मुक्तपीठ टीम
काल गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता वाचवण्यात यश आले. तर, हिमाचलमध्ये कॉंग्रेसने बाजी मारली. यावेळी भाजपने मोठा विक्रम केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, पण हिमाचलमध्ये भाजप प्रथा बदलू शकला नाही आणि सत्तेतून बाहेर पडला. पाच महिन्यांत भाजपच्या हातातून सत्ता गेल्याचे हे दुसरे राज्य आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशाच्या राजकीय नकाशात बराचसा बदल झाला आहे.
आता देशातील १६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. देशातील सुमारे ४९.३ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. त्याचबरोबर काँग्रेसचे आता सहा राज्यांमध्ये वर्चस्व असेल. हिमाचलच्या शपथविधीनंतर तीन राज्यात काँग्रेसचे सरकार असेल. त्याच वेळी, काँग्रेस इतर तीन राज्यांमध्ये आघाडीचा भाग आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी २६ टक्के लोक या राज्यांमध्ये राहतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सत्तेत आल्यानंतर देशात किती राज्यात भाजपचे सरकार होते?
- मोदी सत्तेवर आले तेव्हा सात राज्यात भाजपचे सरकार होते.
- मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले.
- मोदी सत्तेवर आले तेव्हा देशातील सात राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
- त्यापैकी पाच राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री होते.
- त्याच वेळी, त्यांचा मित्र पक्ष आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये सरकार चालवत होता. देशातील सहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या दोन राज्यांमध्ये राहत होती.
- उर्वरित पाच राज्य छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते.
- देशातील १९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या राज्यांमध्ये राहत होती. म्हणजेच मोदी सत्तेवर आले तेव्हा जवळपास २६ टक्के लोकसंख्येवर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सरकार चालवत होते.
२०१८मध्ये भाजपने शिखर गाठले…
- २०१४मध्ये सात राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
- चार वर्षांनंतर, मार्च २०१८मध्ये, २१ राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
- देशातील सुमारे ७१ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्येच्या बाबतीत भाजपची सत्ता शिखरावर होती.
- त्याचवेळी चार राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या राज्यांमध्ये सात टक्के लोकसंख्या राहत होती.