डॉ. किर्ती सबनीस
देशभरात कोरानाविषाणूची दुसरी लाट पसरत आहे. हा विषाणू आता अधिक संक्रमित व संसर्गित आहे. अलिकडील वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता कोरोना अप्रोप्रिएट बीहेवीयरचे पालन केले पाहिजे. ज्यामध्ये मास्क घालणे, सोशल डिस्टिन्सिंग राखणे, हात स्वच्छ धुणे व सॅनिटाइज करणे यांचा समावेश आहे.
खरेतर, या अवघड काळामध्ये दुहेरी मास्क घातल्यामुळे विषाणूपासूनच्या संरक्षणामध्ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी हेाते. सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन (सीडीसी) येथे नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, प्रत्येक व्यक्तीने दुहेरी मास्क घातला तर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता ९६.४ टक्क्यांनी कमी हेाऊ शकते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दुहेरी मास्क घालणे म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती एका मास्कवर दुसरा मास्क घालते तेव्हा त्याला ‘दुहेरी मास्क घालणे’ म्हणतात. बाहेरील मास्क आतील मास्कच्या कोप-यांवर सौम्य दबाव निर्माण करून उत्तम सीलबंद करू शकतो. विषाणू श्वसनमार्गावाटे बाहेर पडणा-या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरत असल्यामुळे मास्कचा हा दुहेरी स्तर फिल्ट्रेशन वाढवण्यामध्ये मदत करू शकतो आणि आसपास असलेली व्यक्ती शिंकल्यास किंवा खोकल्यास त्यापासून संरक्षण करू शकतो.
दुहेरी मास्क कसे व कधी घालावे
- विमानतळ, बस स्टॅण्ड्स अशा गर्दीच्या ठिकाणी जाताना, तसेच कामानिमित्त प्रवास करण्यासाठी सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करताना दुहेरी मास्क घालावेत.
- एका सर्जिकल मास्कवर कापडी मास्क किंवा दोन कापडी मास्क्स; किंवा ३-प्लाय मास्कवर एक कापडी मास्क हे संयोजन उपयुक्त आहे.
- अत्यंत गर्दीच्या ठिकाणी मास्कसोबत फेस शील्ड वापरता येऊ शकते.
- एन-९५ मास्क वापरत असाल तर दुहेरी मास्क घालणे टाळावे.
- विशेषत: मुलांसाठी दुहेरी मास्क घालणे टाळावे.
मास्क घालताना हे करा
- दररोज गरम पाण्यामध्ये कापडी मास्क स्वच्छ धुवा.
- नाक, तोंड व हनवुटीला व्यापून घेत मास्क योग्यरित्या घाला.
- कुटुंबामधील सदस्यांसोबत मास्क्स शेअर करणे टाळा.
- कोणताही मास्क काढल्यानंतर हात सॅनिटाइज करा.
- बंदिस्त कच-याच्या डब्यामध्ये डिस्पोजेबल मास्क टाका.
- ठराविक अंतराने मास्क बदलून नवीन मास्क घाला.
- मास्क घालण्यासोबत सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन करा.
मास्क घालताना हे करू नका
- मानेभोवती किंवा हनवुटीभोवती मास्क ठेवू नका.
- ओले मास्क्स वापरू नका.
- वारंवार मास्कला स्पर्श करू नका.
- बोलताना मास्क काढू नका.
- शिंकताना मास्क काढू नका.
- २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका.
उत्तम सवयींचा अवलंब करण्यासोबत त्यांचे पालन करा, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या, तसेच समाजाच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
(कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इन्फेक्शिअस डिसीज स्पेशालिस्ट डॉ. किर्ती सबनीस)