मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुका २०२२साठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अनेक सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जारी केले आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे सर्व सर्वेक्षणांनी म्हटले आहे. काही सर्वेक्षणांमध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, एक्झिट पोलचे अंदाज हे नेहमीच अचूक नसतात. अनेक वेळा असेही घडले आहे जेव्हा एक्झिट पोलचे दावे खोटे ठरतात.
एक्झिट पोलचे दावे कधी, कुठे आणि केव्हा खोटे आणि खरे ठरले हे जाणून घ्या…
- २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर, या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल अयशस्वी ठरले होते.
- या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकून नवा विक्रम रचला.
- तर, भाजपच्या ३ जागांवर घट झाली. तर काँग्रेसचे खातेही उघडले नाही.
- तसेच, २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल बरोबर सिद्ध झाले होते.
- २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही अनेक एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले होते.
- निवडणुकीच्या निकालापूर्वी अनेक वाहिन्या आणि एजन्सींनी बिहारमध्ये महाआघाडी म्हणजेच आरजेडी-काँग्रेस आघाडी सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता, परंतु, निवडणुकीचे निकाल येताच बिहारमध्ये जेडीयू-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले.
- २०१७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही बहुतांश एक्झिट पोल चुकीचे ठरले.
- निवडणूक निकालात भाजप बहुमताच्या जवळपास पोहोचू शकेल असा दावा अनेक एजन्सींनी केला होता. पण, निकाल आल्यावर भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाले.
पश्चिम बंगाल २०२१च्या निवडणुकीत उतार-चढाव!
- २०२१मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये बरेच चढ-उतार दिसले.
- बंगालच्या निवडणुकीत अनेक यंत्रणांनी भाजपला बहुमत दिले होते.
- काही वृत्तसंस्थांनी भाजपला १४७ जागा आणि टीएमसी १४३ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. तर एका एका टीव्ही एजन्सीने भाजपला १९२ जागा जिंकल्याचा दावा केला होता. पण, निकाल आल्यावर एक्झिट पोल अयशस्वी ठरले आणि भाजपच्या ७७ जागा कमी झाल्या. तर, टीएमसीने पुन्हा सरकार स्थापन केले.
हरियाणा विधानसभा निवडणूक २०१९मधील सर्वेक्षणापेक्षा वेगळा निकाल
२०१९ हरियाणा विधानसभा निवडणुकीत, निकालाच्या दिवशी, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, बहुतेक वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षणांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे दिसून आले. मात्र, राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला प्रचंड बहुमत मिळत असल्याचा दावा पोलमध्ये करण्यात आला होता, जो चुकीचा ठरला आणि काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावाही करण्यात आला, मात्र याउलट काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळवता आला.
नवी दिल्लीत मनपात एक्झिट पोल खरे ठरले!
नवी दिल्लीतील चार मनपांचं एकत्रिकरण करून भाजपाने एक मोठी मनपा तयार केली. आधीच्या मनपांमध्ये भाजपाची सत्ता होती. या मोठ्या एकत्रित मनपामध्ये आपचा विजय होईल, भाजपाला सत्ता गमवावी लागेल, असे अंदाज एक्झिट पोल्समध्ये व्यक्त झाले होते. ते आज खरे ठरले. आपने राज्याच्या सत्तेप्रमाणेच मनपाचीही सत्ता गमावली.