मुक्तपीठ टीम
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नाशिक येथील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक, भाषा आणि लोकशाही या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, पत्रकार दीप्ती राऊत, पत्रकार व संपादक इब्राहीम अफगाण, लेखक व संपादक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, आणि, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी झाले होते.
या प्रसंगी बोलताना गांगल म्हणाले की, केवळ भाषा या माध्यमापेक्षा अलीकडच्या काळात इतर अनेक माध्यमे निर्माण झाली आहेत, ज्यावर समाज वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ लागला आहे. लोकशाहीच्या अभिसरणासाठी अशा संमेलनांच्या बरोबरीनेच ही समाजमाध्यमे ही लोकांची अभिव्यक्तीची गरज मोठ्या प्रमाणात भागवत असतात. आणि लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती हे एक महत्त्वाचे मूल्य आहे.
संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य समता आहे आणि सध्या तरी अशी समता आपल्या समाजात आली नसल्याचे अनेक दाखले पत्रकार दीप्ती राऊत यांनी दिले. कोणत्याही प्रकारच्या लेखकाने लोकशाही पक्षाचे असायला हवे. सांविधानिक मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गावागावांत संविधानाच्या शाखा निघायला हव्यात, असेही त्या म्हणाल्या. इब्राहीम अफगाण म्हणाले की, लोकशाही ही केवळ यंत्रणा नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. हे लक्षात घेऊन लेखकाने लोकशाहीवादी शब्द घडवले पाहिजेत.
सध्या ज्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे, समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे लोकांना ट्रोल केले जात आहे, हे लक्षात घेतले तर लोकशाही धोक्यात आली आहे. लेखकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी किंमत मोजावी लागते, असे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी अफगाणिस्तान, दक्षिण सुदान यांसारख्या देशांमध्ये काही वर्षे काम केल्याने आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होते, असे उद्गार काढले. तसेच लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम कशी होईल यासाठी सर्व समाजाने प्रयत्नशील होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांनी या परिसंवादाच्या संवादकाची जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, नाशिक महसूल विभागाचे अधिकारी राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी स्वाती थवील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दिनकर गांगल यांचा त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल सत्कार करण्यात आला.