सुमेधा उपाध्ये
गेले काही दिवस सतत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे सगळेच पळत आहेत. पळापळा कोण पुढे पळणार अशी स्पर्धा सुरू आहे का? हा प्रश्न पडतो. कोणालाच क्षणभरही थांबायचे नाही. ठाम विचार नाही. निव्वळ वाचाळता. क्षणभंगूर प्रतिष्ठेचा जणू कैफ चढलाय. यातूनच इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी तुटपुंजी पण काम चलावू माहिती. ज्ञानाची आस असावी. मिळणारी माहिती तपासता आली पाहिजे. मिळणार ज्ञान कुठे अन् कसे उपयोगात आणायचे यासाठी अभ्यासाची बैठक हवी. केवळ उचलेगिरी सच्ची नाही, आपण स्वतःचीच फसवणूक करतो. यातून जे मिळवण्याचा खरा प्रयत्न करतोय ते मिळतंच असं नाही. यासगळ्यातून फक्त वाचाळता वाढत जातेय का? हा प्रश्न. सद्याची सामाजिक पार्श्वभूमिच अशी की कोणासही आत्मपरीक्षण करावयाचे नाही. केवळ स्पर्धा करायचीय. पण प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते. या नश्वर संसारात जे जे निर्माण झालं आहे. ते ते नष्ट होणार आहे. त्यामुळे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं हे शरीर अनेक विकारांच्या आहारी जातं.
शरीराचं जसं पोषण करतो तसंच त्याचं मन विचार करतं आणि मनाच्या वारूला संयमाची जोड नसेल, विवेक बुद्धीची साथ नसेल तर टिकणं अवघड होतं.
एक गोष्ट सहज आठवली ती सद्य स्थितीत समर्पक वाटतेय आणि म्हणून इथं तिचा सारांश देते. एकदा शेवंताबाई शेजारच्या मावशीकडे जातात आणि त्यांच्याशी बोलताना त्यांचं लक्ष त्यांनी घातलेल्या हिऱ्याच्या अंगठीकडे जाते. त्या अंगठीचे कौतुक करतात. त्यांना ती खूप आवडते. अंतर्मनात तशीच हिऱ्याची अंगठी हवी ही इच्छा निर्माण होते. शेवंताबाई सर्व चौकशी अगदी किंमती पासून ते कुठून कधी कशी घेतली सर्व वृत्तांत घेतात. मावशीही खूष असल्यानं सर्व भरभरून सांगतात. शेवंताबाई घरी येतात आणि लगेच पैशांची जमवाजमव करतात तर जेवढे कमी पडत होते तेवढे उधारउसनवारी करून अंगठिची रक्कम पूर्ण जुळवतात. त्या तिथूनच हिऱ्याची अंगठी तशीच विकत घेतात. काही दिवस जातात. नंतर मावशींनी हिऱ्यांच्या बांगड्या घातलेल्या दिसल्या आता अंगठी मिरवणं त्यातील उत्साह मावळत गेला. हट्टाला पेटून त्यांनी कर्ज काढून तशाच बांगड्या केल्या. हिऱ्याच्या कुड्या आधी होत्याच आता अंगठी व बांगड्याही झाल्या. शेवंताबाई हवेत… छान मिरवत आहेत. एका लग्नाच्या निमित्ताने पुन्हा शेवंताबाई आणि मावशी समोरा समोर आल्या. आता गंमत अशी की मावशींनी सुंदर हिऱ्यांचा हार घातलेला होता. आता शेवंताबाईंच्या मनात मत्सरानं ठाण मांडलं आणि त्यांनी मावशींबद्दल कुचाळक्या सुरू केल्या. इथं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली.
अंगठी आणि बांगड्या घालून तोऱ्यात फिरणारी आता हार पाहून मस्तराने बोलू लागली इथं पापकर्माने जागा घेतली, असं वाटतं. आता आपल्या विचाराकडे वळलो तर जेव्हा हिऱ्याची अंगठी पाहिली तेव्हाच विवेक बुद्धीनं घेतलं असतं तर…? आपल्याकडे हिऱ्याच्या सुंदर कुड्या आहेत त्यावर समाधान मानलं असतं तर…? पुढील इच्छेतून- काम लोभ मत्सर यातून त्या सहज वाचल्या असत्या आणि क्रोधाचाही सामना करावा लागला नसता. पण तसं घडलं नाही. एका हव्यासाने त्या मोहपाशात अडकल्या गेल्या.
सर्वसामान्यत: जीवनात असंच घडत असतं. बदलत्या जीवन शैलीत निश्चितच स्पर्धा वाढली आहे. पण स्पर्धा निकोप असेल तर सकारात्मक कार्य घडतं. पण जे जे दुसऱ्याकडे आहे ते मला मिळालच पाहिजे हा अट्टहासच चूकीचा वाटतो. नकाराची सवय मोडत चालली आहे, हे ही एक कारण प्रकर्षानं जाणवतं. आपला पिंड आपले संस्कार आपली पुंजी, आपलं या जगात येण्याचं प्रयोजन हे निश्चित एका पेक्षा वेगळं असणार… नव्हे आहेच. प्रत्येकाच्या जन्माचं कारण निश्चित ठरलेलं आहे. अशात आपण स्वत:कडे लक्ष न देता दुसरा काय करतोय हे सतत डोकावत राहिलो किंबहुना दुसऱ्यांना मिळत आहे ते आपल्याला मिळालेच पाहिजे हा हट्टच अनेक चांगल्या गोष्टींपासून आपल्याला दूर नेतो.
कोणाकडे काहीही असले तरीही प्रत्येकाची बुद्धी कुवत कर्म त्यानुसार मिळत राहणार. मग आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी का राहू नये? समाधानी असू तर काम मद मोह क्रोध मत्सर हे निश्चित दूर ठेवणं सोपं आहे. सतत मनन चिंतन आणि कृती याकडे लक्ष राहिलं तर सहज लक्षात येतं की एक ‘मत्सर’ दूर ठेवला तर आनंदच आनंद आहे. सर्वत्र भरून केवळ आनंद राहिल.
दिवसभर आपण किती शब्दांचा रतीब घालत राहतो आणि कृतीकडे दुर्लक्ष करतो. बहुतेक म्हणूनच गीतेतही स्थितप्रज्ञता महत्वाची म्हटलंय. शांत जीवनासाठी स्थितप्रज्ञता हवी. बाह्य गोष्टींचा मनावर लगेच परिणाम होऊ नये यासाठीच सर्व विकारांवर समाधान हे एक उत्तर असावं.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
हेही वाचा: #अध्यात्म ‘मी’ चा प्रवास