मुक्तपीठ टीम
दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे सताड खुली करून देणारे नवे शैक्षणिक धोरण हे तमाम नागरिकांना राज्यघटनेने अभिवचन दिलेली संधीची समानता आणि समान दर्जा नाकारणारे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी शुक्रवारी येथे केले. ते मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त खारघर येथे आयोजित समारंभात बोलत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा साजरा होत असला तरी उच्च शिक्षण हे सर्व थरांपर्यंत न पोहोचता ते मूठभर वर्गाची मक्तेदारी बनले आहे, असे सांगून डॉ डोंगरगावकर म्हणाले की, एकूण साक्षरतेपैकी अनुसूचित जाती जमातीतील केवळ ३ टक्के तर अन्य सर्व समाज घटकातील केवळ ७ टक्के लोक सध्या उच्च शिक्षित आहेत. नवे शैक्षणिक धोरण हे शिक्षणाला महागडे करुन विशिष्ट वर्गाचाच अधिकार बनवणारे आहे. त्यातून दर्जेदार उच्च शिक्षणाला मुकणाऱ्या समाजाची संख्या वाढेल.
पी. ई. सोसायटीने स्वयंपूर्ण विद्यापीठ उभारावे!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेने स्वतःच स्वयंपूर्ण अशी ‘ पीपल्स युनिव्हर्सिटी’ उभारण्याचा प्रकल्प हाती घ्यावा, अशी मागणीही डॉ डोंगरगावकर यांनी यावेळी केली. या संदर्भात आपण स्वतः त्या संस्थेच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, माजी अध्यक्ष डॉ एस पी गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांना पत्रे पाठवली आहेत, असे त्यांनी सांगितले.
पीपल्स एज्युकेश सोसायटीचे मॉडेल हे जागतिक दर्जाचे आहे. ते कॉलेज पातळीवर राबविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ते जागतिक दर्जाच्या विद्यापीठाशी बरोबरी करणारे आहे, असा दावा डॉ डोंगरगावकर यांनी केला.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
- आजच्या कार्यक्रमात गेल्या चार दशकापासून आंबेडकर चळवळीत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
- त्यात सो. ना.कांबळे, एम. के.भालेराव,शिवराम मोहिते, नारायण वाघमारे, सुरेश कोरे यांचा सामावेश होता. त्यांना पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण खंड देवून डोंगरगावकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सो. ना. कांबळे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेपेक्षा समाजिक न्यायांच्या अन्य योजनाचा शिक्षणामुळे लाभ झाला आहे. नामांतर चळवळीतील शहीदाचे स्मारक अथवा नामांतर चळवळीत आर्थिक हानी झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन आजही झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ऍड: लासूरे, ऍड किशोर कांबळे,प्रा मछिंद तिगोटे यांच्या हस्ते प्रतिष्ठान प्रकाशन च्या ‘ प्रजा हित ‘ या पाक्षिकाच्या नामविस्तार विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.