डॉ. जितेंद्र आव्हाड
मी तीला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं :
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं!
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘बोलगाण्या’तील हे एक गाणे. हे गाणे त्यांच्या लेखन कारकिर्दीतील फार नंतरचे. पण या रोमॅण्टिक कवीच्या मनात त्याचे बीज रुजले असेल ते नक्कीच विल्सन कॉलेजच्या वसतिगृहात असताना किंवा गिरगावच्या शांताराम चाळीतल्या वास्तव्यात. या काळात तर ते प्रेमात पडले होते यशोदाबाईंच्या.
फार कमी व्यक्ती अशा असतात, की ज्यांच्या परिचयासाठी ‘बस केवळ नावही पुरेसे’ असते. मंगेश पाडगावकर हे त्यापैकी एक होते. मराठी साहित्यातील किमान गमभन माहीत असणाऱ्या रसिकांना मंगेश पाडगावकर यांचा, त्यांच्या कवितांचा परिचय असतोच. नसेल, तर तो मराठी रसिक नव्हे!
‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करणारा’ असा हा ‘जिप्सी’. १९५० साली कवितेचे ‘धारानृत्य’ करीत तो साहित्यशारदेच्या दरबारात अवतरला. जिप्सी, छोरी, उत्सव अशा काव्यसंग्रहांनी रसिकांच्या काळजात घर करीत गेला. कवी सौंदर्यासक्त असला, जीवनाच्या सत्य, शिव आणि सुंदरावर प्रेम करणारा असला, किंबहुना प्रेमावर प्रेम करणारा असला, की जीवनातील कुरूपता त्याच्या नजरेला अधिक डाचते.
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळा रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा…
अशा प्रकारे श्रावणातील रेशिमधारांत न्हाणारे कवीचे मन जीवनातील दांभिकतेने, विसंगतीने, विकृतीने संतापून जात नसते तर नवलच.
‘दिवस तुझे हे फुलायचे….झोपाळ्यावाचून झुलायाचे’
लिहिणाऱ्या कविमनाला जेव्हा,
दिसे फक्त ओरखड्यांचे रान माजलेले
हिंस्र भुकेने स्वप्नांचे ओठ चावलेले
तेव्हा त्याच्या शब्दांतून ठिणग्या कोसळल्या नसत्या तर नवलच.
पाडगावकराच्या सलाम, विदुषक, गझल या कविता म्हणजे आजूबाजूच्या क्रूर भगभगीत वास्तवावर, त्यातील सर्व कुरूपतेवर केलेले प्रहार होते. त्यांच्या या उपहास अन् उपरोधगर्भ संताप – कविता, त्यांच्या वात्रटिका आणि पुढे त्यांनी मराठीत जन्मास घातलेला बोलगाणी हा रसिकप्रिय काव्यप्रकार म्हणजे पाडगावकरांनी जीवनातील सर्व अमंगलांवर ओढलेले कोरडेच होते. पण या सगळ्यामागे होती ती त्यांची सौंदर्यासक्तीच. आज रसिकांच्या मनात घर करून आहेत ते हेच पाडगावकर. जगणं सुंदर आहे म्हणणारे पाडगावकर.
मातीच्या ओल्या ओल्या वासात,
वाऱ्याच्या खोल खोल श्वासात
झाडांचं भिजणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा, जगणं सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं सुंदर आहे!
पाडगावकरांच्या त्या मोठ्या वाटोळ्या डोळ्यांत हे सौंदर्य टिपण्याची खास ‘लेन्स’ होती. त्यामुळे तरुणपणी, विद्यार्थीदशेत आणि पुढे लग्न झाल्यानंतरही गिरगावातील शांताराम चाळीत ओढगस्तीचे आयुष्य कंठत असतानाही त्यांचे मन सुकले नाही. या चाळीत ते आपल्या आई-वडिलांसोबत राहायचे. विल्सन महाविद्यालयात शिकत होते तेव्हा, त्यांची आणि यशोदाबाईंची भेट झाली. यशोदाबाई या ख्रिश्चन; पण जात-धर्म-धन हे आड येत असेल तर ते प्रेम कसले? तेव्हाच्या पाडगावकरांबद्दल यशोदाबाईंनी लिहिलंय –
‘आमच्या क्लासरुमच्या मागच्या बाजूला हॉस्टेलची गॅलरी दिसायची. कधी तरी स्वतःत मग्न असलेला मंगेश तिथं सिगरेट ओढत स्वस्थपणे फिरताना वर्गातून दिसायचा. रंग गोरापान, मोठे व किंचित बाहेर आलेले डोळे, अशक्त व नाजूक शरीर, दाढी वाढवून, मानेपर्यंत लांब उलटे फिरवलेले काळेभोर केस, हनुवटीबरोबर कापलेली बलगॅनिन टाईप दाढी, पांढरा झब्बा आणि खूपच मोठ्या बॉटमचा पांढरा लेंगा. हा अवतार पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. नंतर कळलं की तो कवी आहे. सिंधू (यशोदाबाईंची चुलत बहीण) त्याला ए कवी म्हणून हाक मारायची. एकुण पात्र जरा विनोदीच दिसायचं…’
या विनोदी पात्राच्या प्रेमात यशोदाबाई पडल्या. त्यांच्या घरच्यांचा विरोध होता लग्नाला. पण कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या मध्यस्थीने त्यांनी पळून जाऊन पाडगावकरांशी लग्न केले. त्यानंतरचा बराच काळ त्यांचे वास्तव्य चाळीतील याच घरात होते. पाडगावकर तेव्हा नोकरी करत नसत. त्यांच्या वडिलांच्या पालिकेतील नोकरीच्या जोरावर कुटुंब चालत असे. परिस्थिती हलाखीची होती.
माझ्या घरात भिक्षा मी मागणार नाही
समजून घे तुझे तू, मा सांगणार नाही
हा तेव्हाचा पाडगावकरांचा बाणा. कवी आपल्याच कवितेत मग्न. पण त्यांच्या आजूबाजूला काय चाललेय हे दिसत नव्हते अशातला भाग नाही.
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
ही त्यांची कविता यशोदाबाईंच्या कष्टाची, वेदनेची कहाणीच जणू सांगते. संसाराची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर पाडगावकरांनी शिक्षण पूर्ण करून नोकरी पत्करली. पुढे ते शीव येथे ‘साईप्रसाद’ इमारतीत राहायला गेले. कवितेचे मूळ शोधू नये म्हणतात. कारण कविता नंतर कवीची राहत नसते. ती वाचणाऱ्या प्रत्येकाची होऊन जात असते. तरिही पाडगावकरांच्या अनेक कवितांची बाजू, मुळे गिरगावातील या चाळीतील वास्तव्यात आहे हे नक्की. अखेर या चाळीत राहत असताना तर या कवीला त्याची प्रेयसी, सखी गवसली होती….
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)