मुक्तपीठ टीम
कोरोनाची बाधा आणि मृत्यू यांचा अति वायू प्रदूषणाशी थेट संबंध असल्याचे संशोधनात आढळले आहे. वाहतूक व त्या खालोखाल औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रदूषण असलेले मुंबई आणि पुणे देशातील कोरोनासाठीच्या संवेदनशील ठिकाणांपैकीही असल्याचे हा अहवाल सांगतो. अशा प्रकारचे हे पहिलेच देशव्यापी संशोधन आहे. महाराष्ट्रात अतिप्रदूषित भागातील रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. पुण्याचे आयआयटीएम, भुवनेश्वरचे उत्कल विद्यापीठ, आयआयटी भुवनेश्वर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राऊरकेला या नामांकित संस्थांशी संबंधित तज्ज्ञांनी हे संशोधन केले आहे.
देशात पीएम २.५ चे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च वार्षिक उत्सर्जन महाराष्ट्रात आहे, तर कोरोनामुळे झालेले मृत्यू महाराष्ट्रातच सर्वाधिक नोंदवले असल्याने वायू प्रदूषण आणि कोरोना ची लागण याचा थेट संबंधदिसून येतो, असेही संशोधन अहवालात मांडण्यात आले आहे.
सूक्ष्म पार्टिक्युलेट मॅटर (पीएम२.५) ग्रस्त प्रदेश आणि कोरोना यांचा संबंध देशभरातील मानवनिर्मित प्रदूषणाचे स्त्रोत आणि हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी यांच्या आधारे स्थापित करणे असे या अहवालाचे शीर्षक आहे. या संशोधन अहवालाने अति वायू प्रदूषण असलेल्या
भागातील रहिवाशी कोरोना ला बळी पडण्याची जास्त शक्यता असल्याचा पहिला पुरावा दिला आहे.
प्रदूषण कसे?
हवेत वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्म कण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानिकारक असतात. यापैकी पीएम२.५ या छोट्या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटरहून कमी असतो. हे कण अनेक दिवस किंवा आठवडे हवेत राहू शकत असल्याने
तसेच फुप्फुसात प्रवेश करू शकण्याइतके सूक्ष्म असल्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम घडवू शकतात, असे मानले जाते.
संशोधन करणारी टीम
संशोधकांमध्ये उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वरचे डॉ. सरोज कुमार साहू, पीजी पर्यावरण शास्त्र आणि पूनम मंगराज, पीजी पर्यावरण शास्त्र, आयआयटीएम पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुफरान बेग आणि शास्त्रज्ञ सुवर्णा टिकले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राऊरकेलाचे भीष्म त्यागी व आयआयटी भुवनेश्वरचे व्ही. विनोज यांचा समावेश आहे.
संशोधनाची कार्यपद्धती
संशोधनात मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळातील कोरोना केसेसचे निरीक्षण करण्यात आले तर राष्ट्रीय पीएम२.५ उत्सर्जनाच्या प्रमाणाचे आधारवर्ष २०१९ गृहीत धरले होते.
संशोधनासाठी देशभरातील विशिष्ट विभाग वेगवेगळ्या संवेदनशील प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते. ३६ राज्यांमधून १६ शहरांपैकी मुंबई आणि पुणे या दोन शहरांची महाराष्ट्रातून (झोन सहामध्ये मोडणारी) निवड करण्यात आली होती. संशोधकांनी संपूर्ण देशातून वर्षभरातील सूक्ष्मकणांच्या (पीएम२.५) प्रदूषणाचे एकूण उत्सर्जन हाय रिझोल्युशन ग्रीड (१० किमी बाय १० किमी) पद्धतीने मोजले. त्यांनी उत्सर्जनाची नवीन आकडेवारीही बनवली जिचे कोरोना पॉझिटिव केसेस आणि मृत्युच्या आकडेवारीसह विश्लेषण केले गेले. संशोधनाला देशभरातील १६ ठिकाणांहून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीचाही आधार आहे.
संशोधनाचे निष्कर्ष
संशोधनातील आघाडीचे संशोधक डॉ. सरोज कुमार साहू म्हणाले, “जिल्हा पातळीवरील वायू प्रदूषणाची आकडेवारी आणि कोरोना केसेस यांच्यात लक्षणीय सहसंबंध असल्याचे आमचे निष्कर्ष दाखवतात. आम्हाला असे आढळले की पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांचे वाहतूक
आणि औद्योगिक क्षेत्रातील ज्वलन जास्त असलेल्या भागात कोरोना केसेस जास्त आहेत.
वायू प्रदूषण आणि कोरोना यांच्या आरोग्यावरील परिणामांत समान दुवे आहेत. पीएम२.५ हे उर्ध्व श्वसन संस्थेला बाधित करणारे सूक्ष्म कण असून, कोरोनाचेही आरोग्यावर तसेच परिणाम होतात.”
राष्ट्रीय उत्सर्जनाच्या आम्ही बनवलेल्या यादीनुसार महाराष्ट्राने वर्षभरात पीएम२.५चे भारतात दुसऱ्या क्रमांकाचे (उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर होता) ८२८.३ गिगाग्रॅम उत्सर्जन नोंदवले, असे
डॉ. साहू म्हणाले.
याच काळात म्हणजे ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात १७.१९ लाख कोविड केसेस नोंदवल्या गेल्या, ज्या भारतात सर्वाधिक होत्या. पीएम२.५ च्या दरडोई उत्सर्जनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या पुढे आहे, हे लक्षात घेणे इथे महत्त्वाचे आहे, असे डॉ. साहू म्हणाले.
संशोधनात समाविष्ट असलेल्या १६ शहरांपैकी हवेच्या खराब गुणवत्ता दिवसांच्या बाबतीत मुंबई आणि पुणे यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक नोंदवला. मुंबईत १६५ दिवस हवेच्या खराब गुणवत्तेचे नोंदवले गेले तर पुण्यात ते ११७ दिवस होते. त्यासोबत मुंबईत याच
काळात २.६४ लाख कोरोना केसेस आणि १०,४४५ मृत्यू, जे देशात सर्वोच्च होते, तर पुण्यात ३.३८ लाख कोरोना केसेस आणि ७,०६० मृत्यू नोंदवले गेले.
डॉ. साहूंनी अधोरेखित केले, की महाराष्ट्र पीएम२.५ च्या उच्च उत्सर्जनासह आघाडीच्या औद्योगिकृत आणि विकसित राज्यांपैकी एक असून जिल्हावार उत्सर्जनाची आकडेवारी पाहता मुंबईने पुण्याहून जास्त प्रदूषण अनुभवले.
डॉ. साहू म्हणाले, “मुंबई आणि पुण्याशिवाय उच्च प्रदूषण पातळी असलेले नागपूर आणि चंद्रपूर या आणखी दोन संवेदनशील ठिकाणी कोरोना केसेस आणि मृत्यू जास्त असल्याचे संशोधनात आढळले. जरी ही दोन शहरं थेट संशोधनात समाविष्ट नसली तरी दोन्ही ठिकाणी
प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक आणि उर्जा प्रकल्पांच्या उपस्थितीमुळे ती महाराष्ट्रातील संवेदनशील ठिकाणं ठरतात.”
वायू प्रदूषणाचे स्त्रोत आणि कोरोना यामधील दुवा
महाराष्ट्र हे प्रदूषण करणारे आघाडीचे राज्य असून, रस्ता वाहतूक हा विभाग सर्वांत मोठा प्रदूषक आहे. त्यानंतर अनुक्रमे औद्योगिक क्षेत्र, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आणि जैव कचरा ज्वलन यांचा क्रमांक लागतो.
याबाबत काळजी करण्याचे कारण असे आहे की, करोना विषाणू पीएम२.५ सारख्या सूक्ष्म कणांना चिकटतो, असे पुरावे आहेत. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिका्णी पोचण्याचे माध्यम मिळून हवेतून कोरोना चा प्रसार तुलनेने अधिक होतो. आमच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, वाढते प्रदूषण कोरोना केसेस वाढवण्यासाठी चालना देणारे ठरत आहे. प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी कोरोना नंतर दीर्घकालीन परिणामांना सामोरे जावे लागत आहे आणि हे समजून घेण्यासाठी या दिशेने अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. साहू म्हणाले.
सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च चे संस्थापक प्रकल्प संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच या संशोधन अहवालाचे सहलेखक डॉ. गुफरान बेग म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रदूषणाच्या संवेदनशील ठिकाणच्या दैनंदिन वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे फुप्फूस कमजोर होऊ शकते. जेव्हा मानवनिर्मित उत्सर्जन आणि कोरोना विषाणू यांची बेरीज होते तेव्हा फुप्फुसांचे नुकसान तीव्र गतीने होऊन प्रकृती जास्त खालावते.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
1) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात यासारख्या राज्यांत, जिथे पीएम२.५ ची घनता तुलनेने अधिक आहे, कोरोना च्या केसेस जास्त आढळल्या आहेत.
2) मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद यासारख्या महानगरांमध्ये कोरोनाच्या केसेस सर्वाधिक आढळल्या आहेत. खनिज तेल ज्वलनाधारित मानवी उपक्रमांमुळे पीएम२.५ च्या उत्सर्जनाचे प्रमाण वरील ठिकाणी जास्त आहे.
3) निष्कर्ष हे दर्शवतात की कोरोना आणि पीएम२.५ उत्सर्जनाचे प्रमाण यांचा बाधित केसेस आणि होणारे मृत्यू यांच्याशी लक्षणीय सहसंबंध आहे.
4) महाराष्ट्रात वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्र हे पीएम२.५ उत्सर्जनाचे मुख्य स्त्रोत आहेत आणि कोरोना केसेसमधील वाढीशी त्याचा सहसंबंध आहे.
5) महाराष्ट्रासारख्या सघन लोकसंख्येच्या राज्यांत सध्याच्या परिस्थितीत कोरोना च्या साथीचा सामना व पूर्वतयारीचे धोरण ठरविण्यासाठी संशोधनाचे आत्ताचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तसेच भविष्यात अधिक प्रदूषण पातळीच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात मदत होणार असून, परिणामी
विषाणूच्या प्रसाराला अटकाव करता येणार आहे.
6) उपायांमध्ये सूक्ष्म कणांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कमी प्रदूषण करणारे तंत्रज्ञान, लवकरात लवकर भारत स्टेज-६ सारखे वाहतूक उत्सर्जनाच्या नियमांची अंमलबजावणी, आणि अल्ट्रा-सुपर क्रिटिकल पावर प्लांट सारखे सरस कोळसाधारित वीजनिर्मिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
पूरक वक्तव्ये
भगवान केसभट, संस्थापक वातावरण फाऊंडेशन
“आपल्याकडे आता राष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन आहे, जे पुराव्यानिशी सिद्ध करते की मुंबई आणि पुण्यासारख्या उच्च पातळीच्या प्रदूषित भागात राहणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका जास्त आहे. कोरोना च्या आणखी लाटा येणार असल्याचे बोलले जात असताना ही महाराष्ट्र राज्य सरकार आणि नागरिकांसाठी धोक्याची सूचना ठरावी. वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील परिणाम दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत त्यामुळे मुंबई आणि पुण्यात स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत धोरणांच्या अंमलबजावणीवर आपल्याला काम करणे गरजेचे आहे.”
अशोक ए शिनगारे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)
“मुख्यतः आपल्याला हे अवगत आहे की हवेत जास्त प्रदूषक असतील तर त्या भागात श्वसन संस्थेचे आजार मोठ्या प्रमाणावर असतात. करोना व्हायरसचे श्वसन संस्थेवर होणारे परिणाम पाहता वायू प्रदूषण आणि कोरोना यांचा आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचा स्पष्ट सहसंबंध असायला हवा आणि आहेच. मुंबई आणि पुण्यात वायू प्रदूषणातील वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा पाहता आम्ही बीएस ४ वरून थेट बीएस ६ वर उडी मारली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी आणि या वाहनांचा अंगिकार होताना दिसत नाही. या आघाडीवर अधिक लोकजागृती करण्याची आणि बीएस ६ चा अंगिकार करण्यासाठी आर्थिक अंगाने पाहण्याची आवश्यकता आहे.”