डॉ.जितेंद्र आव्हाड
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस. अनेक व्यक्तिमत्त्व सामावलेली होती या एका व्यक्तीत. ते बंडखोर होते. क्रांतीची स्वप्ने त्याच्या डोळ्यात होती. ते रोमँटिक होते. कामगारांचे नेते होते. रसिकता हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. अत्यंत साधेपणाने राहायचे ते आणि त्या साधेपणाचाही एक बडेजाव होता त्यांच्यात. त्यांचे ‘पॉलिटिक्स’ समाजवादी. खरे तर लोहियावादी आणि म्हणून काँग्रेसविरोधी. तो विरोध इतका तीव्र की त्यामुळे सांप्रदायिक तत्वांना विरोध हे आपले मूलतत्वही ते विसरले. मोठाच विसंवाद होता तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला. आणि हे सारे असूनही समग्र जॉर्ज हा आजही अनेकांच्या कौतुकाचा विषय असतो. ते मूळचे मंगलोरी. कॅथोलिक ख्रिश्चन कुटुंबातला जन्म त्यांचा. १६ वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी, जॉन जोसेफ फर्नांडिस यांनी, त्यांना ख्रिश्चन धर्मगुरु बनवायचे ठरवले. बंगळूरुच्या सेंट पीटर्स सेमिनरीमध्ये त्यांना धर्मशिक्षण घेण्यासाठी पाठवले; पण जॉर्ज यांच्या बंडखोर वृत्तीला ते भावले नाही. दोन वर्षांतच त्यांनी चर्च सोडले. बंगळूरुमध्ये हॉटेल आणि वाहतूक व्यावसायिकांची संघटना बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नंतर मात्र ते सरळ निघून आले मुंबईत. साल होते १९४९.
देश स्वतंत्र झाला होता; पण प्रजासत्ताक बनलेला नव्हता. केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. पं.नेहरू लोकप्रियतेच्या शिखरावर होते. देशात मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग सुरू झाला होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेची आखणी अजून सुरू होती. पायाभूत सुविधांचा विकास हे तिचे लक्ष्य होते. हा विकासाचा गाडा आपण म्हणू त्या पद्धतीनेच आणि त्या दिशेनेच जायला हवा असे, सगळ्यांनाच वाटे; त्यात अर्थातच कम्युनिस्ट, समाजवादी, हिंदुत्ववादी अशी सगळीच मंडळी आली. देश एका मन्वंतराच्या सीमेवर उभा होता. अशा खळबळीच्या काळात जॉर्ज नावाचा हा मुलगा उद्योगनगरी मुंबईत आला होता. तेव्हा ध्येय एकच होते-पोट भरण्याचे; पण ते कसे ? सारेच प्रश्न होते. अगदी राहायचे कोठे येथपासूनचे प्रश्न. त्या सुरुवातीच्या काळात जॉर्ज यांनी अनेक रात्री चौपाटीवरच्या बाकड्यांवर झोपून काढल्या. रात्री गस्तीवरचे पोलिस येऊन उठवायचे. हुसकून लावायचे; पण हे जाणार कुठे?
गोदी कामगारांचे नेते पी. डिमेलो यांचे बोट धरूनच ते मुंबईत आले होते. त्यांच्या समाजवादी चळवळीत आता ते काम करू लागले होते. कामगार, श्रमिकांच्या हालअपेष्टा त्यांच्या समस्या से जवळून अनुभवत होते. येथेच त्यांच्यातील ‘अंग्री यंग मॅन’ घडत होता. दोन वर्षे धार्मिक शिक्षण घेतलेला हा तरुण स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वानी भारला गेला होता. थोर समाजवादी नेते राममनोहर लोहिया हे समाजवाद्यांचे वैचारिक पीठ. त्यांच्याशी, त्यांच्या विचारांशी जॉर्ज यांची जवळीक होऊ लागली होती. आता त्यांनी ट्रेड युनियनचे काम सुरू केले. एव्हाना त्यांची राहण्याची व्यवस्था झालेली होती. गिरगावच्या पानवाला गल्लीत ते राहत होते, याच गल्लीच्या, चाळीच्या, रस्त्यावरच्या, गिरण्यांच्या गेटवरच्या विद्यापीठात ते समाजवादाचे प्रैक्टिकल शिकत होते. त्यांचे पुढे नावाजले गेलेले भाषाकौशल्यही याच विद्यापीठातले.
बंगळुरू मधील वाहतूक व्यावसायिकांच्या संघटनाबांधणीचा अनुभव गाठीशी होताच. १९५० च्या सुमारास त्यांनी मुंबईतील टॅक्सीचालकांच्या संघटनेची मजबूत बांधणी केली. या संघटनेचे ते अनभिषिक्त राजे बनले. या शहरात अजून शिवसेना जन्मायची होती. येथे अजूनही समाजवादी, प्रजासमाजवादी व कम्युनिस्टांचा प्रभाव होता. जॉर्ज यानी डिमेलो यांच्या संघर्षनीतीला एक वेगळा आयाम दिला. डिमेलो यांच्या मते संप हे अखेरचे शस्त्र होते. जॉर्ज लढाईच्या सुरुवातीलाच हे शस्त्र उपसत असत. या जोरावर त्यांनी मुंबईच्या कामगारविश्वात आपली स्वतःची जागाच निर्माण केली, असे नव्हे; तर अनेक कामगार संघटना आपल्याकडे खेचून घेतल्या. ‘बंदसम्राट’ ही त्यांची ओळख बनली.
