मुक्तपीठ टीम
परदेशात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने २० फेब्रुवारी २०२२ रोजी विमानतळ, बंदरे अशा सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंटवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केल्यानंतर भारतात आलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
मंकीपॉक्स म्हणजे काय?
१. मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे.
२. १९५८ मध्ये संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले.
३. मंकीपॉक्सच्या संसर्गाची पहिली घटना १९७० मध्ये नोंदवली गेली.
४. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात आढळतो आणि अधूनमधून उर्वरित प्रदेशात पोहोचतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, मंकीपॉक्सची लक्षणं सामान्यतः ताप, पुरळ येणे आणि गाठीसह आढळतात. याची लक्षणे सहसा दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसतात, जी स्वतःच निघून जातात. प्रकरणे गंभीर देखील असू शकतात. अलीकडच्या काळात, मृत्यूचे प्रमाण सुमारे ३ ते ६ टक्के आहे, परंतु ते १० टक्क्यांपर्यंत जास्त असू शकते. संसर्गाच्या सध्याच्या प्रसारादरम्यान मृत्यूचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘जिथे विशिष्ट लक्षणे आढळतात अशाच प्रकरणातील नमुने एनआयव्हीला पाठवले जातात. आजारी प्रवाशांचे नमुने पाठवले
जाणार नाहीत. केंद्राने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांना युरोप आणि इतरत्र आढळलेल्या मंकीपॉक्स प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
आफ्रिकेमध्ये संसर्ग पसरलेल्या मंकीपॉक्स विषाणूचा, आता युरोपमध्ये प्रसार होत आहे आणि स्पेनमध्ये गुरुवारी सात प्रकरणांची पुष्टी झाली, तर पोर्तुगालची संख्या १४ वर पोहोचली. स्पेनमध्ये आतापर्यंत नोंदलेली सर्व प्रकरणे राजधानी मॅड्रिडमधील आहेत आणि सर्व संक्रमित पुरुष आहेत. मंकीपॉक्सचा संसर्ग अगदी जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. तसेच, मंकीपॉक्सचा धोका असलेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा चादरी वापरून संसर्ग पसरू शकतो.