मुक्तपीठ टीम
देशात कोरोना लसींचा तुडवडा निर्माण झाला आहे. याचा चांगलाच फटका लसीकरणाला बसला आहे. केंद्र सरकारने वर्षाच्या अखेरीस सर्व प्रौढ भारतीय नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी जुलैपासून दिवसाला एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य होते. ते शक्य झालेले नाही. उलट लसींचा तुटवडा वाढत आहे. आता केंद्राकडून टंचाई संपवण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना लस टंचाई कशी संपणार?
• जुलै महिन्यात लसींचे १२ कोटी डोस उपलब्ध होतील, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
• खरंतर लक्ष्य साध्य करण्यासाठी ३० कोटी डोसची घोषणा झाली होती.
• हे डोस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे आहेत.
• ऑगस्ट-सप्टेंबरपासून त्यांच्या उत्पादनात किंचित वाढ होईल.
• झायडल कॅडिलाची लस तयार आहे आणि मंजुरी प्रक्रियेत आहे.
• यासह बायोलॉजिकल ई लसीची चाचणीही जवळजवळ पूर्ण झाली असून ऑगस्टपासून लसींचा पुरवठाही सुरू होण्याची शक्यता आहे.
• कॅडिलाचे प्रारंभिक उत्पादन दरमहा १-२ कोटी आणि बायोलॉजिकल ईचे ४-५ कोटी उत्पादन अपेक्षित आहे.
ऑगस्टपासून इतर लसींची आयातही शक्य!
• दरम्यान, हिमाचलमध्ये स्पुटनिक लसीचे उत्पादन सुरू झाले आहे. तर त्या लसीचे डोसही रशियाकडून आयात करण्यात येत आहेत.
• दुसरीकडे, लस खरेदीसाठी मॉडर्ना आणि सिप्ला यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मॉडर्नाची लसही पुढच्या महिन्यापासून आयात केली जाऊ शकते. फायझरशी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
• दोन महिन्यांत पुरवठा शक्य आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टपासून लसींची उपलब्धता वाढण्यास सुरूवात होईल आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दररोज एक कोटी लस देण्याचे लक्ष्य गाठले जाऊ शकते.
लसीकरण लक्ष्य साध्य करण्यासाठी किती डोस?
• डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी, प्रौढ लोकसंख्या ९४ कोटी असल्याने सुमारे १८८ कोटी डोसची आवश्यकता भासणार आहे.
• त्यापैकी आतापर्यंत ३८ कोटी डोस देण्यात आले आहेत.
• सध्याच्या १२ कोटी दराने येत्या सहा महिन्यांत ७२ कोटी डोस दिले जाऊ शकतात.
• अशा प्रकारे ७८ कोटी डोस कमी पडतील.
• परंतु नवीन लस आल्यावर सप्टेंबरपासून दररोज ८०-९०लाख लस उपलब्ध होतील.