मुक्तपीठ टीम
ठरवलं तर संकटातही संधी शोधता येते आणि एक मोठा शोध लावता येतो. अशी वाक्य आपण नेहमीच ऐकतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील एका तरुण पत्रकाराने लावलेला शोध किंवा आपल्या भाषेत त्याने केलेला जुगाड कौतुक करावा असाच आहे. शहापूर माझा या स्थानिक चॅनलचे संपादक सुनिल घरत यांनी घरीच इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे. त्यांनी बनवलेली ई-बाइक ही शहापूर तालुक्यातील पहिली प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक बाईक ठरली आहे.
त्यांनी ही इलेक्ट्रिक बनवली त्याचे कारण पेट्रोलची महागाई. पत्रकार असल्याने त्यांना खूप फिरावे लागते. त्यामुळे ई-बाइक घेण्यासाठी ते दुकानात गेले. मात्र, नव्या ई-बाईकची किंमत किमान पाऊण लाख ते सव्वा लाख कळली. तसेच त्यांच्या जुन्या पेट्रोल बाइकसाठी फक्त आठ हजार किंमत सांगण्यात आली. त्यामुळे तांत्रिक आवड असणाऱ्या सुनिल घरत यांनी स्वत:च्याच बाइकला इलेक्ट्रिक करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी काम सुरु केले. वेगवेगळे साहित्य वापरून त्यांची ई-बाइक तयार झाली. आता अवघ्या १० रुपयांमध्ये त्यांना ७द किलोमीटरची रपेट करणे शक्य होते. एकूणच ठरवलं तर अशक्य काही नाही. सुनील घरत यांच्या ई-बाइकचा हा जुगाड प्रत्यक्षात पैसे आणि प्रदूषणापासूनही वाचवणारा महाजुगाड ठरला आहे.
सुनिल घरत यांच्या ई-बाइकची जुगाड कथा
शहापूर माझा या स्थानिक चॅनलचे संपादक असल्याने सुनिल घरत यांना बातमी कव्हरेज करण्यासाठी रोज शहापूर तालुक्यात फिरावे लागत असते. कधी कधी मुरबाडमध्ये एखादी महत्वाची घटना घडली की तेथेही त्वरित जावे लागते. धावपळ करत असताना मोटारसायकलवरून फिरत असतांना रोज १०० ते १५० रुपयांचे पेट्रोल लागत असे. त्यामुळे सुनिल घरत यांच्या मनात विचार आला की, स्थानिक विभागांमध्ये कव्हरेजसाठी फिरण्यासाठी एक इलेक्ट्रीक स्कुटी घ्यावी. ती स्वस्त पडेल. त्यामुळे ते इलेक्ट्रिक स्कुटी विक्रेत्याच्या दुकानात गेले. स्कुटीच्या किंमत विचारता एका स्कुटीची किंमत ९५ हजार व दुसऱ्या एका मॉडेलची किंमत १ लाख १४ हजार सांगितली. त्यांच्याकडे त्यांची ५ वर्ष वापर केलेली जुनी बाइक होती. ती विकून, त्याबदल्यात ही नवीन स्कुटी घेण्याचे त्यांच्या डोक्यात होते. त्याबद्दल त्या डीलरला विचारले तर तो म्हणाला की तुमच्या गाडीचे फक्त जास्तीत जास्त ८ हजार रुपये येतील. त्यानंतर सुनिल यांनी विचार केला की, ब्रँडेड ई-स्कुटीची किंमत हे जास्त लावतात लावतात आणि आपल्या चालू कंडिशनमध्ये असलेल्या गाडीची किंमत अगदी कवडी मोल पकडतात. त्या नंतर त्यांनी इलेक्ट्रिक गाडीत काय मटेरियल असते त्या संदर्भात विचारले. त्या गाडीचे चांगले निरीक्षण केले. तेव्हा इलेक्ट्रिक गाडीमध्ये इंजिन नसते, महत्वाचे घटक म्हणजे एक बॅटरी व त्यावर चालणारी डिसी मोटार आणि एक कंट्रोलर अशा या ३ गोष्टी असतात असे त्यांना समजले.
