मुक्तपीठ टीम
कोरोनाचं विघ्न आहे. आजही संसर्गाची भीती आहे. तरीही बाप्पाचा उत्सव उत्साहात साजरा होणारच होणार. अर्थातच बाप्पा बुद्धीचीही देवता. त्यामुळे कोरोनाची बंधनं पाळण्याची सुबुद्धी वापरतच. मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरु आहे. मूर्तींचा दिमाख वाढवला जात आहे. तर घरोघरीही भक्तांमध्येही उत्साह दिसतोय. काही घरांमध्ये छोटे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती साकारत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून काही गणेशभक्त आपल्या कलेच्या माध्यमातूनही उत्सवची रंगत वाढवतात. घरातील लहानग्यांच्या कोवळ्या मनावर चांगले कलासंस्कार करण्याबरोबरच भक्ताच्या मार्गावर त्यांना नेतात. अशा घरांमध्ये शाडूच्या मातीनं गणरायाच्या मूर्ती घडवण्याचं काम चिमुकल्या हातांनी चालतं.
सोलापूरमधील निरज महामुरेंनी त्यांच्या लेकींचे व्हिडीओ पाठवलेत. पहिलीतील स्वरा (१ली) आणि तिसरीतील मृणाल या दोघींची तन्मयता कौतुक करावी अशीच. विषेष म्हणजे त्यांनी वापरलेले रंगही साधे जलरंग आहेत. कोरोनाचं विघ्न असलं तरी त्यावर संयमानं उत्साहात मात करत प्रसन्नता दरवळणार एवढं नक्की!