मुक्तपीठ टीम
ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके, अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव डॉ.निलीमा करकेट्टा, आयसीएमआरच्या संचालिका डॉ.गीतांजली सचदेव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. याबाबतच्या काही गैरसमजुती दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे सूचित केले. pic.twitter.com/vclH5hB2e8
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) November 11, 2021
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. या दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. सर्पदंशाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्याचे आव्हान आहे. जुन्नर, आंबेगाव, मंचर तालुक्यातील सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्यात यश आले आहे. मात्र राज्यभरात अशा प्रकारे काम करायला हवे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी प्रशिक्षण संस्था तयार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.
सर्पदंशाने होणारा मृत्यू नोटीफाईड डिसीज म्हणून समावेश करण्यात येईल. सर्पदंशावर होणा-या उपचारासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार केला जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
डॉ. सदानंद राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, सर्पदंशामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना विशेषत: करुन शेतकरी शेतमजूर यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. डी. सी. पटेल, डॉ. प्रियंका कदम, अशोक हांडे, डॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.