डॉ. विजय कदम
डेंटिस्ट म्हटले की आपल्याला त्यांच्या कामाचं महत्व जो पर्यंत दाढ ठणकत नाही तोपर्यंत कळत नाही. पण ते खूपच मोठं काम करत असतात. त्यातही कोरोनाच्या संसर्गजन्य संकटकाळात डेंटिस्टचे काम सर्वात धोक्याचं आहे. कारण ते वापरत असलेल्या स्प्रेमधील काही शिंतोडे कितीही काळजी घेतली तरी सभोताली उडतात. त्यामुळे भीती खूपच असते. तरीही अनेक डेंटिस्ट काळजी घेत, मनात भीती वाहत रुग्णसेवा करत असतातच. डॉ. विजय कदम हे तर संवेदनशील मनाचे सामाजिक कार्यकर्तेही. त्यामुळे त्यांचा सेवायज्ञ तर अखंड धगधगता होता. त्यातूनच आता काळजी घेऊनही कोरोनाची लागण झाली. लसीचे दोन डोस घेतल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर झाली नाही. तरी कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातून ते कसे सावरत आहेत, ते त्यांच्याच शब्दात:
कोरोना, कोरोना, कोव्हिड-१९ याबद्दल आता इतकं काही लिहून, वाचून, बोलून झालय की,(पाहूनही) आता वेगळं काय लिहायचे असा प्रश्न पडतो. या सर्वात एक गोष्ट चांगली झालीय की, या आजाराबाबतचे प्रबोधन
वाजवीपेक्षा जास्त झालंय. काही वेळा वाटते या आजाराचा आपण फार बाऊ करतोय काय? पण त्याचवेळी आजू-बाजूला जेव्हा एक-एक बातम्या कानावर येतात व अगदी जवळची ओळखीची माणसे गेलेली दिसतात तेव्हा काळजात मोठा खड्डा पडतो. फेसबुक तर हल्ली बघायचीही भिती वाटते! इथून प्रचंड प्रमाणात बातम्या आपल्या कानावर येऊन आदळतात की आपल्याला काही सूचतच नाही!
मार्च महिन्यापासून चालू झालेली ही लाट तर प्रचंड आक्राळ-विक्राळ व भीषण रुद्र रुप घेऊन आलीय, असे वाटतेय. कुणाला दोष द्यावा वा कुणाला त्रास द्यावा, कुणाला काय बोलावे हे समजत नाही. खरं म्हणजे आपल्याला १० महिन्यांचा मोठा कालावधी मिळाला होता. या काळात खूप काही करता आले असतेल परंतु यात जर-तर ला काही अर्थ नाही आहे. आहे त्या प्रसंगातून वाट काढत बाहेर कसे यायचे हेच आता सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.
दुर्दैवाने या दुसऱ्या लाटेतच मला स्वत:ला कोरोनाने गाठलं. डेंटिस्ट असल्यामुळे आपण कितीही काळजी घेतली तरी आपल्याला कोरोना होणार हा अंदाज होताच. मला वाटतं डेंटिस्ट्रीमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येकालाच हा अंदाज होता. कमी अधिक प्रत्येकालाच वाटत असावं की, आपल्याला कोरोना होणार! त्याला कारणही तसंच आहे. खरं म्हणजे या विषाणूइतका जलद पसणारा विषाणू आतापर्यंत तरी आलेलाच नाही. शिवाय थुंकी, लाळ, रक्त, हवेचा फवारा, मायक्रोमोरची गती, क्रॉम्प्रेसर हवा यासर्वच कोरोना प्रसाराला हातभार लावणाऱ्या गोष्टी डेंटिस्टकडे भरभरुन कराव्या लागतात.
त्यातच डेंटिस्टचा ऑपरेटींग कॅबिन या खूप प्रशस्त नसतात, शिवाय कितीही काळजी घेतली, दोन मास्क वापरले, दोन ग्लोव्हज वापरले, फेस शिल्ड वापरले, कितीही किट वापरले तरी हा छोटासा विषाणू कुठून प्रवेश करील हे सांगता येणे अशक्य. म्हणूनच डेंटिस्ट हे कोरोना विषाणूसाठी सर्वात सोपं लक्ष्य अगदी सॉफ्ट टार्गेट ठरणार हे आलेच.
