डॉ. जितेंद्र आव्हाड
नक्षत्रांचे देणे कधी कधी मुंबईच्या चाळींतही गवसते. आरती प्रभू हे याचे एक उदाहरण. ‘ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ अशी आर्त साद देणारा हा कवी व नाटककार तसा कधी निसर्गाच्या कोंडुऱ्यातून बाहेर आलाच नाही. ती कोकणाची रानभूल घेऊनच तो कायम वावरला ; मात्र देहाने राहिला मुंबईतील चाळींमध्ये. त्यांचे मुळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली हे.
तशी लहानपणापासून त्यांची मुंबईशी ओळख होती. गिरगावातील एका चाळीत त्याचे वामनमामा राहत. त्यांच्याकडे ते लहानपणी राहत असत. ठाकुरदार नाक्यावरच्या सिटी हायस्कूलमध्ये ते शिकत असत. नंतर कोकणातल्या ओढगस्तीच्या आयुष्याला कंटाळून नोकरीसाठी ते मुंबईला आले ते पहिल्यांदा गिरगावातल्या त्या वामनमामांच्या चाळीतच. या सुरूवातीच्या काळात ते अगदी शिपायासारख्या नोकऱ्या करीत, हातउसन्या पैशांवर कसेबसे भागवीत हा कवी मुंबईत राहत होता. नंतर आकाशवाणीत नोकरी लागल्यानंतर त्यांनी वांद्र्यातील बीडीडी चाळीत बिऱ्हाड थाटले. त्या चाळीतील तळमजल्यावरच्या दोन खोल्यांत ते वोटभाडेकरू म्हणून राहत होते.
एकीकडे त्यांचे काव्यलेखन सुरू होते. कादंबऱ्या घडत होत्या आणि दुसरीकडे नोकरी, तेथील अपमान, पैशांची चणचण अशा भौतिक वेदना सतावत होत्या. ही कवी त्यात डुचमळत होता. निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱ्या या साहित्यिकाने मराठी साहित्य क्षेत्राला नक्षत्रांचे देणे दिले आहे. त्यांनी आपल्या काव्यरचना आरती प्रभू या नावाने तर ‘कथासंग्रह’ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर या नावाने केल्या. ‘रात्र काळी घागर काळी’ ही त्यांची गाजलेली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच त्यांची बीडीडी चाळीतील जागा गेली. घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवस मुलूंडला पत्र्याच्या चाळीत राहिल्यानंतर ते परवडणारे घर शोधत मालाडला गेले. मालाड स्टेशनच्या पुलावरून उतरताच मेन रोडच्या पहिल्याच डावीकडे जाणाऱ्या गल्लीतील बैठ्या चाळीतील दोन खोल्यांचे घर त्यांना मिळाले.
रस्त्याच्या कडेचा एक ओहोळ ओलांडून त्या चाळीत जावे लागे. तेथे पाच – सहा बिऱ्हाडे होती. बाजूला तशाच दोन-तीन चाळी। त्यानंतर दलदल, असा तो माहोल. तेथून नोकरीसाठी रोड मुंबईत यायचे. या अशा वातावरणात, अभावग्रस्ततेच्या दलदलीत त्यांच्या प्रतिभेची फुले मात्र फुलतच होती. अजगर, कोंडुरा, गणूराय आणि चानी, रात्र काळी घागर काळी यांसारख्या कादंबऱ्या, अजब न्याय वर्तुळाचा, एक शुन्य बाजीराव, कालाय तस्मै नम: अशी नाटके, जोगवा, नक्षत्राचे देणे असे कवितासंग्रह आणि अनेक कथा, अशा साहित्याचा हा निर्मिक….
कसे कसे हसायाचे, हसायाचे आहे मला
हासतच वेड्या जीवा, थोपटीत थोपटीत
फुंकायचा आहे दिवा
असे म्हणत या चाळींत राहिला. आणि एक दिवस नक्षत्रांत विलीन झाला.