मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा झाली. यावेळी प्रथमच मोठ्या राज्यांपासून छोट्या राज्यांपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीला भलतेच महत्व आले आहे. कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे, त्याचा ‘मुक्तपीठ’नं घेतलेला आढावा:
रणभूमी – १
बंगालमध्ये वाघीण की कमळ फुलणार?
ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपाने बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अर्धेअधिक केंद्रीय मंत्रिमंडळ लढाईत उतरवले. भाजपाने तेथे संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. ममतांच्या पक्षातही फोडाफोडी झाली. आता एमआयएमच्या औवेसींचाही बंगाली राजकारणात प्रवेश झाला. लोकसभेला चांगलं यश मिळवणारी भाजपा बाबू मोशायना आपलेसे करून विजयाचा रोसगुल्ला चाखते की पुन्हा बंगालची वाघीण हिलसा माशांना आपल्याच ताब्यात ठेवते, हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
रणभूमी -२
आसाममध्ये भाजपा सत्ता टिकवणार?
इतिहासात पहिल्यांदाच आसामात भाजपाची सत्ता आली. आता भाजपा ती सत्ता टिकवते की काँग्रेसच्या हातावर एनआरसी वादामुळे सत्तारेषा उमटते, ते या निवडणुकीत स्पष्ट होईल.
रणभूमी – ३
तामिळनाडूत भाजपाचे मित्र की शत्रू?
तामिळनाडूत एकदा द्रमुक तर एकदा अण्णा द्रमुक असे प्रादेशिक पक्ष सत्तेवर असतात. यावेळी अण्णा द्रमुक सत्तेत आहे. पण जयललितांनंतर कोणतेही समर्थ नेतृत्व नाही. सत्तेत असलेले नेते प्रथमच भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या ‘हो’ला हो करणारे आहेत. ते पुन्हा परततात की स्टॅलिन यांचा द्रमुक सत्ता मिळवतो, एवढाच प्रश्न असेल. पण त्यात भाजपचं तामिळ राजकारणातील पुढची वाटचाल ठरेल. कारावासातून परतलेल्या शशिकलांचा फॅक्टरही महत्वाचा ठरू शकतो का, तेही स्पष्ट होईल.
रणभूमी – ४
केरळ डावीकडून उजवीकडे वळणार?
सध्या केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर आहे. भाजपाने हिंदूंमतांचं शबरीमलासारख्या मुद्द्यांवर ध्रुविकरणाचा प्रयत्न केला. मेट्रोमॅन श्रीधरनना वयाच्या नव्वदीत पक्षात आणून मोठा डाव खेळला. आजवर कम्युनिस्टांची डावी किंवा काँग्रेसची धर्मनिरपेक्ष वाट निवडणारा केरळचा मल्याळी मतदार आता थेट उजवीकडे वळणार का? हे या निवडणुकीत दिसेल.
रणभूमी – ५
पुद्दुचेरीत फुटकी काँग्रेस परतणार?
पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचे व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. काँग्रेसचे आमदार फुटल्याने सरकार अल्पमतात आले. नारायण सामी यांना राजीनामा द्यावा लागला. तेथे सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे. नेमक्या त्याच वेळी राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर होते. दौरा चर्चेत आला, पण सरकार गेले. आता आमदार फुटल्यानंतर जनता सत्ता पुन्हा हातात देते की नाकारते, हे कळेल.