मुक्तपीठ टीम
भारतात जिकडे पाहावं तिकडे ईडीची कारवाई सुरू आहे. राजकीय हेतूचे आरोप होत असले तरी काहीही संशयास्पद वाटल्यास ईडीची धाड पडतेच पडते, असंच मानलं जातं. सध्या भारताच्या परकीय चलन नियमन कायदा म्हणजेच फेमा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चीनी मोबाईल निर्माता शाओमीच्या बँक खात्यात जमा केलेली ५ हजार ५५१ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ईडीने ही माहिती दिली.
ईडीच्या विधानानंतर, शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एका प्रेस रीलिझमध्ये म्हटले आहे की, देशातील त्यांचे ऑपरेशन्स स्थानिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. डायरेक्टरेटने शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर ही कारवाई केली आहे.
५ हजार ५५१ कोटी रुपये जप्त
- शाओमी इंडिया एमआय ब्रँड अंतर्गत भारतात मोबाईल फोनची विक्री आणि वितरण करते.
- ईडीने चीनच्या शाओमी ग्रुपची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या शाओमी इंडियाच्या बँक खात्यांमध्ये पडून असलेली ५ हजार ५५१ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
- फेमा कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शाओमीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतासाठी वचनबद्ध ब्रँड म्हणून, आमचे सर्व ऑपरेशन्स स्थानिक नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा बारकाईने अभ्यास केला. आमची रॉयल्टी देयके आणि बँकेला दिलेले तपशील वैध आणि खरे आहेत. शाओमी इंडियाने भरलेली रॉयल्टी आमच्या भारतीय प्रकारातील उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्या इन-लायसेंस तंत्रज्ञान आणि आयपीसाठी होती. कंपनीसाठी अशी रॉयल्टी भरणे ही कायदेशीर व्यावसायिक व्यवस्था आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले. तसेच, कोणतेही गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सरकारी अधिकार्यांशी जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. याआधी फेब्रुवारीमध्ये, ईडीने एका चीनी कंपनीने विदेशात कथित बेकायदेशीर पैसे पाठविल्याप्रकरणी चौकशी सुरू केली होती.
भारतातून चीनला पैसे पाठवले जातात
- शाओमीने २०१४ मध्ये भारतात आपले ऑपरेशन सुरू केले होते, शाओमीने त्याच्या पुढच्या वर्षापासूनच भारतातून चीनला पैसे पाठवण्यास सुरुवात केली.
- ईडीने सांगितले की, कंपनीने परदेशातील तीन कंपन्यांना रॉयल्टीच्या नावावर ५ हजार ५५१ कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे.
- यामध्ये शाओमी ग्रुपच्या एका कंपनीचा समावेश आहे. ४. इतर दोन अमेरिकी कंपन्यांना पाठवलेली रक्कम देखील शेवटी शाओमी समूह कंपन्यांच्या फायद्यासाठी होती, असे एजन्सीने म्हटले आहे.
- रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेवरूनच पाठवण्यात आली.
बँकांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप
- ईडीच्या म्हणण्यानुसार, शाओमी इंडिया भारतातील निर्मात्यांकडून पूर्ण विकसित मोबाइल सेट आणि इतर उत्पादने खरेदी करते.
- ज्यांना ही रक्कम पाठवली होती, या तीनपैकी एकाही परदेशी कंपनीची त्यांनी सेवा घेतली नाही.
- रॉयल्टीच्या नावावर परदेशात पैसे पाठवण्याला फेमा कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन म्हणण्यासह शाओमी परदेशात पैसे पाठवताना बँकांना ‘भ्रामक माहिती’ दिल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे.
- तपास एजन्सीने या महिन्याच्या सुरुवातीला शाओमी समूहाचे जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांची बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयात चौकशी केली होती.