दयानंद खरात
ज्यावेळेस भारतातील दलित समाज हिंदू असूनही अस्पृश्य म्हणून गणला जात होता जातीयवादाच्या विळख्यात आणि अंधश्रध्येच्या बाहूपाशात कष्ट करूनही सवर्णाच्या गुलामगिरीत जगत होता. बारा बलुतेदार म्हणून कष्ट करूनही उष्ट इटकं अन्न खाण्याची वेळ या समाजावर आली होती. अशाच काळात माझे आजोबा रामा महार आणि आजी सावित्री यांच्या पोटी माझ्या वडिलांचे मोठे भाऊ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांचा जन्म झाला. त्याकाळात सुद्धा माझ्या आजोबांना (रामा महार) शिक्षणाची आस्था होती. या आस्थेपोटीच त्यांनी डॉ शंकरराव यांना शाळेत घातले आणि पुढे आटपाडी पासून 70 किलोमीटर असणाऱ्या औध संस्थानात शाळेत पाठवले. डॉ. शंकरराव लहान असतानाच माझ्या आजीच्या छातीवर मांजरीने चावा घेतला, ती जखम दोन वर्ष भरून आली नाही. आजूबाजूच्या आया बाया माझ्या आजीला म्हणू लागल्या दवाखान्याने काही होणार नाही. तुम्ही धरम पाळत नाही. म्हसोबाला बोकड कापा, मग जखम बरी होईल. परंतु माझ्या आजीने त्यासाठी ठाम नकार दिला. कारण त्याकाळातसुद्धा आमच्या आजोबा (रामा महार) आणि आजीवर (सावित्री) देवभोळेपणाचं आणि अंधश्रध्येचं भूत नव्हतं. पुढे डॉ. शंकरराव चौथीमध्ये असताना आमच्या समाजामध्ये कोणीतरी रेडा कापतंय, बातमी समजली त्यावेळेस डॉ. शंकरराव लहान असताना तिथे जाऊन त्या लोकांना म्हणाले मी पोलिसात जाऊन तुमची तक्रार करेन. रेडा कापू नका.
याच कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती लढ्याचे वादळ सुरु झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंढरपूरला येणार अशी वार्ता गावागावात येऊन धडकली. घरात पंढरपूरला जाण्यासाठी पैसा दीडका नव्हता. पंढरपूरला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागत होते. काहीही करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहायचं असा ध्यास घेतलेल्या डॉ. शंकररावांनी पळत पंढरपूरला जायचं ठरवलं. पुढे डॉ.शंकरराव यांच्या मागे दोन मित्र पळत निघाले. जाताना माझे वडील ज्ञानेश्वर खरात त्यांच्या बरोबर निघाले. त्यावेळी डॉ. शंकरराव माझ्या वडिलांना म्हणाले ज्ञानु तू लहान आहे तुला पंढरपूरपर्यंत पळता येणार नाही. परंतु शंकरराव गेल्यावर, लगेच त्यांच्या मागे माझे वडील पंढरपूरला पळत गेले. हा आंबेडकरी सूर्याला पाहण्याचा ध्यास होता. पुढे डॉ. शंकरराव खरात औंधवरून साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आणि पुणे येथील नाना पेठेत अहिल्याश्रमात राहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. बी. सी. कांबळे आणि डॉ. शंकरराव खरात यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांची संघटना स्थापन केली. बी ए ओनर्स आणि एल एल बी ची पदवी घेतल्यावर 19/2 सोमवार पेठेत वकिलीची सनद मिळवुन वकिली सुरु केली. थोडयाच दिवसात दीनदुबळ्यांचे फाटक्या गरिबांचे वकील म्हणून पुण्यात प्रसिद्ध झाले.
त्याच वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जवळचा संबंध आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल कस्ट फेडरेशनचे डॉ. शंकरराव खरात संघटक सेक्रेटरी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहरोड येथे गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्याचं ठरवलं आणि देहूरोड येथे आल्यावर बुद्धांची मूर्ती शंकरराव यांच्याकडे दिली. याच कार्यक्रमात झेंडावंदन करण्यास सांगितले. डॉ. शंकरराव यांनी पंचशील झेंड्याचं झेंडावंदन केले. हाच आमच्या खरात घराण्याचा गर्वाचा क्षण आहे.
डॉ. शंकरराव शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाचे संघटक सेक्रेटरी असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर उत्तर भारत आणि लाहोरचाही दौरा केला. नंतर डॉ. बाबासाहेब दिल्लीत आल्यावर दोन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी डॉ. शंकरराव राहिले सकाळचे जेवण डॉ. बाबासाहेब यांच्याबरोबर करून संसद भवनात गेले. संसदेत डॉ. बाबासाहेब भाषण कसे करतात हे प्रेक्षक गॅलरीतुन पाहिलं.
डॉ. बाबासाहेब यांच्या महापरीनिर्वाणानंतर डॉ. बाबासाहेब चालवत असलेल्या प्रबुद्ध भारत या पेपरचे कार्यकारी संपादकपदी एकमताने डॉ. शंकरराव खरात यांची निवड झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष स्थापन करण्याची प्रोसिडींग डॉ. शंकरराव यांनी अहमदनगर येथील मिटिंग मध्ये लिहिले. त्यानंतर डॉ. शंकरराव यांनी शेकडो पदे भूषवली. परंतु औरंगाबाद येथे विद्यापीठ नामांतर चळवळ सुरु होण्याअगोदर डॉ. शंकरराव औरंगाबाद येथील विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्याचवेळेस नामांतर लढ्याची सुरवात झाली पुढे औरंगाबाद येथील बैठका घेऊन नामांतर होण्यासाठी काय करावे यासाठी डॉ. शंकररावांनी प्रयत्न केले. त्यानंतर माननीय यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत भारताचे अत्यंत मोठे पद द्यायचं ठरलं होते. परंतु शंकरराव यांनी यासाठी नकार देऊन मी रिपब्लिकन पक्षाचा पडेल खासदार झालो तरी चालेल त्यापेक्षा मला कोणतेही पद महत्वाचे वाटत नाही, असं सांगितले.
पुढे डॉ. शंकरराव मोठे साहित्यिक झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परंतु आपणास पूर्ण वेळ रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत भाग घेता आला नाही अशी खंत त्यांच्या मनात राहिली. एक दिवस मला म्हणाले तु जिल्हा परिषदेचा कामगार नेता झाला. परंतु आंबेडकरी चळवळीत शोषित आणि वंचित समाजाचा लढा तीव्र करण्यासाठी अन्याय-अत्याचाराला आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या घरातील कोणीतरी आंबेडकरी चळवळीत काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
त्यामुळे माझा मुलगा सचिन खरात हा आंबेडकरी चळवळीत अग्रेसरपणे वावरत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा आरपीआय (खरात) गट स्थापन करून काम करत आहे. माझे चुलते साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांना जन्मशताब्दी निमित्त अभिवादन!
(लेखक दयानंद खरात हे साहित्यिक शंकरराव खरात यांचे पुतणे)