डॉ.जितेद्र आव्हाड
सन १९४४ चा काळ… गायनात कारकिर्द करता यावी यासाठी वडिलांच्या विरोधाला न जुमानता एक तरुण त्याच्या मोठ्या भावाचा मित्र अब्दुल हमीद यांच्यासह मुंबईला आला. या नवख्या शहरात ओळखीचे कोणी नव्हते. राहायचे कुठे हा प्रश्न होता. मग, हा मुलगा आणि अब्दुल हमीद या दोघांनी भेंडीबाजारातील अल्का मॅन्शन या चाळवजा इमारतीत दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली आणि सुरू झाला एका गायकाचा संगीतमय प्रवास. पुढे आपल्या मखमली आवाजाने भारतातील सांगीतिक विश्वावर, रसिक कानसेनांच्या मनावर राज्य करणाऱ्या या गायकाचे नाव होते मोहम्मद रफी.
वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षापासून रफींचा सांगीतिक प्रवास सुरू झाला होता. त्यांचे मूळ गाव अमृतसरनजीकचे कोटला सुलतानसिंग. जन्म २४ डिसेंबर १९२४ चा. बालपण गरिबीतच गेले; पण प्रतिभेला ना धनाचे ना धर्माचे बंधन असते. सुरांची गोडी उपजतच होती त्यांच्यात. लहानपणी गुरे चारण्यासाठी रानात जायचे तेव्हा त्या मोकळ्या रानात त्यांच्या गायनकलेला उधान यायचे. त्या वेळीही त्यांच्या आवाजातील लोकगीते ऐकून मित्रमंडळी धुंद होत असत. १९३६ साली त्यांचे कुटुंबीय लाहोरच्या बिलालगंज भागात स्थायिक झाले. रफींचे शिक्षण थांबलेच होते. लाहोरमध्ये मोठ्या भावाच्या केशकर्तनालयात आता ते काम करू लागले. तेथे काम करताना गाणे सुरूच असायचे. एकदा, रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीने ते सूर ऐकले. त्या मुलायम रेशमासारख्या आवाजाने ते भारावलेल्या. ती व्यक्ती होती जीवनकाल मट्टू, लाहोरच्या ऑल इंडिया रेडिओची प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह. त्यांनी रफीला ऑडिशनसाठी बोलावले. त्यांची निवड झाली. हे एक छोटेसे पाऊल होते रफींच्या यशोमार्गावरील.
वडीलांना मात्र त्यांचे हे गाणेबजावणे आवडत नसे. पण थोरला भाऊ आणि त्यांचा मित्र अब्दुल हमीद यांचा रफींच्या सुरांवर विश्वास होता. त्यांनीच रफींना बडे गुलाम अली आणि छोटे गुलाम अली यांच्याकडे नेले. या दोन दिग्गजांकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे बरकत अली आणि अब्दुल वाहिद खान या मातब्बरांकडेही त्यांनी सुरांची तालीम घेतली. आता ते यात्रांमधील, उत्सवांमधील मैफलींमध्ये गाऊ लागले होते. रफींच्या सूनबाई यासीन खालीद रफी यांनी ‘मोहम्मद रफी – माय अब्बा’ या पुस्तकात अशाच एका मैफलीचा किस्सा दिलेला आहे. १९३७ साली लाहोरमध्ये ख्यातनाम गायक कुंदनलाल सैगल, जोहराबाई अंबालेवाली, यांची मैफल होती. त्या कार्यक्रमात ऐन वेळी वीज गेली. ध्वनिवर्धकाशिवाय सैगल यांचे गाणे लोकांना ऐकू जाणे शक्यच नव्हते. तेव्हा वीज येईपर्यंतचा वेळ भरून काढण्यासाठी कोणीतरी रफींना मंचावर पाठवले. एक पंजाबी लोकगीत गायले त्यांनी. ते ऐकून अवघे सभागृह थरारून गेले. सैगल यांनीही रफींना आशिर्वाद दिला, एक दिवस तु मोठा गायक बनशील. त्यांच्या आवाजाने आणखी एक व्यक्ती प्रभावित झाली होती. श्यामसुंदर. लाहोरच्या चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून नुकतीच त्यांनी सुरूवात केली होती. एक ताजा आवाज त्यांना हवा होता. रेडिओवरील रफींचे गाणे ऐकून त्यांना ‘गुल बलू’चा या चित्रपटात गाण्याची संधी दिली. सहगायिका होत्या झीनत बेगम. त्या युगुलगीताचे बोल होते – गोरीये नी हिरीये नी. साल १९४२. अब्दुल हमीद हे आता रफींचे मार्गदर्शक बनले होते. त्यांना वाटले या मुलाने आता लाहोरला थांबता कामा नये. आणखी पुढे, मुंबईला जायला हवे. रफींचे वडील तयार नव्हते; पण दीन आणि अब्दुल हमीद यांनी त्यांची मनधरणी केली. अखेर त्यांनी परवानगी दिली. दीन यांच्या विनंतीवरून हमीद रफींना सोबत म्हणून मुंबईला आले. सोबत होते एक चण्याचे बोचके. उपाशी राहायला लागू नये म्हणून. २५९, अल्का मॅन्शन, दुसरा मजला, इब्राहिम रहिमतुल्ला रोड, मांडवी पोस्ट ऑफिसजवळ, भेंडीबाजार हा त्यांचा मुंबईतील पहिला पत्ता. खोली छोटाशीच. प्राथमिक सोईसुद्धा नाहीत.
