भरत शिवाजी नागरे
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे मुख्य नगदी पीक म्हणून घेतले जाते. विशेषतः मराठवाडा व विदर्भामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या क्षेत्रावर केली जाते. सन २०१९-२०२० ची महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता ९७१ किलो प्रति हेक्टर इतकी होती. ही उत्पादकता फार कमी आहे. सोयाबीनची सरासरी उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमित पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस व सतत पडणारा पर्जन्यमानामधील खंड ही मुख्य कारणे होय. जर महाराष्ट्राच्या सरासरी उत्पादकतेत वाढ करायची असेल तर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करणे फार गरजेचे आहे.
रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचे फायदे
१) बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली असता सोयाबीन बियाणामध्ये २०-२५ % बचत होते व उत्पादनामध्ये २५-३०% वाढ होते.
२) बीबीएफ तंत्रज्ञान अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना जास्त उपयुक्त ठरते.
३) बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सोयाबीन पिकास मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
४) पिकामध्ये आंतरमशागत करण्यास व ट्रॅक्टरचलित किंवा मनुष्य चलित यंत्राद्वारे कीटकनाशकाची/तणनाशकाची फवारणी करण्यास सोयीस्कर होते.
५) पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते व जास्त पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाणी सरीद्वारे वाहून जाण्यास मदत होते.
६) जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते.
७) सोयाबीन पिकाची पेरणी बीबीएफ यंत्राच्या साह्याने जमिनीच्या उताराच्या विरुद्ध दिशेने केल्यास मूलस्थानी जलसंधारण साधले जाते.
८) सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने केल्यास बियाण्याची उगवण चांगली होते.
लागवड पद्धत
१) योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाणांची खतासह रूंद वरंबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ (रूंद वरंबा सरी) यंत्र विकसित केले आहे. याशिवाय कापुस, तूर, हळद व आले या पिकांची लागवड या पद्धतीने करता येते. रब्बी हंगामात भुईमूग व हरभरा लागवड या यंत्राने करता येते.
२) बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे (६० ते १५० सेंमी.) तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या चार ओळी रुंद वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते.
३) सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पध्दतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
रुंद वरंबे तयार करण्याची पद्धत
१) बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलीत आहे.
२) रुंद वरंबा सरी यंत्रामध्ये ३० ते ४५ सेंमी अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सेंमी रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते २०० सेंमी अंतरावर कमी जास्त करता येणारे दोन सरीचे फाळ आहेत.
३) यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सेंमी ते १६५ सेंमी रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सेंमी अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात.
४) तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राच्या सहाय्याने बियाणे व खते पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी-जास्त करता येते. हेक्टरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते.
५) एका रुंद वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी घेता येतात. यासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी ठेवावे, बीबीएफ यंत्राच्या फणांतील अंतर त्यानुसार कमी-जास्त करावे. त्यानुसार आवश्यक रुंद वरंबे तयार होण्यासाठी ठराविक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळात आवश्यक अंतर ठेवावे) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या (आवश्यकतेनुसार) ३० ते ४५ सेंमी रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी जास्त रुंदीच्या ठेवता येतात.
६) ट्रॅक्टरचलीत बीबीएफ यंत्र आंतरमशागतीसाठी वापरता येते. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागतीसाठी व तण नियंत्रणासाठी V आकाराची पास बसवता येते. हे फण पिकाच्या दोन ओळींच्यामध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते. या शिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते. जेव्हा एका वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी (३० सेंमी अंतर) घ्यावयाच्या असतील तेव्हा सरी घेण्यासाठीच्या खुणा १५० सेंमी (१.५ मी) अंतरावर ठेवून (म्हणजेच दोन फाळातील अंतर १५० सेंमी ठेवावे) ट्रॅक्टरचलीत बीबीएफ यंत्र (फाळाचा मध्य खुणेवर घेऊन) चालवावे. यामुळे १३५ सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी ४५ सेंमी अंतरावर घेता येतात. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या ३० सेंमी रुंदीच्या पडतात.
७) कमी ओलाव्याच्या स्थितीत रुंद वरंबा सरी लागवड अवजाराच्या सहाय्याने पेरणी करताना अवजारामध्ये पेरणीमागे मातीने बियाणे झाकण्याच्या दृष्टीने लोखंडी पास, लोखंडी साखळ किंवा लोखंडी दांड्याचा उपयोग करता येतो.
(भरत शिवाजी नागरे हे मंडळ कृषी अधिकारी आहेत. ते सध्या मुक्रमाबाद, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहेत. ट्विटर @BharatNagre6