मुक्तपीठ टीम
निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते.
राजीव कुमार म्हणाले, तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल.
निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, तृतीयपंथीयांची संख्या सुमारे ५ लाख आहे. तथापि, केवळ १० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. त्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जात, धर्म, लिंग आदी कशाही आधारे भेदभाव होणार नाही याची हमी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातदेखील ही तरतूद असल्यामुळे तृतीयपंथीयांनाही मतदार नोंदणी, निवडणुकीत भाग घेण्यास कोणतीही समस्या येणार नाही, त्याबाबत आयोग अधिक प्रयत्न करेल. राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याबाबत निवडणूक आयोग निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.
यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
बैठकीत मानीनी मोहिते, डॉ. सान्वी जेठवाणी, दिशा पिंकी शेख, माया अवस्थी, माया शेख, मयुरी आवळेकर आदींनी समस्या, अडीअडचणी मांडल्या तसेच विविध सूचना केल्या.
निवडणूक साक्षरता मंच आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद
तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच ‘वुई फौंडेशन’च्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. साक्षरता मंचांकडून मतदार जागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांदरम्यान येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तांत्रिक आणि अन्य सहकार्याविषयी त्यांनी सदस्य आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली.