी मात्र ‘जग माया आहे!’ या तिघांची ‘पब्लिक स्क्रुटिनी’ निस्पृहपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाबड्या जनतेला व मूर्ख अनुयायांना यांचं खरं तत्वज्ञान कळणार नाही. यांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलं की कारणावर कारणे सांगून हे अशी चर्चा टाळणार किंवा आव्हान देणाऱ्याची ‘औकात’ आहे का, असा प्रश्न यांचे लबाड चेले विचारणार !
एक असेच गमतीशीर आचार्य आपल्या एका भक्ताकडे मुक्कामास गेल्यानंतर त्यास म्हणाले, “आज संध्याकाळी माझ्यासाठी पाणीपुरी बनवा. रस्त्यावर उभं राहून सामान्य लोकांप्रमाणे मी पाणीपुरी खाऊ शकत नाही.” आता आचार्य असले म्हणून काय झाले, नश्वर देहाला पाणीपुरीचा मोह होणे अगदीच नैसर्गिक आहे. जे नैसर्गिक व नैतिक आहे, त्यास नाकारण्याने लपतछपत पाणीपुरी खावी लागते ! अर्थात हा सगळा भंकस खटाटोप यासाठी की अनुयायांना सांगता यावं, “मी सर्व शारीरिक गरजांच्या पलिकडे गेलो आहे!” – असतात मात्र हे ‘अलिकडे’च ! दुसऱ्या एका चमत्कारी बाबाचे बलशाली चेले पद्धतशीरपणे एक विधान करीत रहायचे, “आमचे बाबा दोन पातळ्यांवर वागत असतात – दैवी पातळी आणि मानवी पातळी”. म्हणजे प्रवचन देताना, दक्षिणा घेताना, बोगस चमत्कार करताना व भक्तांचा भक्कम नमस्कार घेताना हे ‘दैवी’ पातळीवर. सामाजिक समस्या सोडवता येत नसल्याने हे लगेच ‘मानवी’ पातळीवर येणार ! बाकी अशा ‘नालायक’ तत्वज्ञानाची हुबेहूब नक्कल करीत नंतरच्या काळात आणखी काही बाबा प्रगटले व प्रसरण पावले. थोडक्यात निष्कर्ष असा की ‘लबाड आस्तिक’ (जे खरे आस्तिक नसतातच) हे बहुसंख्येने असणाऱ्या ‘भोळ्या आस्तिकां’ना लुबाडत राहतात. ‘नास्तिकां’ना ते लुबाडू शकत नाहीत कारण लबाड आस्तिकांचं आणि त्यांच्या तितक्याच लबाड गुरुचं बेगडी तत्वज्ञान नास्तिकांना माहीत असतं. अर्थात “सजग आस्तिक” अशा नालायक आस्तिकांपासून कोसो दूर रहातात !
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.