डॉ. गिरीश जाखोटिया
पार्श्वभूमी – काही दिवसांपूर्वी “चिऊताई चिऊताई दार उघड” असं म्हणणाऱ्या कावळ्याला भोळ्या चिऊने घरात घेतलं होतं. विविध कारणे देत, क्लुप्त्या लढवत नि खोटी आश्वासने देत काऊने चिऊला घराबाहेर काढलं. यास्तव काही दिवसांनी आता चिऊ ही कावळ्याला दार उघडून तिला व तिच्या पिल्लांना घरात घेण्याची आर्जवं करते आहे. चिऊ आणि काऊ काय म्हणताहेत ते पाहूयात —
चिऊ ( विनवणीच्या सुरात ) – काऊ दादा, आम्ही तुला त्रास नाही देणार. माझी पिल्लं खूप छोटी आहेत. बाहेर सोसाट्याचा वारा वाहतोय. आम्हाला आत घे ना.
काऊ ( हळूवार आवाजात) – तू आणि तुझा नवरा तर घरटं बांधण्यात हुशार आहात. एक नवं घरटं बांधा ना. आमच्या ‘काकसंघा’तर्फे तुला बांधकामाची सामग्री द्यायला सांगतो.
चिऊ ( कातरलेल्या स्वरात ) – अरे माझा नवरा वादळात अडकून गायब झालाय. मी एकटी नाही बांधू शकत नवं घरटं.
काऊ ( दांभिकपणाने) अरेरे, हे वाईटच झालं. मला तर घरटं बांधणं जमत नाही. तुला मदत होण्याऐवजी माझ्या लुडबुडीने तुझ्या कामात व्यत्ययच येईल.
चिऊ ( अगतिकतेने ) – अरे दादा, आजची रात्र तरी आम्हाला आसरा दे. आता जोराचा पाऊसही येईल.
काऊ – तू मला ‘दादा’ म्हणून संबोधते आणि मी मात्र ‘दादा’ असण्याची जबाबदारी पार पाडत नाही. (नाटकी स्वरात) कर्तव्य न बजावण्याचं हे पाप मी या जन्मी तरी फेडू शकणार नाही. ( कंठ दाटल्याचं सोंग करतो)
चिऊ ( कोमल स्वरात) – अरे, इतकं वाईट नको वाटून घेऊस. हे बघ, आम्ही इथे पडवीत आजची रात्र काढू कशीबशी.
काउ ( बेरकीपणाने) – ताई, तुम्हाला पडवीत ठेवण्यापेक्षा मी आणि माझी मुले पडवीत रात्र काढू शकतो. माझी बायको ‘कावळी’ ही तापाने फणफणते आहे. तरीही आम्ही राहू पडवीत. पण एक खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. आपल्या दोन कुटुंबांच्या ओझ्याने हे घरटं कोसळेल. मग आपल्या मुलांचं काय होईल ? ( रडवेला आवाज काढतो.)
चिऊ – ओहो, हा ओझ्याचा धोका लक्षात नाही आला माझ्या.
काऊ ( छद्मीपणे) – चिऊताई, आम्ही बाहेर पडू शकतो, परंतु कावळीची तब्येत मग आणखीनच बिघडेल. माझी पोरं तर अगदीच लहान आहेत. पण हे घरटं मुळात तुझं होतं जे आम्हीच व्यापून टाकलंय. सुचत नाही, काय करावं ते. ( गदगदलेला घोगरा स्वर काढतो.)
चिऊ ( समजावणीच्या सुरात) – अरे दादा, असं वाईट नको वाटून घेऊ. आम्ही बघू आमची सोय. तू काकफंडाच्या मदतीबद्दल काही तरी सांगत होतास.
काऊ ( पुन्हा आश्वासक स्वरात) – हां, काकफंडाला मी सांगतो लगेच. पण तू ‘ ‘काक समाजा’तील नसल्याने तुला वेगळा नियम लागू होईल.
