मुक्तपीठ टीम
मोठ्या शहरांलगतच्या ग्रामीण किंवा निमशहरी भागात लसीकरणात एक वेगळीच समस्या भेडसावत आहेत. या केंद्रांवरील लसींची ऑनलाइन माहिती मिळवून सभोतालच्या शहरी भागातील माणसं पोहचतात. ते आधीच लसीकरण करुन घेतात. त्यामुळे कामं आटोपून लसीकरणासाठी पोहचणाऱ्या गावकऱ्यांना मात्र लसींपासून वंचित राहावं लागत आहे. नेटवर सरकारने लसीकरणाची उपलब्ध लसींसह माहिती देत स्लॉट ओपन केल्यामुळे हे घडू लागले आहे. त्यामुळे त्या-त्या भौगोलिक परिसरातील नागरिकांचंच त्या-त्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करावं आणि बाहेरच्यांचं बंद करावं अशी मागणी पुढे आली आहे.
खेडेगावातील पाणी, वीज पळवतात…आता जीवन रक्षक लसीही?
डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी मुक्तपीठशी बोलताना, रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील अनेकांनी त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधल्याचे सांगितले. ते म्हणाले, “एक वेगळा प्रश्न समोर येत आहे. कर्जतमध्ये येऊन गुरुवारी एका दिवसात मुंबईचे १८ ते ४५ वयोगटातील १७० ते १८० जण कर्जतकरांच्या वाट्याची लस घेऊन गेले आहेत. खेडेगावातील पाणी, वीज पळवतातच आता कोरोना लसीसारख्या जीवन रक्षक गोष्टीही हिसकावून घेतात शहरातील लोकं. ह्यांना कसे कळले आज रजिस्ट्रेशन होणार? काहीतरी गडबड नक्कीच आहे. पूर्वी रेल्वेची तत्काळ तिकिटे क्षणात संपायची त्याची आठवण झाली.”
कर्जतच्या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर २ टक्केही लसीकरण स्थानिकांचे नाही!
भाजपाच्या उद्योग आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मंदार मेहंदळे यांनी ‘मुक्तपीठ’ला सांगितलेली माहिती डॉ. आशुतोष
कुलकर्णींची भीती सार्थ ठरवणारी आहे. ते म्हणाले, “खांडस, आंबिवली, कडाव, मोहिली या अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आशा वर्कर लसीकरणासाठी प्रोत्साहित करत असतात. दिवसाला तेथे २०-३० लसीकरण होत असे. ते वाढवण्याचे आमचेही प्रयत्न सुरु आहेत. तेवढ्यात आता पाहतो तर लसीकरणाचे स्लॉटच उपलब्ध नाहीत. तेथे १० मेपर्यंतचे लसीकरण स्लॉट बुक झालेले आहेत. कर्जत हे तसे छोटे शहर तिथंही हेच घडलं. कर्जतमध्ये जे लसीकरण झाले, त्यात २ टक्केही स्थानिक कर्जतकर नाहीत. तेथे लसीकरणासाठी आलेल्य गाड्यांवर वाशी, बदलापूर, उल्हासनगर या भागातील आरटीओच्या नंबर प्लेट होत्या.
ग्रामीण केंद्र, लसीकरण फुल!
- कडाव : AGE 45+दिनांक 10 मे 2021 पर्यंत Online बुकिंग फुल.
- आंबिवली : AGE 45+दिनांक 10 मे 2021 पर्यंत Online बुकिंग फुल.
- खांडस : AGE 45+दिनांक 10 मे 2021 पर्यंत Online बुकिंग फुल.
ते म्हणाले, “सरकारी अधिकाऱ्यांनी विचार करावा, ज्या PHC वर ५० लसीकरण होणे मुश्किल होतं असे. आशावर्कर लोकांना बोलावून बोलावून लस देतात. तिथे २५० जणांचा स्लॉट बूक होतो. ही तालुक्यातील मंडळी असतील का?”
ठाणे ग्रामीण भागातही बाहेरच्यांचा लसींवर डल्ला
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही अशी तक्रार केली आहे. त्यांची भिवंडी-ठाणे शहरवासीयांबद्दल हीच तक्रार आहे.
ग्रामीण आरोग्य केंद्रात १०० डोस येतात. ऑनलाइनमुळे कुठल्या केंद्रात किती ते कळतं. शहरी पोहचून ते पटकावतात.
जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रमुख मोनिकाताई पानवे यांनी यावर सरकारने मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, “मुळात स्थानिकांशिवाय अन्य कुणाचे ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणच होऊ नये. सरकारने ग्रामपंचायतीला लसीकरण यादी तयार करण्याचे अधिकार द्यावेत.”
कर्जतच्या नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
दरम्यान, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा केतन जोशी यांनी या प्रकरणी लेखी पत्राद्वारे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. स्थानिकांसाठी लसीकरण पुरेसे केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुक्तपीठचं मत
- लसीकरण हे त्या त्या केंद्रांवर फक्त स्थानिकांसाठीच असावं
- लसीकरणाची माहिती, नोंदणी ऑनलाइन गैर नाही पण त्यात स्थानिक नसेल तर नाकारले जावे.
- ग्राम पंचायत, नगर पंचायत, परिषद यांच्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून आगाऊ यादी तयार करणं आणि टोकन देऊन ठेवणे, असे करता येईल.
- लसीकरणासाठी दुसऱ्या जिल्ह्यांमधून लोक रायगड जिल्ह्यात येत असतील तर ते जिल्हाबंदी भंग करत असल्याचे स्पष्ट दिसते.
- जर त्यांच्याकडे पोलीस परवानगी असेल तर ती कशी जारी झाली त्याची चौकशी आवश्यक आहे. कारण लसीकरण हे तातडीच्या वैद्यकीय आपत्कालिन आवश्यकतेत येत नसावं.
- राज्यात कडक निर्बंध असतानाही एवढ्या मोठ्या संख्येनं लोक दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रवेश करत असतील तर प्रवासादरम्यान आणि ते जातील तेथे अपघातानं का होईन कोरोना संसर्गाचा धोका वाढणार नाही का?
धन्यवाद तुलसीदास जी आमच्यासारख्या ग्रामीण भागावर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज ऊठविल्याबद्दल. अतिशय महत्त्वाची बातमी मुद्देसूद मांडणी🙏