मुक्तपीठ टीम
“जगात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे, ही मोहीम वेगाने पार पाडली जात आहे. परंतु त्यास अधिक वेग द्यावे लागेल. अन्यथा, या नवीन स्ट्रेनचा संसर्ग ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे त्यांनाही होऊ शकतो. तसेच कोरोना लस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होऊ शकतो”, असा अमेरिकन तज्ञांनी इशारा दिला आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आपत्कालीन चिकित्सक आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापिका लीना वेन म्हणाल्या की, “कोरोना लसीसंबंधीत असे लक्ष्य ठेवले पाहिजे जसे आपण चंद्रावर जाण्यासाठी ठेवले आहे. हलगर्जीचे एक पाऊलही महागात पडेल. त्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाला कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल”.
तज्ञांचा सल्ला
ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्याकडून विषाणूच्या संसर्गाची गती मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संशोधक शक्य तितक्या लवकर या रोगविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्याचा आग्रह करत आहेत. जेणेकरून विषाणूला विकासित होण्यासाठी जास्त संधी मिळणार नाही. या कारणास्तव संशोधक देखील निरोगी लोकांवर लसीकरण करण्याचे आग्रह करत आहेत. कारण या लसीकरणामुळे सर्वांचे संरक्षण होईल.
भारतात लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज
लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका आणि ब्रिटनचा पहिला क्रमांक आहेत. तर त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पण याकडे बारकाईने पाहिले तर भारत अजून खूप मागे असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत कोरोना लसीचे साडेपाच कोटी, तर ब्रिटनमध्ये १.६ कोटी डोस देण्यात आले आहेत. तर भारतात महिनाभरात कोरोना लसीचे सुमारे ९० लाख डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत कोरोनाविरोधातील १२ वेगवेगळ्या लसींच्या ४८० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. तर भारतात कोरोना लसींच्या ३६० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. उत्पादन क्षमता आणि लसींच्या वापरातील तफावत कमी करण्यासाठी तत्काळ धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.