दोन दिवसांपूर्वीच मी आमच्या डेंटिस्टच्या ग्रुपवर सहज विचारले “अरे आपल्या पैकी किती जणांना कोरोना झालाय?” आणि त्यानंतर एकेकाचे अनुभव ऐकायला मिळाले. कांदिवलीच्या आमच्या डॉ. शहा यांना स्वत:लाच बेड न मिळाल्यामुळे आपला प्राण गमवावा लागला! ते स्वत: कांदिवली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष असताना ही परिस्थिती, इतर सामान्यांची काय व्यथा असणार! रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर हे किती भितीदायक वातावरणात काय करतात या एका उदाहरणावरुन त्याची प्रचिती येते.
माझे कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेऊन २ दिवस झाले होते, म्हणून मी जरा अतिआत्मविश्वासाने काय करत होतो. साधारण १४ तारखेला दुपारनंतर मला जाणवले की, सकाळी कार्यक्रमात आपण बऱ्याच लोकांना भेटलो. दुपारी क्लिनिकमधून घरी येईपर्यंत थोडंसं थकल्यासारखे वाटत होते. घरी आल्या गेल्या एक वर्षापासूनचा नियम आंघोळ करुन सर्व वस्तू निर्जंतुक करुनच घरच्यांसोबत मिसळायचे. परंतु आत आल्या आल्या मी सांगितले की, मला बरे वाटत नाही. मी आजपासून वेगळ्या रुममध्ये झोपतो. गेल्या वर्षभरात असे ४ ते ५ वेळा झालय. दोन दिवस वेगळे झोपलो की नंतर ठिक ठाक वाटायचे व परत नॉर्मल वागायला सुरुवात व्हायची. यावेळीही तसेच वाटले. परत दोन दिवस बघूया. परंतु रात्री अंगात थोडा ताप वाटला म्हणून एक क्रोसिन घेतली. रात्री बराच घाम आला थोडी झोप लागली. दुपारी जेवताना चव थोडीशी वेगळी वाटली म्हणून लगेच टेस्ट करुन घ्यायचे ठरवले. खर म्हणजे ८ दिवसांपूर्वीच संपूर्ण टॉवरच्या २०० लोकांची टेस्ट केली. त्यात माझी व परिवाराची टेस्ट निगेटिव्ह आली होती. तरीही रॅपिड अँटिजन टेस्ट करुन घेतली. दुर्दैवाने ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. माझी शंका खरी ठरली. सर्वात अगोदर सुवर्णाला फोन केला व माझ्या रुममध्ये मुलांना जाऊ देऊ नको म्हणून सांगितले. माझे सर्व सामान वेगळे करण्यास सांगितले.
डॉ.समिर वर्मा जे एमडी फिजिशियन आहेत. त्यांची वेळ घेतली व त्यांना भेटायला गेलो. कितीही धीर मनाचा व्यक्ती, डॉक्टर कोणीही का असेना जेव्हा त्याला आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली हे कळते तेव्हा तो मनातून हादरतोच. शिवाय अशा काळात आपण पॉझिटिव्ह आलोत. जेव्हा सगळीकडे प्रचंड गदारोळ चालू आहे. बेड मिळत नाहीत, हॉस्पिटल नाहीत, ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाहीत अशा काळात आपण कोरोनाग्रस्त होणे यासारखे दुर्दैव नाही! परंतु आपण खचलो तर संपूर्ण कुटुंब खचेल या भावनेने स्वत: खंबीर राहणे गरजे होते. या कठीण प्रसंगात आपण खंबीरपणे लढायचे ही निर्णय घेतला व डॉक्टर वर्गाच्या वेटींग रुममध्ये थांबून पुढे काय करायचे याबद्दल विचार करु लागलो. कुठल्याही कुटुंब प्रमुखाला असा प्रसंग आल्यानंतर मला वाटले त्यांची बायकोमुले त्यांच्या नजरेसमोर येतात. आपल्याला काही झाले तर ज्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांचे काय होणार या जाणिवेने तो जास्त हादरुन जातो. माझ्या डोळ्यासमोर सूवर्णा व माझी दोन निरागस मुलं दिसू लागली. एक प्रकारे आपण निष्काळजीपणा केल्याममुळे त्यांची शिक्षा त्यांना व्हायला नको हा विचार मनात येऊन भावनांची खूप घालमेल झाली. परंतु त्यांच्यासाठी आपण खंबीरपणे लढलो पाहिजे, या विचाराने बळ एकवटून स्वत:ची एकाग्रता भंग होणार नाही याची काळजी घेऊ लागलो.
