मुक्तपीठ टीम
- मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण
- दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिल २०२२ पासून सुरु होणार
- संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्पापैकी सुमारे ५० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन दि. १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बोलत होते.
पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे यावेळी सहभागी झाले होते. तर मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आदी मान्यवर प्रत्यक्ष स्थळी म्हणजे स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे उपस्थित होते. तसेच, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी)अजय राठोर, संचालक (भूसंपादन) अनिल वानखडे, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) विजय निघोट यांच्यासह कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या वतीने प्रकल्पाचे व्यवस्थापक संदीप सिंग, बोगदा बांधकाम व्यवस्थापक संतोष सिंग, सल्लागार कंपनी मेसर्स यूशीन कन्सल्टंटच्या वतीने बोगदा बांधकाम व्यवस्थापक नॅमकाक चो हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य व पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री दित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे. मुंबईकरांचे राहणीमान सुखकर करण्याच्या दृष्टीने अर्थात ‘इज ऑफ लिविंग’साठी विविध कामे मुंबई महानगरात सुरु आहेत. गोरेगाव-मुलूंड जोडरस्ता, पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल), मुंबई मेट्रो या सर्व प्रकल्पांसह मुंबई कोस्टल रोडमध्ये देखील महानगराचा विकास पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिकेने जे जे ठरवले, ते सर्व प्रकल्प पूर्ण करुन दाखवण्याची आमची परंपरा आहे आणि किनारा रस्ता त्याला अपवाद नाही. फक्त देशात नव्हे तर जगात देखील हा प्रकल्प नावाजला जाईल, अशा रितीने काम पूर्ण करुन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करु. टाळेबंदीच्या काळातही एकही दिवस या प्रकल्पाचे काम थांबले नाही आणि इतिहासात नोंद होण्याजोगी कामगिरी करुन हा प्रकल्प वेगाने पुढे सरकतो आहे, असे महापौरांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. चहल यांनी दिला.
तत्पूर्वी, महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला. दरम्यान, कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गवाणकर यांनी केले.