मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावत असतानाच लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जिथं लस सहजासहजी पोहचू शकत नाही अशा दुर्गम भागांसाठी ड्रोनकडे उपाय म्हणून पाहिले जात आहे. देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना आता ड्रोनच्या मदतीने कोरोना लस पुरवण्यात येणार आहे. आयसीएमआरने त्यासाठी निविदाही जारी केल्या आहेत. ड्रोनच्या मदतीनं लसीकरण मोहिमेची सुरुवात तेलंगणातून होणार आहे.
आयसीएमआरच्या वतीने एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेसने देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी ११ जून रोजी निविदा मागवल्या आहेत. देशातील शेवटच्या टोकापर्यंत लस पोहोचवणे हा त्यामागचा हेतू आहे.
दुर्गम भागात कोरोना वॅक्सिन पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोन वाहतुकीचा आयसीएमआरनेदेखील अभ्यास केला आहे. या कामासाठी अशा ड्रोनचा वापर केला जाईल, जे ३५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील. तसेच १०० मीटर उंचीपर्यंत उडू शकतील. यासाठी २२ जूनपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत.
ड्रोनने लसीकरणाची योजना आहे कशी?
• आयसीएमआरने ड्रोनद्वारे कोरोना लशीच्या यशस्वी सप्लायसाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार केला आहे.
• त्याशिवाय आयसीएमआर दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचं मॉडेल तयार करण्यावरही काम करत आहे.
• हे ड्रोन चार किलोपर्यंतचं वजन घेऊन उडण्यास सक्षम असतील. लस, सेंटरपर्यंत पोहोचवून तेथून पुन्हा परतण्यासाठीही ड्रोन सक्षम असतील.
• ड्रोनचं टेक ऑफ आणि लँडिंग डीजीसीएच्या गाइडलाइन्सवर आधारित असेल. यात पॅराशूट आधारित डिलीव्हरी सिस्टम असणार नाही.
फ्लिपकार्टने तेलंगणा सरकारसाठी ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’
• दरम्यान, ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने शुक्रवारी सांगितले की, राज्यातील दुर्गम भागात ड्रोनचा वापर करून कोरोना लस आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी तेलंगणा सरकारबरोबर भागीदारी केली आहे.
• ‘मेडिसीन फ्रॉम द स्काय’ प्रकल्प सुरू करण्यापूर्वी तेलंगणामध्ये सहा दिवसांचा पायलट प्रकल्प चालविला जाईल.
• तेलंगणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव जयेश रंजन यांनीही याची पुष्टी केली आहे.
• जयेश रंजन म्हणाले की, दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ड्रोनचा वापर करणे आपल्या देशात आतापर्यंतचा एक अनोखा उपक्रम आहे आणि फ्लिपकार्टसारख्या भागीदारांच्या सहकार्याने या उपक्रमाचे नेतृत्व करण्यास आम्हाला आनंद झाला आहे.