मुक्तपीठ टीम
डिलिव्हरीचा तसा नवा ड्रोन टप्पाही आता जुना वाटणार आहे. कारण आता अमेरिकेतील एक कंपनी थेट अंतराळातून डिलिव्हरी करणार आहे. स्पेस कॅप्सुलच्या माध्यमातून पृथ्वीवर पाहिजे तिथं ही डिलिव्हरी शक्य असेल. आजवर जमीन-आकाश-पाणी यातून होणारी डिलिव्हरी आपल्याला ठाऊक आहे. गेले काही दिवस ड्रोनच्या मदतीने डिलिव्हरीचं नवं पर्व सुरु झालं आहे. मात्र, आता हे नवं पर्वही जुनं वाटेल असं नवं काही घडतंय. अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने एक विशेष कॅप्सूल बनवला आहे. हा स्पेस कॅप्सुल बाहेरील अंतराळातून जगातील कानाकोपऱ्यात वस्तू पोहचवण्याचे काम करेल. या नव्या पद्धतीमुळे जगात वस्तू पोहोचवण्याचे तंत्रच बदलणार आहे. त्यामुळे पुरवठा साखळीच्या तंत्रात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या इनवर्जन स्पेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या नवीन स्पेस कॅप्सूलच्या माध्यमातून जगात कोणत्याही कानाकोपऱ्यात अंतराळाच्या माध्यमातून वस्तू पोहोचवू शकतात. लॉस एजेलिसच्या या स्टार्टअप कंपनीने २०२१मध्ये एक कोटी डॉलर्स भांडवल जमवले होते. त्याचा उपयोग अंतराळातून पृथ्वीवर वस्तू आणण्यासाठी रिएंट्री तंत्राची स्पेस कॅप्सूल विकसित करण्यासाठी होत आहे.
कंपनी या परतीच्या यानाला व्यवसायिक आणि सुरक्षा उद्योगांसाठी बनवत आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर पुरवठा वितरण करण्यासोबतच स्पेस स्टेशनना पुरवठ्यासाठीही मदत करू शकते. हे रियूजेबल कॅप्सूल अंतराळात अधिक कालावधीसाठी येण्या-जाण्यासाठी सक्षम असेल. तसेच अंतराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर वस्तू पोहोचवू शकेल. कंपनीला आशा आहे की, या वस्तूची सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रात मागणी वाढेल.
नासासुद्धा अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्रावर भर देत आहे. रियूजेबल कॅप्सूल नवीन अंतराळ बाजारात मोठे योगदान देऊ शकते. यावेळेस कंपनी चार फुट कॅप्सूलवर अधिक भर देऊन काम करत आहे. ते स्पेस कॅप्सुल त्या आकाराच्या सूटकेससारख्या वस्तू घेऊन जाण्यास समर्थ राहील.
पॅराशूट परीक्षण
- या विशेष पद्धतीच्या स्पेस कॅप्सुल आणि त्यांचे तंत्र २०२५ पर्यंत विकसित होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
- सध्या १.५ फूट व्यास कॅप्सूलचे परिक्षण केले जात आहे.
- ही पद्धत प्रदर्शक रूपात काम करेल.
- कंपनीने नुकतंच रे च्या पॅराशूटचेही परिक्षण केले आहे.
- ज्यात ३०००० फूट उंचीने विमानाच्या माध्यमातून एक बशी सारख्या वस्तूला खाली सोडण्यात आले.
कॅप्सूल अवकाशात स्वतःच फिरेल
- जेव्हा ही यंत्रणा पूर्णपणे विकसित होईल, तेव्हा हे यान पृथ्वीच्या बाह्य वातावरणाला आवाजाच्या २५ पट वेगाने धडकेल आणि सॉफ्टलँडिंगसाठी पॅराशूट वापरेल.
- एकदा ते त्याच्या कक्षेत पोहोचल्यानंतर, कॅप्सूल एकतर खासगी व्यावसायिक अंतराळ स्थानकाकडे स्वतःचा मार्ग शोधेल किंवा स्वतःच्या कक्षेत राहील.
येत्या काळात हजारो अंतराळ कंटेनर!
- या कॅप्सूलसाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
- कंपनी २०२ मध्ये लहान कॅप्सूलचे तंत्रज्ञान प्रदर्शित करेल.
- कंपनीला आशा आहे की एक दिवस ते देखील असे हजारो कंटेनर पाच वर्षे अंतराळात ठेवण्यास सक्षम असतील.