मुक्तपीठ टीम
“सावित्रीबाई व महात्मा फुले यांची लढाई ब्राह्मण समाजविरोधात नव्हती, तर प्रत्येक समाजातील ब्राह्मण्याविरोधात होती. बहुजन, अभिजन अशा सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले आहे. हा ब्राह्मण्यवाद संपवण्यासाठी फुले दाम्पत्याचा विचार आपण अमलात आणला पाहिजे. सावित्रीबाई ही महात्म्याची महात्मा आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वतीने पहिला ‘राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात आला. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवनमध्ये झालेल्या सोहळ्याला बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.
बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील १५ महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यात वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), सरिता पवार (सिंधुदुर्ग), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश होता.
जातीचे मेळावे जोरात चालू असताना बंधुतेची ज्योत तेवत आहे, याचे समाधान आहे. लोकांकडून मिळणारा मान सन्मान मन भारावून टाकतो, अशी भावना सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. डॉ. सबनीस म्हणाले, “लेखक, शिक्षक, शेतकऱ्यांचा कैवारी, समाजसुधारक, क्रांतिकारक, बहुजनांचा वाली असलेल्या फुले यांचा विचार अंगिकारण्याची गरज आहे. सगळे ब्राह्मण वाईट आणि सगळे बहुजन चांगले असे नाही. फुले यांना सर्वच समाजातील, जातीतील चांगल्या लोकांची साथ लाभली.”
चंद्रकांत दळवी म्हणाले, “आपापल्या जातीतील ब्राह्मण्य निर्मूलन करण्याची गरज आहे. समाजात बंधुत्वाची भावना रुजली पाहिजे. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे परखड विचार समाजाला आरसा दाखवणारे आहेत. त्यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे जीवनात नेमके काय करायचे, याची दिशा मिळते. त्यांना बंधुतेच्या विचारपीठावर आणून रोकडे यांनी समाजासमोर आदर्श दाम्पत्याचा सन्मान केला आहे. त्यांचा सन्मान माझ्या हस्ते होणे हा माझाही बहुमान आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “आपल्या अवतीभवती अनेक चांगली माणसे आहेत. त्यांना शोधण्याची दृष्टी आपल्या अंगी असावी. फुले यांनी केलेल्या कार्यातून, दिलेल्या विचारांतून प्रेरणा घेऊन काम करण्याची गरज आहे. उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी चांगलेपणात अधिक भर घालावी लागेल. त्यासाठी बंधुतेचा विचार जनमानसात रुजायला हवा.” चंद्रकांत वानखेडे यांनी काव्यात्मक मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजूरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.