चिऊ ( घायकुतीला आल्यासारखी) – अरे, मी कोणताही नियम पाळायला तयार आहे.
काऊ ( सावधपणे बोलल्या सारखा) – काकसंघ तुझं घरटं बांधून झाल्यावरच भरपाई देईल. जाती बाहेर असणाऱ्यांसाठी हा नियम आहेच ना ! आमच्या काक समाजातील सदस्यांनाच सामग्री पुरत नाही.
चिऊ ( काळजीच्या स्वरात ) – अरे दादा, सामग्री नाही, कुणाचा आधार नाही; कसं करायचं मी एकट्या बाईमाणसानं ?
काऊ (समजावणीच्या कृत्रीम आवाजात) – ओहो, मी आलो असतो, पण नियतीने मलाच अगतिक बनवलंय. तुझ्या समाजातील काही बाप्यांना विनंती कर ना. येतील ते मदतीला.
चिऊ ( विनवणीच्या स्वरात ) – तुझ्या काक समाजातून कुणी मदत करेल का मला ?
काऊ ( गंभीर झाल्याचे नाटक करत) – चिऊताई, काक समाज हल्ली स्वतःची ‘आयडेंटिटी’ जपायचं म्हणतोय. म्हणून अन्य समाजांसोबत हल्ली आमचा संपर्क कमी झालाय. पण तू तुझ्या समाजातून मदत घे ना.
चिऊ (उदासपणे) – घेतली असती रे. परंतु मी एकटी बाई पडते ना. कोणता चिमणा मदत न करता गैरफायदा घेईल सांगता येत नाही.
काऊ ( विचारवंताच्या ढंगाने) – ओहो, म्हणजे ही एक सार्वत्रिक समस्या झालीय तर !
चिऊ ( आशेच्या स्वरात ) – काऊ दादा, एक आठवलं. तुम्ही सर्व कावळे कोकिळेची अंडी तुमच्या घरट्यात उबवता ना ? हे मोठंच समाजकार्य करता तुम्ही. मग मला सुद्धा एखादा कावळा मदत करू शकतो ना !
काऊ ( किंचित रागाने ) – अगं कोकिळेला आम्ही अजाणतेपणी मदत करतो. आणि हो, कोकिळा व चिमणी मध्ये बराच फरक आहे ना ? “समाज – साधर्म्य” महत्त्वाचा असतो ना ?
चिऊ ( हताशपणे ) – अरे तू तुझ्या एक – दोन ज्ञाती बांधवांशी माझ्याबद्दल बोलून तरी बघ.
काऊ (अहंकारी स्वरात) – कसं बोलणार मी ? आमची आणि तुमची ‘औकात’ किती भिन्न – भिन्न ! श्राद्धसमयी माणसं फक्त आम्हाला बोलवतात. मृतात्म्याशी आम्हीच त्यांना संपर्क करून देतो. तुम्ही चिमण्या फक्त एखाद्या कवितेत दिसता.
चिऊ ( हताशपणे) – हं, आत्ता कळतंय मला. तुम्ही माणसांच्या सान्निध्यात असता ! माझी अपेक्षाच मग चूक ठरते. ( डोळ्यात थोडे अश्रू जमा होतात.) ठीक आहे काऊ दादा, येते मी.
चिऊ आणि तिची पिल्ले निघून जातात. मोठ्याने हसतच कावळी बाहेर येते.
कावळी ( कौतुकाच्या नजरेने ) – किती हुशारीने नाटकीपणा केलास तू !
कावळा ( आवाजात प्रचंड अहंकार) – अगं माणसांच्या सान्निध्यात राहून एवढं तरी शिकायला हवंच ना ! आपली “कावळे जमात” मूलतःच किती हुशार आहे.
कावळा – कावळी मग फेर धरून नाचू लागतात नि दोन्ही पिल्ले टाळ्या वाजवीत रहातात.
( या लेखनाचा माणसांच्या सामाजिक – राजकीय वर्तनाशी काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा. )
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.
छायाचित्र – सौ. पंचतंत्र कहानियां