काळा सावळासा रंग, अंगात खादीचा चुरगळेला झब्बा-पायजमा, झिजलेले पायताण, नाकांवर चष्मा, डोईवर विस्कटलेला केशसंभार आणि समोर येणाऱ्याशी त्याच्याच भाषेत अस्खलितपणे बोलणारा असा हा नेता कामगारांच्या गळ्यातला ताईत बनला. याच कामगारशक्तीच्या जोरावर ते मुंबई पालिकेत संयुक्त समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले. त्यांची खरी कसोटी लागली ती १९६७ साली, दक्षिण मुंबईतून काँग्रेसने स. का. पाटील यांना तिकीट दिले होते. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणत त्यांना. या अशा मातब्बर नेत्याच्या विरोधात संयुक्त समाजवादी पक्षाने तिकीट दिले जॉर्ज यांना. कामगारांची विराट शक्ती पाठीशी होतीच; पण आता मुंबईत एक नवी शक्तीही उदयाला येत होती. बाळासाहेब ठाकरे तिचे नाव. शिवसेना अजून साकारली नव्हती; पण बाळासाहेबांनी त्यांच्या लेखणी आणि व्यंगचित्रांतून मराठी अस्मितेची नस बरोबर पकडली होती. त्यांना मानणारा मराठी मध्यमवर्गही आता जॉर्ज यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्या निवडणुकीत जॉर्ज ‘जायंट किलर’ ठरले.
तेथूनच त्यांचे पाऊल राष्ट्रीय सत्ताकारणात पडले. १९७३ मध्ये ते ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. रेल्वे कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या. जॉर्ज यांनी त्या पूर्ण करून घेण्यासाठी ८ मे, १९७४ रोजी देशव्यापी रेल्वे संप पुकारला. देशाची चाकेच ठप्प केली त्यांनी. या संपात पुढे विविध क्षेत्रांतील कामगारही सहभागी झाले. हे पाहून इंदिरा सरकारने दंडशक्तीचा प्रयोग सुरू केला. अनेक कामगारांना तुरुंगात डांबले. तीन आठवड्यांत तो संप संपविला. याच संपाने इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या सहानुभूतीला ओहोटी लागली. आणीबाणीला ही एक पार्श्वभूमीही होती. आणीबाणीच्या काळात जॉर्ज भूमिगत झाले. वेशांतर करून ते सर्व देशात फिरत होते. सरकार उलथवून, अगदी स्फोटके वापरून उलथवून लावण्याच्या योजना आखत होते. आणीबाणीविरोधी चळवळीला चालना देत होते. अखेर जून १९७६ मध्ये ते पोलिसांच्या हाती लागले. बडोदा डायनामाईट खटल्यातील ते एक आरोपी होते. तुरुंगात अनंत यातना सोसाव्या लागल्या त्यांना; पण हा ‘रिबेल विदाऊट अ पॉज, हा ‘अथक बंडखोर’ झुकला नाही. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली. १९७७ मध्ये निवडणुका घेतल्या. त्यात मुजफ्फरपूर मतदारसंघातून ते निवडून आले. जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते; त्यात हा कामगारनेता उद्योगमंत्री बनला.
या निवडणुकीनंतर जॉर्ज यांचे मुंबईशी असलेले जुने नाते तुटले. तसे ते पहिल्याप्रमाणेच येथील कामगार चळवळीशी जोडलेले होते; पण आता हा सच्चा मुंबईकर दिल्लीवासी झाला होता. यापुढचा त्यांचा प्रवास हा चढताच होता. बिहार ही त्यांची कर्मभूमी बनलेली होती. समाजवादी चळवळीची शकले पडली होती. जॉर्ज यांची स्वतःची समता पार्टी हा त्याचाच एक तुकडा. त्यांचा काँग्रेसविरोध एवढा टोकास गेला की, ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. वाजपेयी सरकारच्या काळात ते संरक्षणमंत्रीही झाले.
१९९८ च्या पोखरण अणुचाचण्या झाल्या, त्या ते संरक्षणमंत्री असतानाच, पण, याच काळात कारगिल युद्धही झाले. त्यांची ती कारकीर्द वादग्रस्तच ठरली. जॉर्ज यांचा करिश्मा कमी कमी होत गेला. हळूहळू शरीरानेही साथ देणे सोडले. अल्झायमरने त्यांना ग्रासले. एकेकाळी कामगारांत रमणारा, आसपासच्या गर्दीने आनंदणारा हा रोमँटिक बंडखोर अखेरची १० वर्षे अज्ञातवासातच गेला. २९ जानेवारी २०१९ रोजी, वयाच्या ८८ व्या वर्षी स्वाईन फ्लूच्या आजाराचे कारण होऊन अज्ञाताच्या प्रवासास तो कायमचा निघून गेला…