डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो ! श्रीलंका देश हा बुरखा घालण्यावर बंदी आणतोय. या बंदीची दोन स्पष्ट कारणे नेहमी दिली गेली आहेत – १. स्री – पुरुष समानतेच्या किंवा साध्या माणुसकीच्या तत्वानुसार बुरखा हा स्रियांवरील अन्याय आहे. २. बुरख्यामुळे सार्वजनिक जागी व व्यवहारांत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मुलभूत नागरी स्वातंत्र्याच्या तत्त्वानुसार नागरिक कोणताही पोषाख घालू शकतात जर तो ‘सुयोग्य’ असेल. पवित्र कुराणातही बुरख्याचा उल्लेख नाही. हा ग्रंथ सांगतो की पोषाख हा ‘यथायोग्य’ असायला हवा. ही सुयोग्यतेची व्याख्या जगभरात, विविध समाजांत व धर्मांमध्ये भिन्न भिन्न आहे आणि ती आर्थिक भरभराटीनुसारही बदलते. उदाहरणार्थ, काही कट्टर तेल उत्पादक देशांत प्रगत पश्चिमी देशातील नागरिक जेव्हा नोकरी वा उद्योगासाठी येतात तेव्हा त्यांना पोषाखासाठी बरीच मोकळिक दिली जाते. अर्थात तेल उत्पादकांना पश्चिमी तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य, भांडवल इ. गोष्टी हव्या असतात. किंबहुना दोन अरब उद्योगपतींमध्ये स्पर्धा असते की कुणाकडे जास्त पश्चिमी कर्मचारी आहेत. इथे ‘पोषाख’ हा मुद्दा गौण ठरतो.
पाकिस्तान या इस्लामी देशाच्या प्रधानमंत्री बेनझीर भुट्टो होत्या. शेख हसिना या बांगला देशच्या प्रधानमंत्री आहेत. खदिजा या प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेबांच्या प्रथमपत्नी होत्या ज्या वयाने पैगंबर साहेबांपेक्षा मोठ्या होत्या. त्या एक खूप मोठ्या उद्योगाच्या प्रमुखही होत्या. इजिप्त, इराण, सिरिया इत्यादी देशांमध्ये स्रीसत्ताक व बहुपतीत्व या पद्धती प्रचलित होत्या. सातव्या शतकात इस्लामचा जन्म झाला. बाराव्या शतकापर्यंत इस्लाममध्ये एकाहून एक सरस असे विद्वान होऊन गेले ज्यांनी बीजगणित, पदार्थ विज्ञान, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र इ. विषयांत मोलाची भर घातली. नंतर मात्र खलिफांचे वर्चस्व, पुरुषप्रधानतेचा बोलबाला वाढत गेला आणि तो शरियाद्वारे प्रकट होत गेला. कुराणातील काही आयतांमधील संदिग्धतेचा वापर करीत मुल्ला – मौलवींनी आपले ‘धार्मिक’ वर्चस्व हळूहळू प्रस्थापित केले. शरियाचा प्रभावही वाढला. शरियाच्या सोबतीने बुरख्याची सक्ती वाढली. आज तुर्कस्तान, उझबेकिस्तान, तजिकीस्तान ( इस्लामी देश), फ्रान्स, जर्मनी, इटली, चीन, रशिया, डेन्मार्क, हॉलंड, कॅनडा इ. अनेक देशांत बुरख्यावर पूर्ण किंवा अंशतः बंदी आहे.
भारतीय उपखंडातील मुस्लीम हे मूलतः प्राचीन भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. ९०% भारतीय मुस्लीम हे ज्ञात कारणांमुळे धर्मांतरीत होत मुस्लीम बनले. यांचा ‘अध्यात्मिक’ धर्म बदलला परंतु जणुकांमधील भारतीय संस्कृती टिकून राहिली. हां, छोटा अपवाद हा ‘उत्तर भारतीय पट्ट्या’तील काही मुस्लीमांचा ज्यांनी ‘सलाफीजम’ अंगिकारले. सलाफीजम म्हणजे धर्म व संस्कृती या दोन्ही बाबी कट्टर अरबांसारख्या. बहुसंख्य भारतीय मुस्लीम मात्र ‘सुफीजम’चा अंगिकार करतात. सुफीजम मध्ये त्या त्या प्रदेशातील मातीचा सुगंध असतो. म्हणजेच मुसलमान हा धर्माने ‘मुस्लीम’ असतो परंतु संस्कृतीने ‘भारतीय’ असतो. इथे संस्कृती म्हणजे भाषा, स्थानिक मातीबद्दलचं प्रेम, पेहराव, खानपान, उत्सव, संगीत व अन्य कला इत्यादी. भारतात जिथे जिथे ‘स्री – सबलीकरणा’चा प्राचीन प्रभाव आजही नीटपणे शिल्लक आहे, तिथे तिथे स्रियांना मुस्लीम समाजात समान वागणूक दिली जाते. माझ्या गावी म्हणजे सोलापूरला आणि तालुक्यांमध्ये मुस्लीम कुटुंबांत स्रियांच्या मताला संपूर्ण आदर मिळतो. मी शाळेत असताना आमच्या ‘सय्यद बाई’ आम्हाला उत्तम शिकवायच्या आणि त्या आम्हा मुलांमध्ये खूप प्रियही होत्या.
