मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या संकटात कधी नाही तेवढं ऑक्सिजनचं महत्व सामान्यातील सामान्यांनाही कळलं. ऑक्सिजनअभावी अनेकांनी पैसे असूनही प्राण गमावल्यामुळे ऑक्सिजन देणे हे सर्वात मोठे काम, पुण्य कार्य मानलं जाऊ लागलं. मात्र, त्याचवेळी नैसर्गिकरीत्या ऑक्सिजन पुरवठा करणारे मध्यप्रदेशातील एक दोन लाखांपेक्षाही जास्त झाडे असलेले जंगल धोक्यात आलं आहे. या झाडांसह अमूल्य अशी वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या जंगलाची मध्यप्रदेशातील भलीमोठी जागा हिऱ्यांच्या खाणींसाठी आदित्य बिर्ला ग्रुपला देण्याच्या सरकारी निर्णयामुळे तसे घडणार आहे.
बुंदेलखंडातील स्थानिकांनी सामाजिक संघटनांच्या मदतीनं आंदोलनाला सुरुवातही केली आहे, पण कोणीही त्यांना दाद देत नाही. आता त्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे. स्थानिकांनी आपल्या जंगलाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. पण त्यांना दाद मिळत नसल्याने त्यांची आता आस फक्त न्यायालयाकडून मिळू शकणाऱ्या दिलाशावरच आहे.
बक्सवाहा जंगलाचं अस्तित्व धोक्यात
- मध्यप्रदेशातील बुंदेलखंड विभागात बक्सवाहा जंगल आहे.
- या जंगलात हिऱ्याची खाण सापडल्याने मध्य प्रदेश सरकारने आदित्य बिर्ला ग्रुपला २.१५ लाख वृक्षांच्या कत्तलीची परवानगी दिली आहे.
- सध्या हे प्रकरण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात विचाराधीन आहे.
- या प्रकरणी स्थानिकांनी सर्वोच्च न्यायालयात आम्ही PIL दाखल केली आहे.
- ज्यावर १ जुलै रोजी सुनावणी आहे.
This is the beautiful place that has to be taken out of the barren diamond. In which about 2 lakh 15 thousand trees are to be cut. It is unfortunate that the forest will be cut down, along with it thousands of animals living in the forest. #SaveBuxwahaForest pic.twitter.com/UT6SclEzZs
— Tribal Army (@TribalArmy) June 15, 2021
बक्सवाहाच्या निसर्ग वैभवावर नजर?
- छतपूर जिल्ह्यातल्या बक्सवाहामध्ये हिऱ्याची खाण आहे.
- या ठिकाणी जवळपास ३.४२ कोटी कॅरेटचे हिरे सापडू शकतात.
- या हिऱ्यांची किंमत जवळपास हजारो कोटींच्या घरात आहे.
- आदित्य बिर्ला कंपनीने हिऱ्याच्या खाणीतल्या उत्खनामध्ये रुची दाखवली आहे.
- आदित्य बिर्ला कंपनीकडून जवळपास ३८२ हेक्टर जमिनीची मागणी करण्यात आली आहे.
- सरकारने कंपनीची ही मागणी पूर्ण केली तर जवळपास सव्वा दोन लाख झाडांची कत्तल होऊ शकते.
काय आहे बक्सवाहा जंगलाचं वैशिष्ट्य?
- जंगलात ५० विविध प्रकारच्या दुर्मिळ झाडांच्या प्रजाती आहेत.
- साग, पिंपळ, तेंदू, जांभूळ, अर्जुन अशा अनेक झाडांच्या प्रजाती याठिकाणी पाहायला मिळतात.
- असंख्य प्राणी पक्षांचा जंगलात अधिवास आहे.
- हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह याच जंगलावर चालतो.
- जंगलात असंख्य जलस्त्रोत आहेत.
- पर्यावरणवादी डॉ. के.एस.तिवारी म्हणतात की जीवन आणि संस्कृतीचा वसा याठिकाणी जोपासला जातो.
- जंगलाची कत्तल झाली तर इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होईल.