मुक्तपीठ टीम
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावचे शेतकरी तुकाराम दातीर आणि त्यांच्या पत्नी अलका यांची नावे सध्या परिसरात चर्चेत आहेत. या शेतकरी दाम्पत्याने परिस्थितीपुढे हार न मानता तोट्याच्या शेतीला फायद्यात बदलून दाखवले आहे. त्यांनी त्यासाठी निवडला तो वेगळा मार्ग. नेहमीचा पारंपारिक शेतीऐवजी गाजराची शेती सुरु केली. परिश्रमाला वेगळेपणाची साथ दिल्याने अल्पावधीतच त्यांना फायदा मिळवता आला.
तुकाराम दातीर हे गणोरे गावातील अल्पभूधारक शेतकरी आहेत . त्यांची गावात वडिलोपार्जित सुमारे २ एकर निमबागायती- कोरडवाहू शेती आहे. तोच त्यांचा जीवन चरितार्थ चालवण्याचा आधार आहे. गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे तेही पारंपरिक शेती करत होते. परंतु पारंपारिक शेतीतून येणारे उत्पन्न हे शाश्वत नसल्याने व उत्पादन खर्च डोईजड होत असताना शेतीवर कुटुंब चालवणे त्यांना अवघड जाऊ लागले. त्यातूनच शेती लहरी पावसावर अवलंबून असल्याने मिळणारे उत्पन्न फारसे नसायचे. त्यातून कुटुंबाचा खर्च व मुलांचे शिक्षण यांचा ताळमेळ बसवणे अवघड जाऊ लागले. त्यावर पर्याय म्हणून गेली ५ वर्ष त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर राबवला आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला आहे.
दातीरांची गाजराची शेती
• तुकाराम दातीर व अर्धांगिनी सौ .अलका या दाम्पत्य गाजर शेती या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
• गेली ३९ वर्षांपासून शेती व्यवसाय करतात
• यापूर्वी ते पारंपरिक पिके बाजरी, मका, गहू, हरभरा, इत्यादी घेत असत.
• या पिकांना मिळणारा बाजार भाव व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ दिवसेंदिवस बसवणे त्यांना अवघड जाऊ लागले.
• त्यातून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय तपासायला सुरुवात केली पूर्वीपासून परिसरातील गावांमध्ये गावठी गाजराची शेती काही प्रमाणात केली जायची. बाजारात मागणी असलेली गाजराचे बियाणे त्यांनी स्थानिक कृषी केंद्रातून उपलब्ध करून घेतले.
• शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न आणि गाजराच्या पाल्यापासून दुधाळ जनावरांना मिळणारा चारा हा दुहेरी फायदा त्यांना आकर्षित करून गेला.
• त्यानंतर त्यांनी गाजर शेतीसाठी दरवर्षी २० गुंठे क्षेत्र ठेवण्याचे ठरवले.
• त्यानुसार त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर सर्वप्रथम वर्ष १९९० मध्ये राबवला.
• त्यावर्षी त्यांना गाजराला बऱ्यापैकी भाव मिळाला व खर्च वजा जाता एकरी २०००० रु. उत्पन्न मिळाले.
• त्यानंतर त्यांनी गाजराची साथ सोडली नाही.
चालू हंगामातही त्यांनी गाजराची शेती २० गुंठे क्षेत्रावर फुलवली आहे. गाजराचा मधूबन हा ज्ञान संस्थेचा अहमदाबाद येथील वाण त्यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी पेरणी केला आहे.
दातीरांच्या गाजर शेतीच्या यशाचं सूत्र
• एकरी सुमारे दोन किलो बियाणे याप्रमाणे त्यांनी पेरणी केले आहे.
• अत्यंत कमी खर्चात कमी भांडवलात येणारे हे पीक असून त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या जमिनीवर घरचेच शेणखत दोन ट्रॉली पसरवून दिले.
• त्यानंतर एक फुटाची सरी पाडून फोकून पद्धतीने त्यावर बियाण्याची पेरणी केली.
• पेरणीनंतर पिकाला वेळोवेळी पाणी देणे तर नियंत्रण इत्यादी कामे लक्षपूर्वक पूर्ण केली.
• सुमारे ३ महिन्यांच्या कालावधीनंतर गाजर पीक काढणीस तयार झाले आहे
• त्यातून त्यांना एकरी खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
• गेल्यावर्षी याच हंगामामध्ये काढलेल्या गाजरांना सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना झाले होते.
• शेतीला जोडधंदा दुग्ध उत्पादनाचा असल्याने त्यासाठी लागणारा चारा त्यांना गाजर पिकातून मिळतो.
• त्यांच्याकडे दुधाळ गाई आहेत. गाजर पिकाचा वरचा भाग चारा म्हणून वापरला जातो.
• चारा अत्यंत पौष्टिक असून त्यामधून मिळणारे जीवनसत्व व खनिज दूध उत्पादनात वाढ घडवून आणतात असा त्यांचा अनुभव आहे.
• त्यानुसार त्यांनी गाजराचा पाला चारा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यातून दुधाची प्रत व उत्पन्न वाढले आहे.
गाजर हे जमिनीखाली वाढणारे पीक असल्याने जमीन भुसभुशीत व भरपूर सेंद्रिय पदार्थ युक्त असली पाहिजे . त्याप्रमाणे काळजी घेतल्याने गाजराची लांबी सुमारे एक फुटापर्यंत झालेले आहे .चवीला अत्यंत गोड असलेले हे गाजर आकाराने मोठे असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तुकाराम दातीर यांनी केलेला प्रयोग परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बघून जात आहेत . सर्वत्र गाजर शेतीची जोरदार चर्चा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गाजराच्या शेतीने आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते हेच या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. शेतकरी परिस्थितीने कितीही गांजला तरी प्रयोग करायचे सोडत नाही व परिस्थितीवर मात करून खंबीरपणे उभा राहतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
अकोले तालुका आणि शेतीची तऱ्हा
• अकोला तालुका तसा दुर्गम आणि निसर्गाचे अनेक रूपे लाभलेला तालुका आहे.
• एका टोकाला तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो तर दुसऱ्या टोकाला ५०० मिलिमीटर पाऊस पडतो
• शेतीचे विविध प्रकार पॅटर्न या तालुक्यात आहेत.
• एकीकडे भात पिकवणारा तालुका ही ओळख
• दुसऱ्या बाजूला बाजरीसारखी कोरडवाहू पिकेसुद्धा याच तालुक्यात घेतली जातात.
• पारंपारिक पिकांमुळे व लहरी हवामान व पर्जन्यमान यामुळे शेतकरी नेहमीच मेटाकुटीला येत असतो.
• त्यामुळेच तुकाराम दातीरांसारखे वेगळे प्रयोग महत्वाचे ठरतात.
पाहा व्हिडीओ: