मुक्तपीठ टीम
जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक म्हणजेच सध्याच्या मेटाने नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतात १३ उल्लंघन श्रेणींमध्ये फेसबुकवरील १.६२ कोटींपेक्षा जास्त कंटेंटवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात सामायिक केलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने महिन्याभरात १२ श्रेणींमध्ये ३२ लाखांपेक्षा जास्त कंटेंटवर कारवाई केली.
या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात व्हॉट्सअॅपचे ५३ कोटी, फेसबुकचे ४१ कोटी आणि इंस्टाग्रामचे २१ कोटी यूजर्स आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला लागू झालेल्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने म्हणजेच जिथे पाच लाखांहून अधिक यूजर्स आहेत तिथे दर महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे.
या अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईची माहिती आहे. त्यात स्वयंचलित निरीक्षणाद्वारे काढलेल्या कंटेंटची माहिती देखील समाविष्ट आहे.
आयटी क्षेत्रातील नवीन नियम
- २५ मे २०२१ पासून देशात नवीन आयटी नियम अस्तित्वात आले आहेत.
- या अंतर्गत, सोशल मीडिया कंपन्यांना यूजर्सच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे.
- नवीन आयटी नियमांनुसार, ५० लाख यूजर्स असलेल्या मोठ्या सोशल मीडिया मध्यस्थांना तक्रार अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागतील.
- या पदांवर नियुक्त करण्यात येणारे अधिकारी भारतातील रहिवासी असावेत.
- नियम न पाळणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांवर अपराधिक कारवाई केली जाऊ शकते.