दिवाकर शेजवळ
आज स्मृतिदिन असलेले दलित पँथरचे संस्थापक- नेते, जागतिक कीर्तीचे महान कवी- विचारवंत नामदेव ढसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि पद्मश्री किताब जरूर मिळाला. पण योग्यता असूनही ‘नोबेल ‘ पासून ते वंचित राहिले. अन राजकारणात तर ते सर्वात अभागीच ठरले. यशवंतराव चव्हाण यांची राजकारणापलीकडे ‘सर्वस्पर्शी’ मैत्रीची संस्कृती आणि परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जपली आहे. ढसाळ यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार- बहुमान मिळाल्यानंतर पवार यांनी फोन केला नाही,असे कसे घडू शकते? पण अभिनंदनासाठी त्यांनी संपर्क केला तरी पवार आणि ढसाळ यांच्यात संवादाची प्रक्रिया गतिमान कधीच होऊ शकली नव्हती. शुभेच्छा- अभिनंदनाची देवाण- घेवाण ही त्या दोघांत निव्वळ ‘उपचार’ राहिली. काँग्रेस- रिपब्लिकन युती झाल्यानंतरही ढसाळ यांना पवार यांच्याशी मिळते जुळते घेताच आले नाही.
यशवंतराव चव्हाण आणि रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळात काँग्रेसशी झालेल्या युतीतून रिपब्लिकन पक्षाला मिळालेली सत्तेची पदे पुढच्या काळात रा सु गवई यांच्या वाट्याला आली होती. पण काँग्रेसमध्ये यशवंतरावांची जागा शरद पवार यांनी घेतल्यानंतर १९९० च्या दशकांच्या प्रारंभी काँग्रेस- रिपब्लिकन युतीचा दुसरा अध्याय तीन दशकांनी सुरू झाला. त्यातून रामदास आठवले,गंगाधर गाढे, दयानंद मस्के,प्रीतमकुमार शेगावकर यांना मंत्रीपदे मिळाली. तर, टी एम कांबळे, अनिल गोंडाणे, सुमंतराव गायकवाड यांना विधान परिषदेतील आमदारकी मिळाली.१९९१ ते २०१४ म्हणजे तब्बल दोन तपे काँग्रेस- राष्ट्रवादीला साथ दिलेले रामदास आठवले हे आता भाजपच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्य मंत्रिपदाची दुसरी ‘ टर्म ‘ उपभोगत आहेत.
शरद पवार यांच्यामुळे सतेची फळे चाखण्याची संधी युती केल्याबद्दल फक्त रिपब्लिकन पक्षालाच मिळाली अशातला भाग नाही. पवार यांनी विधान परिषदेची आमदारकी दलित- मागास – बहुजन समाजातील लक्ष्मण माने, राम पंडागळे,अमोल मिटकरी यांच्यासारख्या तरुण मोहऱ्याना दिली आहे. इतकेच नव्हे तर, दलित चळवळीतून त्यांच्या पक्षात गेलेल्या जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये यांचीही विधान परिषदेवर पवार यांनी वर्णी लावली आहे. सध्या राज्यपालांनी खोडा घातल्यामुळे १२ जागा रिकाम्या पडून असल्या तरी राष्ट्रवादीतर्फे आंबेडकरी कलावंत आनंद शिंदे हे विधान परिषदेत जाण्याच्या मार्गावर आहेत.
पवार यांच्याशी मिळते जुळते घेतले असते तर काँग्रेस- रिपब्लिकन युतीच्याही खूप आधी नामदेव ढसाळ यांना संसदीय राजकारणात शिरकावाची संधी सहज मिळाली असती. पण ढसाळ यांना लवचिक होणे- आपल्या भूमिकेला मुरड घालणे जमले नाही, हेच खरे. राजा ढाले- नामदेव ढसाळ हे ‘ नायक ‘ असलेल्या दलित पँथरचा कालखंड म्हणजे १९७२- १९७५. त्या काळात पँथर कार्यकर्त्यांना पोलिसांची खूपच दमनशाही सोसावी लागली होती. पँथर नेते अटकसत्र आणि खटल्यांच्या चक्रात अडकले होते. अन त्या काळात पोलीस दलाची सूत्रे १९७७ पर्यंत गृह राज्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्या हाती होती. त्यावरून ढसाळ यांच्या मनात पवार यांच्याविषयी निर्माण झालेली अढी अखेरपर्यंत दूर होऊ शकली नव्हती.
शरद पवार हेच बराच काळ राज्यातील काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि सर्वशक्तिमान नेते होते. त्यांच्याशी तडजोड न करण्यावर ठाम राहण्याच्या भूमिकेतून नामदेव ढसाळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ‘ कलावंत ‘ म्हणून असलेल्या मैत्रीतून शिवसेनेशी दोस्ती करणे श्रेयस्कर समजले. पण दीर्घकाळ शिवसेनेसोबत राहूनही त्यांच्यासाठी संसदीय राजकारणाचे दार काही खुले होऊ शकले नाही.
त्या काळात काँग्रेस विरुद्ध शिवसेना- भाजप युती असा राजकीय सामना राज्यात होता हे खरे. पण पवार – ठाकरे यांच्यात कोणतेही वितुष्ट,वैर- वैमनस्य नव्हते. किंबहूना, शिवसेनाप्रमुखांच्या दिलदार मैत्रीच्या प्रेमात पवार होते! अन पवार हे तर स्वतः यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वस्पर्शी मैत्रीच्या संस्कृतीचे पाईक. या परिस्थितीने नामदेव ढसाळ यांना राजकारणात ‘ निर्वासित’ करून टाकले हेच त्यांच्या शोकांतिकेमागील सत्य आहे.
(दिवाकर शेजवळ हे ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक क्षेत्रातही ते दलित चळवळीतील विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय होते. सध्या ते ‘आंबेडकरी संग्राम’चे नेतृत्व करतात.)