सुनिल घरत यांना इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ज्ञान असल्याने त्यांनी विचार केला की हे त्यांनाही करणे शक्य आहे. त्यांनी ठरवले, आपणच इलेक्ट्रिक बाईक बनवायची. त्यांना रात्री झोपच लागत नव्हती. रोज रात्री ३ ते ४ वाजेपर्यंत ते विचार करत बसायचे की कशा पद्धतीने ही गाडी बनवता येईल? त्या एका ध्येयाने त्यांना झपाटले. त्या नुसार मनात रोज एक आराखडा, डायग्रॅम तयार करत मोटर कुठे फिट करायची, बॅटरी कशा पद्धतीने असेल, ती कुठे फिट करू शकतो, कंट्रोलर कुठे फिट करू शकतो, कन्व्हर्टर कुठे फिट होऊ शकतो. सतत विचार करून. ठरवलेले बदलून. त्यातही संभाव्य अडचणींवर विचार करून, त्यांनी मनात आराखडा तयार केला. शेवटी तो कागदावर उतरवला आणि ते कामाला लागले.
त्या नंतर गाडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कुठे मिळेल यासाठी भिवंडी, उल्हासनगर, मुंबई पर्यंत अनेक दुकानदारांपर्यंत ते पोहचले. परंतु लागणारे साहित्य कुठेच मिळाले नाही. मुंबईच्या एका दुकानदाराने सांगितले की हे सामान फक्त दिल्लीला मिळेल.
५ ते ६ वर्षांपूर्वी दिल्लीला काही इलेक्ट्रिक वस्तू आणण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे तेथील इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दोनचार दुकानदार यांचे फोन नंबर त्यांच्याकडे होते. त्यांच्याशी संपर्क साधला व दिल्ली येथील एका दुकानदाराने सांगितले की यामधील काही साहित्य माझ्याकडे आहे व त्या व्यतिरिक्त साहित्य मी कलकत्ता येथून मागवून देतो. पण त्यासाठी १००% रक्कम ही अगोदर अॅडव्हान्स पाठवावी लागेल. त्यांना काळजी वाटली, कारण दुकानदाराचा तेवढा परिचय नव्हता. आणि १००% पैसे त्याच्या खात्यात टाकायचे आणि त्याने साहित्य नाही पाठवले तर पैसे अक्कलखाती जातील. नंतर विचार केला गेले तर गेले. त्या दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा केले. १५ दिवसांनी सामान मिळाले. गाडी बनवण्यासाठी लागणारे ७०% साहित्य जमा झाले होते.
आता गाडी बनवण्यासाठी एक जुनी टू व्हीलर लागणार होती. ८ महिने ते जुन्या टू व्हीलरच्या शोधत होते. विकत घेण्यासाठी अनेक गॅरेज ते फिरले. पण ज्या पद्धतीने जुनी बाईक पाहिजे त्या प्रमाणे मिळाली नाही. एकदोन ठिकाणी दिसली, तर त्या भंगार गाडीचीही खूप जास्त किंमत सांगायचे. दोन मित्रांकडे गाडी मिळाली. पण ती पावसामध्ये भिजून खूप खराब झालेली होती. टायर्स, आणि रिंगही खराब झालेले होते. अखेर त्यांनी विचार केला की, आता आपल्याच गाडीवर प्रयोग करायचा. तशीही तिची किंमत ८ हजार पर्यंतच सांगितली गेली होती. जर प्रयोग फसला तर गाडी भंगारात विकून टाकू आणि मागवलेल्या साहित्यापैकी मोटरही फुकट जाणार नाही. त्यांनी कामाला सुरुवात केली.
शहापूर मध्ये त्यांच्या अत्याभावाचा मुलगा नितीन भोईर याचे स्लायडींगचे दुकान आहे. त्याच्याकडून गाडी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य म्हणजे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर, ड्रिल मशिन हे सामान घरी नेले व सतत त्यांच्यासोबत असलेला त्यांचा कॅमरामॅन विकास यालाही गाडी खोलायला सांगितली. तो वस्तू खोलण्यात एकदम एक्सपर्ट आहे. रोज अकरा वाजता काम करायला सुरुवात करायचे. तर रात्री तीन ते चार वाजेपर्यंत करायचे. त्यांनी रोज थोडे थोडे काम करून ८ दिवसात ही इलेक्ट्रिक बाईक बनवली.
