मुक्तपीठ टीम
एक सुंदर डोंगर,भरगच्च हिरवीगार झाडी,रंगीबेरंगी फुलांचे ताटवे,वेगवेगळे पशूपक्षी, डोंगरावर पायथ्याशी झुळझुळ वाहणारं पाणी, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे ठिकाण पहायचं असेल तर जालना शहराजवळील पारशी टेकडी ला नक्कीच भेट द्यायला हवी. ती या साठी की, २०० एकर च्या क्षेत्रावर हे सगळं फुलवताहेत जालनेकरांचेच हात.
जालना हे औद्योगिक शहर.स्टील सिटी म्हणून ओळख असलेल्या या शहराला दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी यातना भोगाव्या लागतात. त्यासाठी आणि शहरातील प्रदूषणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी जालन्यातील कुंडलिक सिना नदी पूनुरुज्जिवन अभियान, समस्त महाजन ट्रस्ट,जालना शहरातील उद्योजक,पर्यावरण प्रेमी एकवटले आणि त्याचा परिणाम म्हणून शहरातील दोन्ही नद्या साफ करण्यात आल्या.नदीतील गाळ, कचरा,काटेरी झाडे काढून नदीचे पात्र स्वच्छ झाल्यावर तिथे ७ हजार ५०० बांबुच्या रोपांची लागवड करण्यात आली.आता हा मोर्चा वळला आहे वृक्ष लागवडी कडे.
जालना शहरालगतच्या २०० एकर च्या पारशी टेकडीवर आता दर रविवारी नागरीक जमू लागले आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊ लागली आहे.आजच्या रविवारी तर कृषी विज्ञान केंद्रातील आपली शाळा मधील विद्यार्थ्यांनी पारशी टेकडी वरील खड्यांमध्ये सिड बॉल ची पेरणी करून या उपक्रमात सहभाग घेतला.अश्या सर्व लहान मोठ्या घटकांच्या सहकार्याने जालना शहरात डोंगर संवर्धनाचे कार्य सुरू झाले आहे.समस्त महाजन मुंबईच्या माध्यमातून नागेवाडी अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरातील अतिशय विस्तीर्ण आणि भव्य डोंगर संवर्धनासाठीच्या कामाची सुरूवात १३ जानेवारी २०२२ रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डाॅ विजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.केशव सृष्टी मुंबई ही संस्था, HDFC लाईफ कंपनीच्या माध्यमातून पर्यावरण पुरक २००० वृक्षांचा घनवन प्रकल्प इथे साकारला जात आहे. सुरुवातीला या टेकडीवर चर खोदून घेण्यात आले,त्यामुळे टेकडी वर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता आता तिथेच आडवले व जिरवले जात आहे.पाणी आडवण्याच्या, जिरवण्याच्या कामा सोबतच कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाने या टेकडी वर वनराई बहरू लागली आहे.आता पावसाला सुरुवात झाल्याने लाखो वृक्षांसह हा संपूर्ण परिसर सुंदर आणि समृद्ध होत आहे.
आपले शहर स्वच्छ, सुंदर हरित करून मोकळा श्वास घेण्यासाठी जालना शहरातील पर्यावरण प्रेमी ही धडपड करत आहे.त्या दृष्टीने शहरातील कलावंत पथनाट्यसादर करून लोकजागृती करत आहेत.शहरातील नागरिकांना पाणी वाचवणे,वृक्ष लागवड यांचे महत्व समजावून सांगत आहेत त्यामुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पारसी टेकडीच्या संवर्धनासाठी पुढे झाले आहेत.येत्या दिवसात पारसी टेकडी पर्यटनाचे केंद बनेलच शिवाय ही चळवळ शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मैलाचा दगड ही बनेल.
वृक्ष लागवड,संवर्धनाच्या जनजागृतीसाठी पारसी टेकडीवर आता सहली चे आयोजन केले जात आहे.
एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणाऱ्या पारसी टेकडीवर वृक्षारोपनासह विविध उपक्रम सुरू आहेत. यामध्ये सर्व घटकांचा हातभार लागावा म्हणून शाळांना सहभागी करून घेतले जात आहे.पारसी टेकडी परिसरात वृक्षलागवड केली जात आहे. शिवाय सुशोभिकरणही हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी विद्याथ्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून दर रविवारी विद्याथ्यांची सहल येत आहे,त्यामुळे आपोआप विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव निर्माण होत आहे व भविष्यात मुले सजग बनण्यास मदत होणार आहे.