डॉ. जितेंद्र आव्हाड
“उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही डोक्यात राख घालून घेतलीय,
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही वेडानं पछाडलो आहोत,
खरंच आम्ही वेडे आहोत,
आणि आम्ही स्वतःहून डोक्यात राख घालून घेतलीय
कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे…!”
आमच्या मनाचा कल हा मानवाच्या सर्वंकष मुक्तीचा आहे, असे सांगणारे नामदेव ढसाळ. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांना’ हाकारीत ‘अंधारयात्रीक’ होण्याचे नाकारणारे नामदेव ढसाळ. दलित पँथर निर्मून लढणारे नामदेव ढसाळ. कार्यकर्ते, नेते, खासदार आणि त्याहून अधिक म्हणजे थोर विद्रोही कवी ढसाळ.
ते मुळचे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातले. लहानपणीच चौथीत असताना ते वडिलांसोबत मुंबईला आले. त्यांचे वास्तव्य होते कामाठीपुरा या मुंबईतील ‘अमंगल’ मानल्या गेलेल्या वस्तीतले या “गोलपीठ्यातले.”वडील एका खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करीत असत. ढसाळ येथेच शिकले, मोठे झाले, कवी झाले.
वयाच्या १७-१८ व्या वर्षापासूनच कवितेचा छंद जडला त्यांना. आजूबाजूला अभावग्रस्त, सांस्कृतिक-दारिद्र्याचे जगणे होते. पांढरपेशा स्वप्नांनाही कधी शिवले नसेल, असे वातावरण होते. हा मुंबईचाच एक भाग. पण नाटककार विजय तेंडुलकर यांच्या शब्दांत सांगायचा, तर – “पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशी हिशेबांनी नो मॅन्स लॅंड – निर्मनुष्य प्रदेश – जेथून सुरू होतो”, तो हा भाग. ते सारे गोलपीठा नावाने ओळखले जाणारे जग त्यांच्या कवितांच्या पायाशी होते. त्या कवितेतला विद्रोह ही त्या जगाची संतती होती.
१९७२ मध्ये त्यांचा ‘गोलपीठा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातील धगधगीत, नग्नरांगड्या वास्तवाने सारस्वतांचे विश्व झणाणून गेले. या कवितेची भाषा, शैली, रग हे सारेच पांढरपेशा अभिरुचीसाठी नवे होते. ‘गोलपीठा’नंतर पुढे खेळ, मुर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले, प्रियदर्शिनी, तुही यत्ता कंची, गांडू बगीचा अशा संग्रहातून ही कविता समाजमनात स्फोट घडवत राहिली. एकंदर १२ कवितासंग्रह, दोन कादंबऱ्या व चार लेखसंग्रह, असा या कवीचा ऐवज. त्यातील अनेक कवितांचे हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.
२००७ चा ‘ब्रिटिश कौन्सिल’चा पुरस्कारही त्यांच्या कवितांना लाभला आहे. कामाठीपुरा, तेथील गोलपीठा बिल्डिंग, त्या परिसरातील तुरुंगासारख्या चाळी आणि तेथील देहविक्रीचा व्यवसाय, यातून निर्माण झालेले जग, देश, समाज, न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिकता यांबााबतचे प्रश्न ठसठशीतपणे समोर मांडत ढसाळांची कविता उभी राहिली होती. दलित अत्याचाराने ती पेटून उठलेली होती. ती सर्व समाजाला प्रश्न विचारत होती. त्यांचा मानवमुक्तीचा लढा हे त्या कवितेचेच भौतिक रूप होते. प्रजा समाजवादी पक्षाच्या जवळ ते होतेच. पुढे १९७२ मध्ये त्यांनी राजा ढाले, ज. वि. पवार, भाई संगारे आदी समविचारी मित्रांसमवेत दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना केली. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या ‘ब्लॅक पँथर’च्या धर्तीवरची ही चळवळ. पुढे काही काळ ढसाळ कॉंग्रेसमध्येही गेले. एकदा खेडमधून, एकदा मुंबईतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. १९९० नंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. ९२ साली खासदार झाले. शिवसेनेतही त्यांनी प्रवेश केलेला.
या वादळी व्यक्तीमत्त्वाचे सार्वजनिक आयुष्य तर झंझावाती होतेच; पण खासगी आयुष्यातही कटुत्व, वाद यांच्या वावटळी त्यांना झेलाव्या लागल्या.डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. मायस्थेनिया ग्रेविस, कर्करोग अशा आजारांशी पुढचे ३०-३२ वर्षे ते झगडत राहिले. या थोर कवीच्या जीवनातील संघर्ष काही संपलेला नव्हता. तो संपला त्यांच्या मृत्यूनेच.
शेवटच्या काही वर्षात त्यांची आणि माझी चांगली गट्टी जमली होती कपाळावर चस्मा लावण्याची स्टाईल मी त्यांचीच चोरली.
मुंबईच्या चाळीने जगाला दिलेला हा कवी १५ जानेवारी २०१४ रोजी कालवश झाला.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)