पहाटे उठून रियाझ करायचा तर बाजूचे लोक आरडाओरडा करायचे. तेव्हा पहाटे उठून ते मरिन ड्राइव्हला सागरकिनारी रियाझ करायला जाऊ लागले. मुंबईत आल्यानंतर हमीद यांनी प्रथम माहिती काढली ती येथे होणाऱ्या मैफलींची. अशाच एके दिवशी त्यांना समजले की तेव्हाचे सुपरस्टार गायक के. एल. सैगल यांच्या गाण्याची मैफल एके ठिकाणी होणार आहे. ही माहिती येते रफींचे सुपुत्र यांनी अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेल्या ‘मोहम्मद रफी – गोल्डन वॉईस ऑफ द सिल्वर स्क्रीन’ या सुजाता देव यांच्या पुस्तकातून. त्यानुसार, त्या मैफलीचे आयोजक एक सरदारजी होते. ओळखी ओळखीने ते त्यांच्याकडे आले. त्या मैफलीत आपल्याला जायला मिळणार, सैगल यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार एवढ्यानेच रफी खुश जाले होते. सैगल यांचे गाणे झाले. श्रोत्यांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. या अशा रसिकांसमोर आपल्यालाही गायला मिळाले तर? रफी हा विचार करीत असतानाच हमीद यांनी त्या सरदारजींना विनंती केली. खान साहेब नावाचे एक गायक तेथे गात होते. त्यांना विचारून रफींना एक गीत सादर करण्याची संधी द्या, असे ते म्हणाले. खान साहेबांनी रफींकडे पाहिले. त्यांच्या मनात काय आले कोणास ठाऊक, पण त्यांनी संधी दिली. रफी मंचावर आले. तबलजीला राग दरबारी घ्यायला सांगितला आणि त्यांनी गायला सुरूवात केली….त्या गायनाने श्रोत्यांना जिंकले. पैशांची खैरात झाली त्यांच्यावर. पण मैफील खान साहेबांची होती. मान त्यांचा होता. एक पैसाही त्यांनी स्विकारला नाही. परत निघाले तेव्हा त्यांच्या खिशात तिकिटाला पैसे नव्हते. दादरहून पायी चालत ते भेंडीबाजाराला आले.
पण त्या मैफिलीनेच त्यांना मुंबईतील पहिली संधी मिळवून दिली. त्या श्रोत्यांमध्ये एक चित्रपट निर्मातेही होते. खान साहेबांच्या सांगण्यावरून त्या निर्मात्याने रफींना पाचारण केले आणि एक गाणे गाण्याची संधी दिली. पण अजून हवे तितके काम मिळत नव्हते
रफींचा रियाझ आणि पतंगबाजीचा छंद सुरू होता. एके दिवशी ते मरिन ड्राइव्हला सराव करत असताना तेथे पहाटफेरी मारण्यासाठी आलेल्या सुरैय्या यांनी त्यांचा आवाज ऐकला. पहाटेची वेळ. बाजूला सागराची गाज आणि रफींचे धीरगंभीर सूर. त्या अभिनेत्रीच्या भावुक मनाच्या ताराच छेडल्या त्या सुरांनी.
रफींना त्यांनी बोलावून घेतले आणि म्हणाल्या, रस्त्यावर रियाझ करता. त्याऐवजी मरिन लाईन्सवर माझे घर आहे. तेथे येऊन रियाझ करीत जा. ही जादू होती रफींच्या आवाजाची. स्ट्रगल मात्र सुरूच होते. त्या काळात श्यामसुंदर यांनीच रफींना पुन्हा संधी दिली. चित्रपट – गाव की गोरी. गाणे – अजी दिल हो काबू में तो तलवार की ऐसी तैसी. जी. एम. दुर्रानी हे सहगायक होते. हिंदी चित्रपटांसाठी गायलेले हे रफींचे पहिले गाणे. संगीतकार नौशाद यांचा दबदबा असलेला तो काळ. हमीद यांनी त्यांना, ‘पहले आप’ या चित्रपटातील हिंदुस्तान के हम है, हिंदुस्तान हमारा या गाण्याच्या कोरसमध्ये काही ओळी म्हणण्याची संधी दिली. येथून पुढे मात्र रफींच्या संगीत कारकिर्दीने वेग घेतला. दीड सप्तकात गाण्याचा एक नवा ट्रेंड त्यांनी सुरू केला. अशात त्यांना फिरोझ निझामी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, दिलीपकुमार-नूरजहाँ यांच्या ‘जुगनू’ चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. नूरजहाँ या़च्यासमवेत त्यांनी गायलेले ‘यहा बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है’ हे गीत लोकप्रिय झाले आणि रफी हे नाव रसिकांच्या हृदयावर कोरले गेले.
एका छोट्या जाळीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास… यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करीत थांबला त्यांच्या आयुष्याच्या भैरवीनेच. ३१ जुलै १९८० रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मात्र २५ ते २६ हजार गाणी नव्हे, तर रसिकांच्या मनात आजही दरवळत असलेली सुरांची लेणी कोरणाऱ्या या स्वरसम्राटाचे अखेरचे गीत होते – लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे ‘आसपास’ या चित्रपटासाठी गायलेले – शाम फिर क्युं उदास है दोस्त.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)