बाईक बनवून तर तयार झाली परंतु त्यासाठी ‘१२ व्ही’च्या ४ बॅटरीज लागणार होत्या. त्यासाठी अनेक दुकानदारांकडून बॅटरीची किंमत काढल आणि बुलेटला जी बॅटरी वापरली जाते त्या चार बॅटरी बसवण्याचे ठरवले. त्यांचा एक मित्र गणेश निमसे याने जे इलेक्ट्रिक स्कुटीची विक्री करतात त्याच्याकडून ट्रायलसाठी स्कुटीच्या ४ जुन्या बॅटरी आणल्या. त्यावर ट्रायल केली. बाईक चालू लागली. पण एका बॅटरीचे वजन हे १४ किलो पेक्षा जास्त होते आणि विचार केला जर या ४ बॅटरीज वापरल्या तर यांचे वजन हे साधारण ५६ किलो होईल. त्या फिटिंग करायला लागणारे स्टँड हे ही पाच ते सहा किलो होईल. दोन्ही मिळून ६० किलो पेक्षा जास्त वजन होईल. पैसे वाचतील, परंतु वजन जास्त होईल म्हणून त्या ४ बॅटरी वापरण्याचा विचार रद्द केला. त्यांचे लिथियम फॉस्फेट बॅटरीकडे लक्ष गेले.
परंतु ४८ व्ही लिथियम फॉस्फेट बॅटरी आपल्याकडे मिळत नाही त्यासाठी पुन्हा दिल्लीतील वितरकांशी संपर्क साधला. त्यांनी लिथियम फॉस्फेट ३० एएच बॅटरीसाठी २६ हजार ते २५ हजार रुपये किंमत सांगितली. १००% पेमेंट ऍडव्हान्स मध्ये अकाउंट मध्ये जमा करा असे सांगत, शेवटी १५ दिवसाच्या प्रयत्नाने व काही मित्राच्या मदतीने मुंबई मध्ये ४८ व्ही लिथियम फॉस्फेट बॅटरी २२ हजारात मिळाली. मोटारला वापरण्यात आलेले फ्रीव्हील हे सायकलसाठी वापरण्यात येणारे फ्रीव्हील वापरले. त्याला थेडिंग लेंथ मशीनवर थेडिंग करायचे होते त्यासाठी चेरपोली येथे नवीनच चालू झालेले पारस इंजिनीअरिंग वर्क्सच्या पवन भेरे यांची ही मदत झाली. अखेर सुनिल घरत यांची इलेक्ट्रिक बाईक तयार झाली.
त्यांचा एक दिवस शहापूर मध्ये पहिली इलेक्ट्रिकल बाईक बनवायची व जनतेसमोर काहीतरी वेगळे चांगले करून दाखवायचे, हा निश्चय प्रत्यक्षात आला. पेट्रोल आणि एलपीजी अशा पद्धतीने आता ४ व्हीलर येतात त्याच पद्धतीने आता या पुढील काळात न्यू बाईक ही पेट्रोल + चार्जिंग व रिमोटवर चालू बंद होणारी इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याचे नवे स्वप्न त्यांच्या मनात उमलू लागले आहे. त्यासाठी लिथियम फॉस्फेट बॅटरीही आपणच बनवायची, असा त्यांचा संकल्प आहे. सुनिल घरत यांनी ई-बाइकचे ठरवले आणि करून दाखवले. आता नवा संकल्पही ते पूर्ण करतीलच!
सुनिल घरत यांच्या जुगाड ई-बाइकचे वैशिष्ट्य
• एक वेगळाच प्रयोग, घरीच स्वतः बनवली इलेक्ट्रिक बाईक
• शहापूर तालुक्यात पहिली इलेक्ट्रिक प्रदूषण मुक्त बाईक.
• अनेक कंपन्यांनी महागड्या इलेक्ट्रिक स्कुटी बनवल्या आहेत, परंतु कमी पैसे खर्च करून बनवली इलेक्ट्रिक बाईक
• ३.३० मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर लाईटचा एक युनिट खर्च होणार. म्हणजे फक्त १० रुपयाl ५० च्या वेगाने ७० किलोमीटर धावणार.
• BLC.DC – 750 W मोटर्स, 48.V – 30 Ah Lithum Fospete Life Pro बॅटरी, 750 W कंट्रोलर, कन्व्हर्टर, Led लाईट्स, 28 ard free व्हील या सारखे हे साहित्य वापरून त्यांनी इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.
पाहा व्हिडीओ: