बंधू / मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र म्हटलं की आपला श्वास, आपला ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच! त्यांचे गड – किल्ले म्हणजे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनमोल ठेवा. त्यामुळेच ते प्रेरणादायी वैभव जपण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांचा ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत असते. तळमळीनं प्रसंगी स्वत:च्या खिशातून खर्च करत या तरुणाईनं सळसळणारी संस्था गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन यासाठी सतत-अविरत-अथक प्रयत्नरत असते.
नुकतीच त्यांनी बजावलेली कामगिरी रामशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वार बसवण्याची. श्रमिक गोजमगुंडे यांचं “सह्याद्रीचा प्रत्येक दुर्गसेवक हा भगव्याशी प्रामाणिक आहे म्हणूनच त्याची घट्ट नाळ ही सह्याद्रीशी जोडली गेली आहे” हे ट्वीट बरंच काही सांगणारं. त्या भूमिकेतून ते आणि इतर सर्व दुर्गसेवकांनी किल्ले रामशेजच्या प्रवेशद्वाराचीही मोहीम फत्ते केली.
किल्ले रामशेजवर बसवण्यासाठी दोन प्रवेशद्वार किल्ल्यावर घेऊन जाणे सोपे नव्हते. ६५ दुर्गसेवकांनी निर्धारानं जोर लावला आणि
दोन दरवाजांचे ४ भाग अवघ्या २८ मिनिटात रामशेजवर पोहचले. १७ एप्रिलला प्रवेशद्वार बसवण्याचा सोहळा पार पडला. त्या सोहळ्यास पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका केलेले अभिनेते दुर्गार्पण सोहळ्यास उपस्थित होते.
रामशेज किल्ल्याचा इतिहास…
इतिहासात रामशेज किल्ल्याची नोंद छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंजेबाच्या बलाढ्य फौजांशी दिलेल्या टक्करीसाठी आहे. जास्त बळ आणि साधनं नसतानाही केवळ स्वराज्य रक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी किल्ला लढवला.
किल्ल्याला रामशेज नाव का?
- रामशेज किंवा रामसेज म्हणजे श्री रामचंद्रांचं शयनस्थान.
- वनवासाच्या काळात श्रीरामांनी या किल्ल्याच्या जागेला आपलं शयनस्थान बनवलं होतं, अशी आख्यायिका आहे.
- त्यामुळे सेज किंवा शेज म्हणजे पलंग अशा अर्थानं किल्ल्याच्या जागेला रामशेज असं नाव पडलं असावं.
रामशेज नेमका कुठे आणि कसा?
- नाशिक जिल्ह्यातील हा किल्ला नाशिक शहरापासून साडेचौदा किमी अंतरावर आहे.
- हा किल्ला सिन्रर तालुक्यात नाशिक – पेठ मार्गावरील आशेवाडी गावाजवळ डोंगरमाथ्यावर आहे.
- हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
- समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३ हजार २७३ फुट उंचीवर आहे.
- किल्ल्यावर गुहेमध्ये असणारे श्री रामाचे मंदिर, देवीचे मंदिर, पाण्याचे टाके तसेच कुंड आहे.
पाहा व्हिडीओ: