मुक्तपीठ टीम
आंबा कुणाला आवडत नाही. साधं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मन कधी भरतच नाही. अविट गोडी असतेच तशी आंब्याची. आता हाच आंबा जर वर्षभर मिळाला तर? मज्जाच ना. आता प्रत्यक्षात तसं शक्य आहे. राजस्थानातील शेतकरी श्रीकृष्ण सुमन यांनी आंब्याचे वर्षभर फळ येणारे एक नवे कलम विकसित केले आहे.
श्रीकृष्ण सुमन यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या कलमाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आंब्याच्या फळांना होणार्या आजार आणि इतर त्रासांपासून मुक्त आहे. याची फळे जास्त गोड असतात. या आंब्याचा प्रकार लंगडा आंब्याप्रमाणे आहे. हे एक छोटे कलम आहे, त्यामुळे ते कोणत्याही बागेत लागवड करण्यासाठी देखील योग्य आहे. त्याचे झाड दाट आहे आणि काही वर्षांपर्यंत याला कुंडीतही लावले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, हा आंबा गडद केशरी रंगाचा आणि चवीला गोड आहे. हा आरोग्यासाठीही उत्तम आहे.
आंब्याचा हा नवीन प्रकार विकसित करणारे शेतकरी श्रीकृष्ण यांनी इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शाळा सोडली. त्यांनी माळी म्हणून त्यांनी कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. त्यांना फुले आणि फळांची लागवड करण्यात रस होता, परंतु त्यांचे कुटुंब फक्त गहू आणि इतर धान्याचे पीक घेत असत. गहू आणि तांदळाचे चांगले पीक घेण्यासाठी पाऊस, जनावरांच्या हल्ल्यापासून बचाव आणि अशाच प्रकारच्या गोष्टींवर अवलंबून रहावे लागते हे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यातून मर्यादित उत्पन्न मिळवणे शक्य होते. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी फ्लोरीकल्चर सुरू केले. प्रथम त्यांनी गुलाबांच्या विविध प्रकारांची लागवड केली आणि ती बाजारात विकली. त्याचबरोबर त्यांनी आंब्याची झाडेही लावायला सुरुवात केली.
सन २००० मध्ये त्यांनी आपल्या बागेत एक आंब्याचे झाड पाहिले ज्याच्या वाढीचा वेग खूप वेगवान होता. ज्याची पाने गडद हिरव्या रंगाची होती. त्यांच्या लक्षात आले की हे झाड वर्षभर बहरलेले असते. हे पाहिल्यानंतर त्यांनी आंब्याच्या झाडांचे पाच गट तयार केले. या कलमांना विकसित करण्यासाठी त्यांना १५ वर्षे लागली. त्यादरम्यान त्यांनी कलमातून तयार झालेल्या रोपांचे जतन केले. त्यांना आढळले की, कलम लावल्यानंतर दुसऱ्या वर्षापासूनच झाडाला फळ येण्यास सुरुवात झाली.
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणजेच एनआयएफ इंडियानेही या नवीन प्रकारास मान्यता दिली. एनआयएफ ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. एनआयएफने इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च (आयआयएचआर), बंगळुरू यांना या कलमाची साइट मूल्यांकन करण्याची परवानगी दिली. त्याशिवाय राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या एसकेएन कृषी विद्यापीठानेही तिची फील्ड टेस्टिंग केली होती. आता शेतकरी हक्क संरक्षण अधिनियम आणि आयसीएआर- नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेज (एनव्हीपीजीआर) नवी दिल्ली अंतर्गत या कलमाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात मुगल गार्डनमध्ये सदाहरित आंबा कलम लावण्यास एनआयएफने सहकार्य केले आहे. श्रीकृष्ण सुमन यांना सदाहरित आंब्याचे कलम विकसित करण्यासाठी एनआयएफचा नववा राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन आणि पारंपारिक ज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि इतर अनेक मंचांवरही त्यांची ओळख आहे. देशभरातून तसेच अन्य देशांकडून ८,००० हून अधिक आंबा कलमांची ऑर्डर मिळाली आहे.
पाहा व्हिडीओ: