मुक्तपीठ टीम
नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर येथून आयुक्त पशुसंवर्धन यांचे समवेत लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गठित राज्यस्तरीय कार्यदलाची (टास्क फोर्स) दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे लम्पी रोगाविषयी महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले. यामध्ये पहिला निर्णय नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. दुसरा निर्णय पशुपालकांना यापुर्वी लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या जास्तीतजास्त ३ जनावरांसाठी हा लाभ अनुज्ञेय होता. आता ही अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व पशुधनाकरीता त्यांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.या संदर्भातील आवश्यक पत्र शासन स्तरावरून निर्गमीत झाले असून अनुषंगिक शासन निर्णय लवकरच जारी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे होणारी मर्तुक कमी करण्यासाठी उपचार प्रोटोकॉल मध्ये सुधारणा करण्याचे आणि बाधित पशुरुग्णांचे सुक्ष्म अवलोकन करुन उपचार करण्याचे निर्देश श्री.विखे पाटील यांनी दिले.
शासन अधिसूचना दि. ३०.०९.२०२२ अन्वये संक्रमित / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून आरोग्य प्रमाणपत्रासह म्हशींची वाहतुक करण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून वाहतुक करण्यास परवानगी दिलेली असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
राज्यामध्ये आज दि.४ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार १७९ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५२ हजार ९५५ बाधित पशुधनापैकी एकूण २७,४०३ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण ११५.११ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १०८.२९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ७७.३९ % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे, विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर आदी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करून मृत्यू नेमका होण्याचे कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सूचवावे. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.
टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
१५ व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घ्याव्यात
जिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास १५ व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घेता येतील. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रूग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रूग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रूग्णवाहिका वापरून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना विखे-पाटील यांनी दिल्या.
श्री. प्रतापसिंह यांनी सांगितले की, राज्यात एक कोटी ४० लाख जनावरे असून एक कोटी १५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी ८ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या ५२ हजार पशु बाधित असून २१०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशींची समावेश नसल्याने म्हैशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.
टास्क फोर्सचे डॉ. बिकाणे यांनी सांगितले की, संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही. मृत्यू होणाऱ्यामध्ये वयस्क, आजारी जनावरे, गाभण असलेले, लहान वासरे यांचा समावेश आहे. यामुळे अशा जनावरांची पशुपालकांनी काळजी घ्यावी. अजून आठ ते १० दिवस लम्पी आजाराचे रूग्ण निघतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
पशुपालकांना अर्थसहाय्य
लम्पी आजारामुळे जनावरे दगावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहा पशुपालक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मृत्यू पडलेल्या प्रत्येक संकरित गायीसाठी ३० हजार तर खिलार बैलासाठी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले.