मुक्तपीठ टीम
भारतात डिजिटलायझेशनचा स्वीकार जितका सहजरित्या केला जात आहे तितकीच, सायबर गुन्हेगारीही क्षणाक्षणाला वाढत आहे. एक चूकीचा नंबर किंवा इतर काही कारणांमुळे झटक्यात अकाउंट रिकामे होण्यास वेळ लागत नाही. एम्स नवी दिल्ली ही देशातील एक महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे, कारण तिच्याकडे देशातील करोडो रुग्णांसह सर्वोच्च नेतृत्वाशी संबंधित माहिती आहे. गेल्या महिन्यातच एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसवर मोठा सायबर हल्ला झाला. त्यामुळे संस्थेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. हल्ल्यानंतर एम्सच्या बहुतांश सर्व्हरने काम करणे बंद केले. अशाप्रकारे देश सध्या सायबर गुन्हेगारीला बळी पडत आहे.
एम्समध्ये हा प्रकार घडल्यानंतर आपत्कालीन, बाह्यरुग्ण, आंतररुग्ण आणि प्रयोगशाळा शाखांसह सर्व कामे संगणकाऐवजी हाताने करावी लागली. हे सर्व एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालू राहिले, कारण प्रभावित सर्व्हरची ओळख पटल्यानंतर सर्व्हर सॅनिटाइझ केले जात होते. देशातील वैद्यकीय संस्थांवर झालेला हा पहिलाच सायबर हल्ला नसून या वर्षात या संस्थांवर असे अनेक हल्ले झाले आहेत.
संशोधन डेटामुळे सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर एम्स!
- अलिकडच्या काही वर्षांत आरोग्य सुविधांवरील सायबर हल्ले वाढले आहेत आणि आता ते सामान्य होत आहेत.
- यामध्ये महामारीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- या काळात रूग्णांची वाढती संख्या, ढासळलेली वैद्यकीय सेवा आणि इतर आरोग्य सुविधांशी रूग्णालये संघर्ष करत असताना सायबर गुन्हेगारांनी त्यांना लक्ष्य बनवले.
- यावेळी, हॅकर्स आणि गुन्हेगारी सिंडिकेट्सना हे समजले आहे की, या संस्था त्यांच्या क्लिनिकल पद्धतींसाठी तसेच त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या अहवालांसह डिजिटल सिस्टमवर अवलंबून आहेत.
- अशा परिस्थितीत डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता दोन्ही धोक्यात येतात.
आशियाई प्रदेशात, ज्या क्षेत्रांवर हॅकर्स सर्वाधिक लक्ष ठेवून आहेत ते भारतीय बँकिंग वित्त सेवा आणि विमाशी संबंधित आहेत. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावरील हल्ल्यांमध्ये तीव्र वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनेही पुष्टी दिली आहे. या वर्षी २ ऑगस्ट रोजी सरकारने संसदेत सांगितले की बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर सायबर हल्ले वाढले आहेत.
सायबर गुन्हेगारींचे वाढते धोके… ‘हे’ देश या हल्ल्यात सामील!
- या वर्षात आतापर्यंत भारतीय आरोग्य क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान, चीन आणि व्हिएतनामचा हात असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
- २०२२च्या पहिल्या तिमाहीत भारतात १ कोटी, ८०लाख सायबर हल्ले आणि दोन लाख सायबर सुरक्षा धोके नोंदवले गेले.
- इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच CERT-In नुसार, २०२२च्या पहिल्या सहामाहीत देशात ६.७ लाखांहून अधिक सायबर सुरक्षा धोक्याच्या घटना नोंदवण्यात आल्या.
- डेटा चोरीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक ७वा आहे.