मुक्तपीठ टीम
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संबंध असलेला साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई कारखाना विकत घेतलेल्या कंपनीविरोधात झाली असून आपला काही संबंध नाही, असा खुलासा अजित पवारांनी केला आहे. तरीही ईडीच्या कारवाईच्या निमित्तानं सुरु झालेले आरोपसत्र लक्षात घेतले तर अजित पवारांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचे प्रयत्न वेगानं सुरु असल्याचं स्पष्ट दिसत आहे. भाजपानं काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव मंजूर केला आणि त्यानंतर झालेली ही कारवाई मोठा धक्का मानली जात आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याचं प्रकरण नेमकं काय?
• माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.
• साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता.
• २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव करुन गुरु कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता.
• त्यांच्याकडून तो कारखाना बीव्हीजे ग्रुपने चालवण्यासाठी घेतला.
• मात्र, त्यांना तो चालवताना तोटा झाला. त्यामुळे त्यांना तो चालवणे शक्य नव्हते.
• त्यानंतर जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे यांच्या कंपनीने चालवण्यास घेतला.
• घाडगेंच्या कंपनीने तो साखर कारखाना चालवण्यास घेतल्यापासून तो क्षमता वाढवून चांगला चालत असल्याची माहिती अजित पवार यांनी आज दिली.
• मात्र, २०१०मध्ये ज्या गुरु कंपनीने हा कारखाना विकत घेतला, तेव्हा हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
• याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
• उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता.
• २०१९ मध्ये नोंद एफआयआरच्या आधारावर हा पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
• ईडीनं आता केलेली कारखाना जप्तीची कारवाई त्या अंतर्गतच झाली आहे.
ईडीची कारवाई गुरु कमोडिटीजवर, मग अजित पवारांचं नाव का वादात?
• गुरु कमॉडिटीजने हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिला.
• स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स आहेत.
• तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे.
• थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाल्याचं म्हटलं जात आहे.
• परंतु या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
• कारखाना लिलावात काढला तेव्हा अजित पवार सत्तेत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते.
• लिलाव झाला तेव्हा अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात?
• या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली.
• आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाबद्दल याचिका दाखल केली होती.
• त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता.
• ‘हा कारखाना माझ्या नातेवाईकांचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही.
• मागच्या सरकारच्या काळात सीआयडी चौकशी झाली. एसीबीनं चौकशी केली होती. काहीही निष्पन्न झालं नाही.
• सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत.
• त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.
• जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला.
• याउलट राज्यातील इतर कारखाने खूप कमी किंमतीला विकले गेले आहेत.
• मराठवाड्यातील एका कारखान्याची क्षमता जरंडेश्वर कारखान्याइतकी असतानाही तो कारखाना अवघ्या चार कोटींमध्ये विकला गेला.
• कायदेशीर प्रक्रिया राबवूनच या कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी टेंडरही काढण्यात आलं होतं.
• ‘तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. फक्त चौकशी पारदर्शक व्हावी. त्यामागे कुठलाही वेगळा हेतू नसावा..
• पण देशात सध्या काय पद्धतीचं राजकारण चाललंय हे सर्वांनाच माहीत आहे,’ असं सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं.
मुक्तपीठ च्या सर्वच बातम्या छान असतात,त्याच बरोबर त्या कुठल्या पक्षाशी बांधील नसतात,एक गोष्ट आहे सामान्याचा गरजा वर पण फोकस करा म्हणजेच सामान्यासाठी लोकल,रोजगार प्रश्न ,गॅसच्या वाढणाऱ्या किमंती यावर पण विचार मांडा.
राजेश घोणे बोरीवली