दिलीप नारायणराव डाळीमकर/ व्हाअभिव्यक्त
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष,पदाधिकारी सरकारी कार्यालयात निवेदन देतांना आपण बघत असतो. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपणच कसे प्रयत्नशील आहोत हे दाखविण्यासाठी बातम्या वर्तमानपत्र, सोशल मीडियावर रंगविल्या जातात. निवेदन किंवा सरकारी कार्यालयात जनतेच्या प्रश्नासाठी अर्ज केल्याचे फोटो हे नेते कार्यकर्ते प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडियावर व्हायरल करत असतात.
एखादा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज करणे,निवेदन देणे हा प्रश्न सोडविण्यासाठीचा एक छोटासा भाग.नागरी समस्यांबाबत निवेदन देणे हे सोपे आहे.पण ती नागरी समस्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे हे त्यामानाने खूप कठीण व कष्टाचे काम.
निवेदन देणारे कार्यकर्ते व नेते दोन प्रकारचे असतात.
१) निवेदन देऊन त्याचा सतत प्रामाणिकपणे पाठपुरावा करुन प्रश्न सोडविणारे
२)निवेदन देऊन त्याची मीडियात जाहिरात करणारे व प्रत्यक्षात त्या प्रश्नांचा पाठवपुरावा न करणारे.
पहिल्या प्रकारचे नेते हे सच्चे समाजसेवक तर दुसऱ्या प्रकारच्या नेते, कार्यकर्त्यांबद्दल निवेदनजीवी हा शब्द वापरणे संयुक्तिक ठरेल.निवेदनजीवी राजकीय व सामाजिक नेते, कार्यकर्ते फक्त सरकारी कार्यालयात निवेदन देऊन फोटो व त्याचे फोटो झळकवून मोकळे होतात.
कोणतीही नागरी समस्या सोडविताना त्या समस्येविषयीचे संपूर्ण ज्ञान निवेदन देणाऱ्याला असले पाहिजे. विषयाची सखोल माहिती नसेल व त्या संबधी ज्ञान नसेल तर फक्त निवेदन देऊन प्रश्न सुटण्याची शक्यता कमीच असते.
माझ्या वैयक्तिक अनुभव असा आहे की फक्त अर्ज करून, निवेदन देऊन कधीही समस्या सुटत नसतात तर त्यासाठी योग्यरितीने पाठपुरावा करणे गरजेचे असते. बरेच लोक निवेदन दिल्यानंतर लगेच आंदोलन, उपोषण हे मार्ग निवडतात.
वस्तुस्थितीचा विचार केला तर निवेदन दिल्यानंतर सरकारी विभागाला त्या समस्यांचा जाणून घेण्यास व त्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे.
सरकारकडे एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला निवेदन दिल्यानंतर संबंधित विभागाला स्मरण पत्र द्यावे. संबंधित विभागाच्या अधिकार्यकडून दखल घेतली जात नसेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागावी त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नसेल, तर आंदोलनाचा मार्ग पत्करवा.
बऱ्याच वेळा असे दिसून येते की एक निवेदन दिल्यानंतर, थेट उपोषणाचे आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रश्नाची दखल घेण्यास पुरेसा अवधी न देता आंदोलनाची घाई करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या प्रश्नाचे श्रेय अन्य कोणाला जाऊ द्यायचे नसते. त्यामुळे किरकोळ प्रश्नांवरही ते आंदोलन करतात. गंभीर प्रश्नांबाबत मात्र कोणीही पुढे येताना दिसत नाही.
खरंच जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे असतील तर चमकोगिरी न करता अर्ज केल्यानंतर किंवा तक्रार दाखल केल्यानंतर सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा नियमितपणे करणे गरजेचे असते. हे करत असतांना लोकांनी लोकप्रतिनिधी असो वा सरकारी अधिकारी यांचेशी बोलतांना नम्र भाषा ठेवली पाहिजे. जनतेने लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांना शिवीगाळ करून कधीही समस्या सुटत नसतात.
प्रश्न सोडविण्यासाठी वेळ हा कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. काही कामे एका दिवसात होण्यासारखे असतात काहींना महिने तर काही कामाला वर्ष सुद्धा लागू शकते.
जनतेच्या अनेक समस्यांवर काम करत असतानाच माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की निवेदन दिल्यानंतर जर पूर्ण ताकदीने व नियमितपणे त्या प्रश्नचा पाठपुरावा केला तरच तो प्रश्न सुटतो.
जनतेच्या समस्या खरच प्रामाणिकपणे सोडवायचा असतील त्यासाठी पाठपुरावा करण्याची खरंच गरज आहे. तीच आपणाकडून अपेक्षा.
(शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन)