एका सामान्य परिस्थितीतील कुटुंबातील चंद्रहास रहाटे. मात्र परिस्थितीमुळे ते डगमगले नाहीत. खचले नाहीत. योग्य वेळी विमा व्यवसायाचा स्वतंत्र मार्ग निवडला. डोकं वापरत प्रामाणिकपणे परिश्रम घेतले. घराबाहेरील बाकड्यावरून सुरु झालेला प्रवास आज आलिशान कार्यालयापर्यंत पोहचला. स्वप्न आणखी मोठी आहेत. त्यांची झेप अशीच उत्तुंग होत राहणार. त्यांची प्रेरणा कथा त्यांच्याच शब्दात:
माझे वडील वयाच्या ३२ व्या वर्षीच गेले. त्यानंतर तीन मुलांना पोसण्यासाठी आईने नोकरी केली. सहा महिन्याच्या बहिणीचा सांभाळ नारकर कुटुंबीयांनी केला आणि आम्ही दोघे भाऊ, मी इयत्ता ४ थी व भाऊ १ ली दोघेही माझ्या मावशी काकांकडे बोरिवलीला आलो त्यामुळेच आई नोकरी करू शकली व आम्हाला आत्मनिर्भर होऊन पोसू शकली. आईला मला मिळालेल्या ऑफर बद्दल विचारलं. तीही दीपक सुर्वे यांना ओळखत होती. तीही हो म्हणाली आणि दुसऱ्याच दिवशी मी फोर्टला कॅनडा बिल्डिंगमध्ये पहिलं पाऊल ठेवलं . नोकरी मिळत नाही म्हणून स्वस्थ बसण्यापेक्षा विमा व्यवसायाचा मार्गही आपल्याला आयुष्यात स्थिरसावर करू शकतो हे माझ्या अनुभवावरून मी वाचकांना नक्की सांगू शकतो.
काय हवं असतं यशस्वी व्हायला स्वप्नं आणि जिद्द. या दोनच गोष्टी खरं तर पुरेशा आहेत.
असिस्टंट म्हणून नोकरीची सुरवात झाल्यावर मला एल आय सी मधल्या कामाच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. आमच्याकडे जे एजंट होते त्यांना ब्रँचमधल्या कामासाठी मदत करण्याची माझी जबाबदारी होती. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एल आय सी एजंटच्या कमिशनचे चेक वाटपासाठी आमच्याकडे द्यायची. जसे एजंट ब्रँचला येत असत त्यांना मी त्यांचे चेक देत असे. मी माझ्या बॉसला म्हणजेच दादाला ( आमचे जुने ऋणानुबंध असल्यामुळे बॉसला मी दादा म्हणायचो ) विचारायचो मलाही असा चेक हवा आहे. त्यामुळे मलाही एजंट करून घे. तो म्हणायचा, चंदू तू अजून लहान आहेस नंतर बघू. मी ऑक्टोबर १९८८ ला नोकरीला लागलो व फेब्रुवारी १९८९ ला हट्टाने एल आय सी चा एजंट झालो.
१९९० ला ग्रॅज्युएट झालो. दादा म्हणाला कुठेही नोकरी करायची नाही. आता या क्षेत्रात पूर्ण वेळ झोकून दे. पगार २००/- रुपयांवरून १३००/- झाला होता. पण हे आव्हान मी आनंदाने स्वीकारले कारण मलाही हेच हवे होते. आता २४ तास माझे होते. माझ्या पद्धतीने मी ते वापरणार होतो. ओळखी नव्हत्या पण जिद्द होती सोबतीला स्वप्नं होती. सर्व प्रथम ओळखीच्या लोकांकडे जाऊ लागलो. काही जवळचे नातेवाईक म्हणाले नोकरी कर . उद्या लग्न करायचं झालं तर एल आय सी एजंटला मुलगी कोण देणार ? या सर्व प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केलं आणि कामाला लागलो.
चाळीतल्या दहा बाय बाराच्या रूमबाहेर बसायच्या बाकड्यावर केलेल्या ऑफिसमध्ये बसून स्वतःच्या ऑफिसची स्वप्नं पहात आयुष्याची गाडी पुढे सरकू लागली. जास्त ओळखी नसल्यामुळे अनोळखी लोकांना भिडायचं ठरवलं. दुकाने , ट्रेन जेथे जेथे अनोळखी लोकं भेटली त्यांना स्वतःची ओळख सांगू लागलो. विम्याचं महत्व काय ? प्लँनिंग कसं करायचं. ? मी तुम्हाला तत्पर सेवा कशी देईन हे पटवून द्यायला सुरवात केली.
१९९० साली दादाने स्वतःबरोबर पुण्याला इफ्सर्ट या ट्रेनिंगला नेलं व पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. विमा क्षेत्राचा वैज्ञानिक दृष्टिकोन शिकता आला. त्यामुळे नुसतं प्रोडक्ट सांगण्यापेक्षा ग्राहकाची गरज योग्य रीतीने समजून सांगून त्याप्रमाणे त्यांना
योजना देऊ लागलो. या प्रवासात श्री मुरली मेहता सर, डॉ अरुणा तिजारे मॅडम, संतोष नायर सर, संदेश पवार सर, रंजन नगरगट्टे सर, श्री पत्की सर अशा अनेक गुरूंनी जीवनाचा कायापालट केला. आमचे प्रेरणास्थान श्री गोपिनाथ सरांनी तर आर्थिक नियोजनातील ज्ञानात मौलिक भर घातली. ज्ञानाची कास धरायला मीही मागेपुढे पाहिले नाही. दादा व त्याचे विकास अधिकारी मित्र स्वर्गीय श्री सतीश मंजुरे सर असोत पुण्याचे श्री मिलिंद माने सर असोत किंवा कल्याणचे श्री धनंजय भोजने सर असोत या सर्वांकडून ज्ञान ग्रहण केले. त्यांनी सर्वानी भरभरून प्रेम केलं. जणूकाही मी त्यांचा मानसपुत्रचं होतो.
या सर्व गुरुंमुळेच आज मी यशाच्या पायऱ्या चढू शकलो. एल आय सी तर्फे १८ वेळा एम डी आर टी ( यू एस ए ) व तीन वेळा सी ओ टी ( यू एस ए ) या सर्वाचं श्रेय या सर्व गुरूंनाच जातं. १९९० साली घराच्या बाहेरच्या बाकड्यावर मी माझं ऑफीस थाटलं. फोनची वायर बाहेर आणून फोन जोडून तेथून कॉल करायचे व स्वतःच्या अद्यावत ऑफिसची स्वप्न पाहायची हा माझा दिनक्रम असायचा. अगदी सुरवातीलाच मी माझ्या खिशाला परवडत नसताना देखील असिस्टंट ठेवला. सेवा क्षेत्रात सेवेला अनन्यसाधारण महत्व असते म्हणून ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यासाठीचा हा खटाटोप होता.
फर्स्ट क्लास सेकंड क्लास व पास क्लास या मार्कलिस्टमधल्या उतरत्या क्रमाला किती पगाराची नोकरी मिळाली असती ? पण या व्यवसायात पाऊल ठेवून माझा पगार मीच ठरविण्याचा पण केला. १९९५ साली मुरली मेहता सरांच्या एका भाषणात त्यांनी गोल्स लिहून रोज पाहायला सांगितले . त्याप्रमाणे मीही पाच गोल्स लिहिले. फ्लॅट , कार , लॅपटॉप , मोबाईल व एम डी आर टी ( यू एस ए ) (आर्थिक क्षेत्रातली उच्च मानली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा. ) हे सर्व गोल्स मी कागदावर लिहून घराच्या भिंतीवर चिटकविले. या सर्व गोल्सकडे श्रद्धेने पहात विश्वास करीत राहिलो. जिद्द होतीच फक्त काम करीत राहिलो. पाच वर्षानंतर सिहावलोकन केलं त्यावेळी लक्षात आलं की ही सारी स्वप्नं सत्यात उतरली आहेत.
प्रवास सोपा नव्हता. अनोळखी लोकांना भेटताना अपमानही सहन करायला लागले. पण प्रत्येक अपमानाने जिद्द अजून वाढायला लागली. एल आय सी एजंटला नोकरी नाही म्हणून छोकरी कोण देणार असे ज्या नातेवाईकांना वाटत होते तेही आता माझ्या बाबतीत आशादायी बोलू लागले. १९९८ ला मला छोकरी कोण देणार या प्रश्नाला विराम मिळाला. पावसकर कुटुंबियांच्या सविताने मला पसंद केलं. तिच्या भावांनी संजय व मधुदादाने माझ्यावर विश्वास दाखवला. माझी एकच अट होती मुलीने नोकरी करायची नाही. त्यामुळे सविताला आलेला एम पी एस सी चा कॉल कपाटातच पडून राहिला. मला मात्र माझ्या व्यवसायात साथ देण्यासाठी पत्नी बरोबर अजून दोन हात मिळाले होते. सवितानेही अत्यंत प्रेमाने व जिद्दीने ऑफिसच्या कामात रस घेतला.
लग्नापूर्वी तीन वर्ष सातरस्त्याच्या चाळीतलं दहा बाय बाराचं घर सोडून एव्हाना डोंबिवलीला वन रूम किचनच्या सेल्फकन्टेड फ्लॅट मध्ये आलो. आता चिम्पाट घेऊन कॉमन बाथरूमसाठी रांग लावायला लागणार नाही याचाच खूप आनंद झाला. त्या आईने घेतलेल्या जागेनंतर लग्न झाल्यावर मी जवळच ठाकुर्ली येथे फ्लॅट घेतला मग ऑफिस घेतले. तेरा वर्ष डोंबिवली ठाकुर्लीला काढल्यावर मात्र आमचे मित्र व गुरु सतीश मंजुरे साहेबानी कान पिळला व सारं बास्तान मी भांडुपला हलविले. सुरवातीला दोन बीएचके घेतला व रेंटवर ऑफिस केलं कालांतराने जुना फ्लॅट विकून थ्री बीएचके घेतला. भांडुप मध्ये दोन ऑफिसेस घेतली. माझ्या बरोबर आमच्या संस्थेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे गोल देखील पूर्ण करता आले याचा आनंदही खूप आहे.
सुदैवाने जीवाला जीव देणारा स्टाफ मिळाला व संस्था मोठी करता आली. प्रामाणिकपणा जोपासल्यामुळे व योग्य मार्गदर्शन केळ्यामुळे अनेक लोकं जोडली गेली. शुन्यापासून सुरवात केली. अरुण सातपुते या माझ्या कॉलेजच्या मित्राने विश्वास ठेवून पहिली पॉलीसी काढली व आज १६०० कुटुंबियांच्या आर्थिक नियोजनाचं काम आमच्या संस्थेकडे आहे. यात नोकरदार, व्यावसायिक व मराठी सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचा समावेश देखील आहे.
हा स्वप्नांचा प्रवास अखंड चालू राहील. एल आय सी विकास अधिकारी श्री दीपक सुर्वे यांनी ट्रेनमध्ये भेट झाल्यावर त्यांचा असिस्टंट होण्यासाठी त्यांनी दिलेली २०० रुपये स्टायपेंडची आलेली ऑफर आयुष्याचं करिअर सेट करेल असं कधीच वाटलं नव्हतं.
क्षेत्र कुठलंही असो, पाठपुरावा केला की यश मिळतेच. फक्त विश्वास ठेवून चालत रहाणे महत्वाचे आहे.जे काम आम्ही करतो ते अतिशय श्रद्धेने करतोय. जे ग्राहकांच्या हिताचे त्यातच आमचे हित हीच शिकवण पाठीशी आहे. नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा विमाविक्रीचा उदात्त व्यवसाय करायला काय हरकत आहे ? आज कुटुंबप्रमुखाचं अकाली निधन झाल्यावर कुटुंबाला तारणारं, त्यांच्या रोजीरोटीची सोय करून कुटुंबीयांची स्वप्नं पूर्ण करणारं विमा क्षेत्र तुम्हाला खुणवत आहे. या पवित्र व्यवसायात आपणही सहभागी होऊन स्वार्थातून परमार्थ आपणही साधू शकता.
- चंद्रहास गोपिनाथ रहाटे
९८२०२९८०९३
Very nice proud of chandrahas. Keep going keep growing