भारतातील हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन इ. सर्व महिलांना “निऋती” या आद्य कृषिपालक अशा महान गणनायिकेचा वारसा मिळालेला आहे. स्रियांनी शेतीचा शोध लावला. आजही महाराष्ट्रातील, कर्नाटकातील व अन्य दक्षिणी राज्यांमधील ‘शेतकरी मुस्लीम महिला’ या भारतीय संस्कृती जतन करताना दिसतात. निष्कर्ष असा की धर्म बदलल्याने मातीचा सुगंध म्हणजे संस्कृती बदलण्याची गरज नसते. हां, काळातील बदला सोबत संस्कृतीमधील काही अनावश्यक झालेल्या गोष्टी या काढून टाकायला हव्यात. उदाहरणार्थ, बाह्य आक्रमकांच्या शोषणामुळे राजस्थानात मोठ्या घुंगटची प्रथा चालू झाली जी आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. आजही काही मागासलेल्या राजस्थानी परिवारांमध्ये घुंगट शिल्लक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आंध्र – तेलंगणा या दक्षिणी राज्यांमध्ये उत्तरेच्या तुलनेत बरेच समाजसुधारक होऊन गेले. मुस्लीम सत्यशोधक समाजाची निर्मिती ५० वर्षांपूर्वी झाली आणि हमीद दलवाई साहेबांनी इस्लामी समाजातील सुधारणांचे अवघड काम आरंभिले. यापूर्वी १९ व्या शतकात फातिमा शेख बाईंनी सावित्रीबाईंना शिक्षण प्रसारात जी साथसंगत धैर्याने दिली ती महाराष्ट्रीय सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे ‘मुस्लीम’ उदाहरण आपल्या
डोळ्यांसमोर लगेच येते.
आज जगभरात इस्लामी विचारधारेवर वादविवाद होत आहेत. इस्लाम मधील ‘भाईचारा’ आणि ‘जिहाद’च्या संकल्पनांना कुराण, शरिया व हदीस मधील प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संदर्भांशी जोडत मुस्लीम मागासलेपणाबद्दलही भरपूर चर्चा होते आहे. धर्माधारित इस्लामी देश हे बहुतांशी मागासलेलेच राहिलेत. तेल – उत्पादक इस्लामी देशांतील सुबत्ता ही टिकणारी नाही कारण त्यांचे तेलसाठे येणाऱ्या काही दशकांमध्ये संपायला सुरुवात होईल. युरोप – अमेरिकेने धर्म आणि राजकारण व धर्म आणि विज्ञान यामधील फरक स्पष्ट केल्याने व स्विकारल्याने त्यांची आर्थिक – औद्योगिक – वैज्ञानिक भरभराट झाली. या स्पष्टते मुळेच जर्मनीसह अनेक युरोपीय देशांनी मुस्लीम स्थलांतरीतांना आसरा दिला. आज इंग्लंड आणि फ्रान्समध्ये मुस्लीमांची संख्या बरीच आहे. इंग्लंडमध्ये तर नागरी प्रशासन व राजकारणातही मुस्लीम सक्रीय आहेत. अर्थात सुशिक्षित पश्चिमी देशांतील सुशिक्षित मुस्लीमांनी ‘इस्लामी देशां’मधील अल्पसंख्याक समाजसुधारकांना अधिक पाठबळ देण्याची गरज आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतातील साधारणपणे वीस कोटी मुस्लीमांची सामाजिक – वैज्ञानिक – आर्थिक भूमिका आणि समाजसुधारणेतील सक्रीय सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पाकिस्तानला उठताबसता शिव्या घालणाऱ्या व पाकिस्तानी अर्थव्यवस्थेशी आपली निरर्थक तुलना करणाऱ्या भारतातील काही ‘राष्ट्रवादी’ मंडळींनी हे लक्षात घ्यायला हवे की कोणत्या अशा कारणांसाठी आम्ही त्यांना नुकताच कोविडवरील लशीचा पुरवठा केला. आजही तेल उत्पादक मुस्लीम देशांमधील आमची छवी चांगली आहे, याची तीन कारणे – १. या देशांमधील कष्टाळू व प्रामाणिक भारतीय कर्मचारी २. भारतीय मुस्लीमांचा लोकशाहीतील सहभाग व ३. इस्लामपूर्व प्राचीन संस्कृतीचे शिल्लक राहिलेले व आम्हाला जोडणारे सांस्कृतिक धागेदोरे. या सर्व संदर्भांच्या चौकटीत भारतीय मुस्लीमांची सामुहिक व वैयक्तिक जबाबदारी ही “नवे जग” व “नवा भारत” घडविण्याच्या बाबतीत खूपच वाढलेली आहे. चीनच्या विस्तारवादाविरुद्ध व पाकिस्तानच्या विघातक कारवायांविरुद्ध आम्हाला समस्त मुस्लीम जगताचा ‘सॉफ्ट सपोर्ट’ वापरावा लागणार आहे. याच सोबतीने भारतीय मुस्लीमांनी “भारतीय संविधाना”ची अंमलबजावणी पुढे नेली पाहिजे. ‘देश’ संकल्पनेपासून ‘राष्ट्र’ संकल्पनेच्या संपूर्ण व खऱ्या अंमलबजावणीच्या प्रवासात भारतीय मुस्लीम आपला सहभाग वाढवत जगासमोर एक उत्तम उदाहरण उपस्थित करु शकतील. सम्रुद्ध, सबल, सतर्क, सुरक्षित, सुजाण आणि समताधिष्ठित भारत घडविण्यासाठी अन्य सर्व गोष्टींपेक्षा आमचं ‘संविधान’ महत्वाचं. भारतीय मुस्लीमांचा सांस्कृतिक वारसा इथल्या मातीतलाच असल्याने ‘राष्ट्र उभारणी’च्या कार्यात त्यांनी ‘सुफीजम’ आणि ‘संविधान’ यांचं उत्तुंग मिश्रण अंगिकारावं. थेट इंडोनेशिया ते इराण ते इंग्लंड मधील मुस्लीम हे भारतीय मुस्लीमांचं मग अनुकरण करू शकले तर एक उत्तम नवं जग उभं राहू शकेल.
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.