मुक्तपीठ टीम
एका हिंदी चित्रपटाप्रमाणे वाटणारी घटना मुंबईच्या एका दाम्पत्यासोबत घडली आहे. हनिमूनसाठी कतारमध्ये गेलेले आणि बनावट ड्रग्स प्रकरणात बळीचा बकरा बनलेले मुंबईतील दाम्पत्य २१ महिन्यांनी मायदेशी परतले आहेत. या दाम्पत्याचे नाव मोहम्मद शरीक कुरेशी आणि पत्नी ओनिबा कुरेशी असे आहे. तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह त्यांची घरवापसी झाली. हे झालं. ते सुटले. पण ते का फसले? कायदा काय सांगतो? आणि तसं तुमच्याबाबतीत घडू नये म्हणून काय करायचं आणि काय टाळायचं? घटना सांगतानाच, काही उपयोगी माहितीही देण्याचा हा प्रयत्न:
फुकटचा मधुचंद्र…गजाआड दोन वर्ष!
- कतारमध्ये हनिमूनसाठी जाण्याचा अनुभव इतका भयानक असेल असं ओनिबा आणि मोहम्मद शरीक कुरेशी यांना स्वप्नातदेखील वाटलं नसेल.
- ओनिबा आणि मोहम्मद कुरेशी हे दाम्पत्य २०१९ मध्ये कतारमध्ये हनिमूनसाठी गेले होते.
- त्यांचेच नातेवाईक असलेल्या तबस्सुम रियाज कुरेशी यांनी त्यांना हे फ्री हनिमून पॅकेज दिलं होतं.
- त्यांच्या सामानात ४.१ किलो चरस लपवण्यात आलं होत.
- कतारमधील दोहा विमानतळावर त्यांच्या सामानात हे ड्रग्ज सापडल्यानं त्यांना तिथं अटक झाली आणि त्यांना दहा वर्षांची शिक्षा आणि एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
सख्या काकूंनी फसवणूक केली होती
- ओनिबा आणि शरीक तुरूंगात असताना त्यांच्या कुटुंबियांनी भारतातील एनसीबीकडे मदत मागितली. एनसीबीचे संचालक राकेश अस्थाना आणि उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. शरीकचा मोबाइल फोन तपासल्यानंतर एनसीबीला त्याच्या निर्दोषपणाचा पहिला पुरावा सापडला. यात त्यांच्या काकू तबस्सुमचा आवाज होता ज्यात ती बोलली होती की ते पाकिट तंबाखूचं आहे आणि कतारमधील त्यांच्या एका मित्राला केवळ हे नेऊन द्यायचं आहे.
- हा पुरावा समजताच एनसीबीने चंदीगडमध्ये छापा टाकला आणि काकीसह एकास अटक केली. काकीनेच हे हनीमून पॅकेज दिले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
- पुरावे पंतप्रधान कार्यालयातही पाठविण्यात आले. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी कतारच्या उच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नातून नवीन पुराव्यांच्या आधारे कनिष्ठ न्यायालयात पुन्हा खटल्याची सुनावणी करण्याचे आदेश दिले.
कनिष्ठ न्यायालयाने पुन्हा सुनावणी सुरू केली आणि २९ मार्च रोजी होलि आणि शब-ए-बारात या दिवशी ओनिबा आणि शरीक यांची निर्दोष म्हणून सुटका केली.
का फसले शरीक दांपत्य?
- त्यांनी फुकट मिळत असल्यानं काहीशा विरोधानंतर दुसऱ्या मधुचंद्र परदेश दौऱ्याची ऑफर स्वीकारली.
- त्यांनी सोबत काकूनं दिलेली बॅग, त्यात तंबाखू आहे म्हणून घेतली.
- त्यात नेमके काय आहे ते तपासले नाही.
कायदा काय सांगतो?
- भारतातच नाही जगभरात अंमलीपदार्थ विषयक म्हणजेच ड्रग्सचे कायदे खूप कडक आहेत.
- ड्रग्स तुम्हाला माहित असो नसो, तुमच्या सामानात, शरीरावर, रक्तात, गाडीत, घरात कुठेही सापडणे हा गुन्हा मानला जातो.
- ते तुमचे नाहीत, हे सिद्ध करण्याची तुमची जबाबदारी असते. ते सोपे नसते. शरीक दांपत्य सुदैवी ठरले. एनसीबीने त्यांना साथ दिली.
काय करायचं, काय टाळायचं?
- या जगात फुकट असं काही नसतं, त्यामुळे फुकटच्या महागड्या परदेश प्रवासाच्या ऑफर टाळा.
- तरीही प्रेमानं जवळचं कुणी आग्रह करत असेल तर आधी त्यांच्याविषयी माहिती घ्या.
- ते कितीही जवळचे असले तरी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका.
- त्यांनी काही सामान दिलं तरी ते संपूर्ण तपासा.
- त्यांनी सोबत नेण्यासाठी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, औषधं, कॉस्मेटिक अगदी मोठ्या ब्रँडचे पॅक असलेले काही दिले, रिकामी नवी बॅग जरी दिली तरी शक्यतो टाळाच. रिकाम्या बॅगेचा मोह होऊ शकतो, पण ती बॅग तपासा, शक्यतो तीही टाळा.
- काही ड्रग माफिया छोट्या कंपन्या उघडून त्यांच्या मार्फत कर्मचारी नेमतात. त्यांना बिझनेस ट्रिपला पाठवल्याचे दाखवत असे स्मगलिंग करतात, असंही घडू शकते. अशा बिझनेस ट्रिप तुमच्या पदासाठी नसतील तरीही तुम्हाला फक्त जाऊन ये असं सांगितले जात असेल तर जास्त संशय घ्या.
- विमानतळावर पोहचल्यावर अचानक तुम्हाला अनोळखीच्याच नाही तर ओळखीच्याही कुणाकडून परदेशात देण्यासाठी काही दिलं गेलं तर नम्रतेने पण ठामपणे नकार द्या.
- तुम्हाला कौटुंबिक, व्यावसायिक बंधनामुळे विश्वासातील असल्याचे वाटणाऱ्या माणसांकडूनही काही न्यावेच लागत असेल, प्रेमापोटी तसे करावे लागत असेल तर मोबाइल कॉल रेकॉर्ड, एसएमएस, व्हॉट्सअॅप यावर रेकॉर्ड तयार करुन ठेवा.