गजानन जानभोर / व्हाअभिव्यक्त!
आई- बाबांचे पोर्ट्रेट करावे, असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. निरंजन गोहणे या प्रथितयश आर्टिस्ट बद्दल ऐकले होते. त्यांची भेट घेतली आणि विनंती केली.
निरंजन सतत व्यस्त असतात. कधीकाळी आयटी क्षेत्रात काम करणारा हा तरुण आज आर्टिस्ट म्हणून नावारूपास आहे. देश- विदेशातून त्याच्याकडे कामांचा ओघ असतो. या व्यापात त्याला आपल्यासाठी वेळ मिळेल का?
काहीशी धाकधूक होती. परंतु निरंजनने मान्य केले.
बाबा अलीकडेच गेले, आई आठ वर्षांपूर्वी… बाबांची छायाचित्रे जवळ होती. अडचण आली आईच्या छायाचित्राची … कारण ती बरीच वर्षे आजारी, अंथरुणाला खिळलेली. तिचा एक खूप जुना, काहीसा धुंदरट फोटो होता. निरंजनच्या हातात तो ठेवला. तो काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याची अडचण लक्षात आली.
निघताना फक्त एवढेच म्हणाला, ‘ बाबांचे पोर्ट्रेट ठीक आहे पण आईचे आव्हानात्मक आहे. ‘ मी देखील काहीसा प्रश्नार्थक होतो. निरंजनला बरे वाटावे म्हणून म्हणालो, ‘ तुम्ही सवडीने द्या, काहीच घाई नाही‘
मला उत्सुकता लागलेली आणि काहीशी हुरहूर सुद्धा…. परवा निरंजनचा फोन आला. ‘ पोर्ट्रेट तयार आहे, या‘… मी पळत त्याच्या घरी गेलो. नागपूरला शिकत असताना आई- बाबांना भेटायला जाताना सुरुवातीला अशीच ओढ असायची….
त्याच्या घरात दोन्ही पोर्ट्रेट ठेवलेले. मी निस्तब्ध उभा… निरंजन म्हणाला, ‘ तुझी आई खूप धार्मिक पण रोखठोक स्वभावाची होती का? मी हसलो… पोर्ट्रेटमध्ये ते सारे प्रतिबिंबित झाले होते. मला या प्रतिभावंत आर्टिस्टचे कौतुक वाटले.
प्रत्येक कलावंत हा परमेश्वराचा दुत असतो. तो निर्मिक असतो, ही माझी भावना आहे. त्या दिवशी नव्याने अनुभुती आली.
न पाहिलेल्या, एरवी सामान्य असलेल्या दिवंगत व्यक्तीचे चित्र काढताना निरंजनला किती कष्ट पडले असतील? त्यावेळची त्याच्या मनातील आंदोलने, ते पूर्ण होईपर्यंत मनातील घालमेल…. नंतरचे समाधान…. आपण नाही ओळखू शकत… तेवढी पात्रताही आपल्यात नाही. म्हणूनच तो कलावंत आहे.
आता माझे बाबा जिवंत झाले आणि आईने पुन्हा जन्म घेतला आहे ….
निरंजन….. तुझे माझ्यावरचे हे ऋण.
(गजानन जानभोर हे मुक्त पत्रकार असून राजकीय – सामाजिक विश्लेषक आहेत.)
ट्विटर: @gajananjanbhor