मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदर वाढल्याने तो कमी करण्यासाठी नक्की काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आज ठाणे पालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एका खास व्हीसीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी बोलून याबाबत नक्की काय करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर लोकं मृत्युमुखी पडली. ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली. ठाणे शहरातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या चर्चेत सहभागी होऊन अनेक सूचना दिल्या.
राज्यात अजूनही ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीर इजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील. त्यासोबतच खासगी रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन मिळाला तर ऐनवेळी रुग्णांना हलवण्याची वेळ येणार नाही, असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
त्यातही अनेकदा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यावर मानसिकरित्या खचल्याने तो लवकर जातो असं निरीक्षण काही डॉक्टरांनी नोंदवल. त्यावर उपाय म्हणून या रुग्णांच मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याची सूचना मांडण्यात आली. यावर ठाणे ग्लोबल कोरोना सेंटरमध्ये अशी सुविधा उपलब्ध असली, तरीही खाजगी रुग्णालयात अशी सेवा उपलब्ध नाही. तिथे ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर विचार करण्याच्या सूचना शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली.
उपचारपद्धतीसोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी अनेक डॉक्टरांनी लावून धरली. याबाबत केंद्राला विशेष विनंती करून राज्याला आपली मार्गदर्शक तत्व तयार करून वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी मिळावी अशी सूचना काही प्रमुख डॉक्टरानी केली. त्यासोबत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने तत्पूर्वी बहुतांश लोकांचं लसीकरण पूर्ण करून तिसऱ्या लाटेला आळा घालण्यास प्राधान्य द्यावं असंही या डॉक्टरांनी सुचवलं. यावर ही मागणी योग्यच असून आपण मंत्रिमंडळ बैठकीत ती नक्की मांडू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.
दिवसरात्र काम करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टराना कोरोनाची बाधा झाल्यास त्याला उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली जाणार नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच आवाहन त्यांनी या डॉक्टराना केलं. यावर कोरोनाच्या गंभीर समस्येतून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास सगळ्यांनी मिळून व्यक्त केला.
या बैठकीला कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. संतोष कदम, पालिकेतील वैद्यकीय अधिकारी, उपायुक्त आणि शहरातील नामवंत डॉक्टर या बैठकीला उपस्थित होते.