डॉ. समिर वर्माने अत्यंत चांगल्या प्रकारे तपासणी केली. गेल्या एक वर्षांपासून मालाडमधील विवांता हॉस्पिटल हा डॉक्टर अतिशय धैर्याने सांभाळतो आहे. शेकडो रुग्ण त्यांनी बरे केले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची वैयक्तिक स्वत: भेट घेतात. रुग्णांची विचारपूर व देखभाल करतात. आजकाल बरेच सिनिअर डॉक्टर फक्त व्हिडीओकॉलद्वारे रुग्णांशी बोलतात आणि कनिष्ठ डॉक्टरांकडून उपचार करुवून घेतात. परंतु डॉ. समिर वर्मा हे खरच मोठे कोव्हिड योध्दे आहेत. त्यांनी मला खूप मोठा आधार दिला. “तुम बिलकूल चिंता मत करो मै तुमको १५ दिन मे ठिक कर देता हू! तुमने आजतक बहुत अच्छे काम किये है अब मुझे तुम्हारे लिए अच्छा काम करने दो.” त्यावर मी बोललो, “उतना ट्रीटमेंट करो मुझे कुछ नही होगा.” ते म्हणाले, “कुछ भी भी मदत लगेगी मुझे डायरेक्ट फोन कर देना. मै तुम्हे तुम्हारे घर से उठा लूंगा.” इतकं आपुलकीचे प्रेमाचे व हक्काचे आश्वासन मिळाल्यानंतर खूप बरे वाटले. घरी फोन करुन सर्व माहिती सुर्वणाला दिली. सर्व औषधं घेऊनच घरी आलो. सर्वात अगोदर स्वत:चे विलगीकरण करुन घेतले. मुलांना वेगळे ठेवले. सूर्वणाला काही लक्षण नसल्यामुळे त्यांच्या सोबत ठेवले. सुरुवातीला ४ ते ५ दिवस खोकला होता, थोडी सर्दी, थोडा ताप वाटायचा, जीभेची जव पूर्ण गेली होती, पाठीवर झोपले की खोकला जास्त यायचा त्यामुळे ३ ते ४ दिवस पोटावर झोपावे लागले. निर्सगाची काय कमाल आहे. मानव हा सर्व प्राण्यांत पाठीवर झोपू शकणारा एकमेव प्राणी आहे. परंतु या कोरोनाने त्याला परत इतर प्राण्यांसारखे पोटावर झोपावे लागते! ४ ते ५ दिवसानंतर सूर्वणाला थोडं जाणवले हलक्या तापासारखे वाटले. लगेच त्या तिघांची रॅपिड अँटिजन टेस्ट करुन घेतली. त्यात सूवर्णाची पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मुलींना वेगळे करुन त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यांची मावशी मुलींना घ्यायला आल्यामुळे तिच्याकडे ठेवले. त्यामुळे मावशीनं एक प्रकारे मुलांची जबाबदारी घेतल्यामुळे सूवर्णा व मी निश्चिंत झालो. माझी आरटीपीसीआर चार दिवसांनी रिझल्ट पॉझिटिव्ह आला. पण मी अगोदरच ट्रीटमेंट चालू केली होती. तशीच सूवर्णाच्या आरटीपीटीआर चाचणीच्या रिझल्टची वाट न पाहाता तिची ट्रीटमेंट चालू केली. सुदैवाने दोन्ही मुलांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. सोसायटीला अगोदर कळवले असल्यामुळे फक्त सूर्वणाचे नाव त्यात अॅड केले व आम्ही दोघेच घरात ट्रीटमेंट घेण्यासाठी थांबलो.
या दरम्यान टीव्हीवरच्या बातम्या, व्हॉट्सअॅप वरच्या बातम्या, सोशल मीडियावरच्या बातम्या या सगळीकडे फक्त कोरोनाच्या दु:खदायक बातम्या कानावर पडतायत. परवा सहज नाशिकचा हरिष हादरे नावाच्या मित्र खूप दिवस बोलला नाही म्हणून त्याच्या फेसबुक वॉलवर गेलो तर तिथे त्याच्या निधनाची बातमी वाचून मोठा धक्का बसला! सतत हसतमुख असणारा हरिष असा अचानक सोडून गेला! आजूबाजूला दिवसरात्र रुग्णवाहिकेचे सायरन वाजतात, वेगवेगळे मित्र डॉक्टरसाठी, रुग्णालयासाठी, ऑक्सिजनसाठी, बेडसाठी, इंजेक्शनसाठी मदत मागत आहेत. कधी नव्हे ते आपण इतके हतबल झालोय. उत्तर प्रदेशातल्या स्मशानातल्या जळणाऱ्या हजारो चिता डोळ्यासमोर जात नाहीत. गरिबांना, रुग्णांना, अबलांना, मुलांना कोणी पालकच उरले नाही.
आम्ही दोघेही आता कोरोनातून बाहेर पडतोय. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे आम्ही वेळोवळी घेतली. पहिल्या दिवशी तर मला ४० गोळ्या खाव्या लागल्या. परंतु उपचार पूर्ण घ्यायच हे ठरवले होते. अॅसिडिटी होणार नाही याची काळजी घेतली. दोघांचे एचआरसीटी रिपोर्ट ७ दिवसानंतर करुन घेतले. रोज वाफ घेतली. सकाळच्या सूर्यप्रकाशात बसलो, फळे खाल्ली, अंडी खाल्ली, सूप प्यालो या सर्वामुळे अंगात ताकद राहिली. या सर्व प्रवासात नातेवाईकांनी, मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली. सूवर्णाच्या ४ बहिणी १ भाऊ सर्व मालाडमध्येच असल्याने सर्वांनी आपापल्यापरीने मदत केली. उज्ज्वलाताई, रवी केणी, डॉ. मानसी, डॉ.राहूल, अमरनाथ शेट्टी यांच्यासारख्या खूप लोकांनी सहकार्य केले. डॉ. हर्षदीप कांबळे सर मोठ्या भावासारखे सतत लक्ष ठेवून होते व लगेच मदत पाठवत होते. पत्रकार मित्र तुळशीदास भोईटे, चंदन शिरवाळे, डॉ.विनोद नारायण हे सर्व कुटुंबाचा आधार. हा खूप मोठा आधार असल्यामुळे या आजारातून लवकर बरे होता आले.
मला वाटते कोरोना हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो कधीना कधी सर्वांना होण्याची भीती नाकारता येत नाही. परंतु त्यापूर्वी आपली प्रतिकारशक्ती, मनशक्ती तयार पाहिजे. आपण शक्यतो लस लवकर घेतली पाहिजे. सरकारने दिलेले नियम पाळले पाहिजे. कोरोना होणार नाही याचीच जास्त काळजी घ्या पण झालाच तर अंगावर काठू नका, लपवू नका. टेस्ट करुन डॉक्टरांना भेटून गोळ्या चालू करा व १४ दिवस किमान डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. उपचार घेत रहा. तुम्ही घाबरु नका. कोरोना शंभर टक्के बरा होता हा विश्वास ठेवा. हीच माझी तुम्हाला विनंती.
आता आपण स्वत:च स्वत:ला वाचवू या व आपल्या कुटुंबाला व देशाला सावरु या!
(डॉ. विजय कदम हे वैदयकीय क्षेत्राप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातही सजगतेने कार्यरत आहेत.)
So nice and inspiring
डॉ विजय कदम सरांचा आम्हाला अभिमान आहे. सोशल अँक्टिव्हिटीज इंटिग्रेशन साई या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. आणि दि. १४.४.२०२१ रोजी संस्थेच्या कामानिमित्त त्यांच्या क्लिनिक मध्ये भेट घेतली. ग्रीन टि सुध्दा आग्रहाने मला पाजली. तिसऱ्या दिवशी त्यांची कोविड अन्टिजीन टेस्ट पॉजीटिव्ह आल्याचा त्यांनी मला मॅसेज केला. त्यांची भेट घेतली तेव्हा क्लिनिक च्या कोपर्यात जाऊन ते काळजी घेवून शिंकत होते हे आठवले. मी लगेच फोन करुन सतत वाफ आणि औषधोपचार घेण्याचे सुचवून धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु जन्मतः धीरोदात्त असलेल्या व्यक्तीस आपण काय सांगावे हे हि मनात आले पण डॉ साहेब आपल्या मनशक्तीने आणि दृढनिश्चय आणि दृढआत्मविश्वासाने कोरोना वर विजय मिळविला.. कारण त्यांच्या नावातच विजय आहे. समाजाप्रती संवेदनशील आणि मददगार असलेले डॉ विजय पुढिल जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्ष, संकट, समस्यांवर मात करुन विजय मिळवू दे हिच प्रार्थना.
विनय मधुसूदन वस्त
संस्थापक आणि संचालक
सोशल अँक्टिव्हिटीज इंटिग्रेशन साई
भायखळा मुंबई
http://www.saingo.org
I have written my feelings above
Tks a lot Vinay ji for your kind words.
Vijay Sir, u just made it, due to ur confidence… Even last year I had suffer lot… Take care.
Regards.