मुक्तपीठ टीम
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ च्या १०० दिवसांच्या उलटमोजणी अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी पुण्यात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN), भारत सरकारचे आयुष मंत्रालय यांनी मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले. पुणे येथील प्रसिद्ध गांधी वारसा स्थळ आगा खान पॅलेस येथे ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ या विषयावर योग शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच प्रतिकारशक्तीसाठी योग या विषयावर कार्यशाळा आणि व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. राजेंद्र यादव, अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई, गजानन मांडवरे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई प्रदेश, जे.व्ही.एन पानपाटील, व्यवस्थापक, प्रादेशिक लोकसंपर्क विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) के. सत्या लक्ष्मी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) के. सत्या लक्ष्मी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लोकसंपर्क विभागाच्या सांस्कृतिक पथकाने स्किट आणि गाण्यांच्या माध्यमातून योग संबंधी जनजागृती कार्यक्रम सादर केला, ज्याला उपस्थितांकडून दाद मिळाली. यानंतर एनआयएन मधील निसर्गोपचार आणि योग तज्ञांच्या सूचनांनुसार कॉमन योगा प्रोटोकॉलचा सराव सुरू झाला.
रोग प्रतिकार शक्तीसाठी योग या विषयावर कार्यशाळेत योग तज्ञांना योगासने घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक डॉ. ईश्वर बसवराद्दी यांच्या प्रास्ताविकाने कार्यशाळेची सुरुवात झाली. पहिले सत्र हे योगगुरू श्री विश्वास मंडलिक, योग विद्या गुरुकुल, नाशिक यांचे व्हर्च्युअल सत्र होते , यात त्यांनी रोग प्रतिकारशक्तीसाठी योग या विषयावर मार्गदर्शन केले. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग पद्धतींचा प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल याची त्यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात उरळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमचे संचालक डॉ. अभिषेक देवीकर यांनी योग आणि आहाराची तत्त्वे या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी योगाची मूलभूत तत्त्वे आणि रोग प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आहाराची भूमिका याबद्दल तपशीलवार माहिती दिली. पॅकबंद खाद्यपदार्थांचे हानिकारक परिणाम आणि हंगामानुसार उपलब्ध आणि स्थानिक अन्नाचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला. तिसरे सत्र पुण्याच्या डॉ. आर. के लाइफस्टाइल डिसऑर्डर अँड पेन मॅनेजमेंट क्लिनिकचे संचालक डॉ. राज कुलकर्णी यांनी उत्तम आरोग्यासाठी योग या विषयावर घेतले. उत्साही आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आसन, प्राणायाम, शुद्धी क्रिया, ध्यानधारणा इत्यादींचा साधा सराव रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कशी महत्त्वाची भूमिका बजावतो हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. सत्यनाथ, यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला सामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला, हे सत्र त्यांच्यासाठी माहितीपूर्ण होते, जवळपास ३०० लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1811609