मुक्तपीठ टीम
“नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्याचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा ) मध्येही हे चित्र पाहायला मिळाले.
हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आदिवासी सांगत होते की, वडिलोपार्जित कसलेल्या जमिनींची मालकी मिळावी, सातबारा नावावर करून मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासोबत शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत मिळाव्यात या मागण्या घेऊन हजारो आदिवासी महिला पुरुष यात्रेत सहभागी झाले होते.
लाल, भगव्या, साड्या, डोक्यावर पदर तर पुरुषांच्या सफेद कपड्यांवर रंगीबेरंगी फेटे असे दृष्य जागोजागी दिसत होते. भारत जोडो यात्रा मार्गावर भारत यात्री गावात रस्त्यावर उभ्या ग्रामस्थांशी संवाद साधत जात होते. गॅस किती महाग झाला, तुमच्या मुलांना नोकऱ्या आहेत का ? असे प्रश्न विचारत, त्यांना भारत जोडोचा अर्थ समजावून सांगताना दिसत होते.
वडशिंगी येथे सुमारे अर्धा किलोमीटर झेंडूची फुले अंथरून गालिचा बनविला होता. तर रस्त्याच्या बाजूला गावातील प्रमुख महिला हिरव्या साड्या व डोक्यावर भगवा फेटा नेसून, हातात निरंजन आणि फुले घेऊन राहुलजींच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. एका महिलेने सुपात सोयाबीन धान्य घेतले होते. “हे सोयाबीन राहुलजींना देण्यासाठी आहे. आमच्या सोयाबीनला चांगला दर मिळत नाही. पीक बुडाले तरी भरपाई मिळालेली नाही. ते आम्ही राहुलजींना सांगणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या महाराष्ट्रातील चौदाव्या व शेवटच्या दिवशी यात्रा सकाळी सहाला भेंडवळ येथून सुरू झाली आणि दहा वाजता जळगाव (जामोद) येथे पोहोचली. जामोद येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला जमल्या होत्या. दुपारच्या जेवणानंतर आदिवासी महिलांचा एक भव्य मेळावा झाला. महाराष्ट्रात लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहून अनेक भारत यात्रींनी समाधान व्यक्त केले. यात्रेचा उद्देश सफल होत असल्याचे एम. ए. सालम यांनी सांगितले. ते केरळ सेवा दलाचे प्रमुख आहेत. संध्याकाळी यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गेली. पुढे ही यात्रा बुऱ्हाणपूर या मध्य प्रदेशातील शहराच्या वेशीवर दाखल होईल.