मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथे मरगाई देवीची यात्रा भरते. या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेवून त्राटकीची सोंगे सादर केली जातात. रावणाची बहिण ‘त्राटिका’ आणि तिच्या राज्यकारभाराविषयीचे सोंग हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. अशा प्रकारच्या त्राटिका सोंगांचा कार्यक्रम संपूर्ण देशात केवळ बेडग या गावीच होतो. गेल्या २०० वर्षा पासून ही यात्रा येथे भरत असते.
मिरज तालुक्यातील बेडग हे वीस हजार लोकवस्तीचे गाव. या गावातील ग्रामदैवत मरगाई देवीची दरवर्षी यात्रा भरवली जाते. गुढीपाडव्या नंतर ही यात्रा असते. गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्या नंतर गावात दळण – कांडप बंद करण्याची परंपरा आहे. देवीची पालखी निघाल्यानंतरच दळण कांडपास सुरुवात होते. अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथील यात्रेसाठी येतात. यायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘त्राटिकेची सोंगे’ हे आहे. हे त्राटिकेचे सोंग महाराष्ट्रासह देशात कुठेही पाहायला मिळत नाही.
रामायणाच्या काळात नाशिकपासून सांगली जिल्ह्यातील दंडोबा या परिसरात दंडकारण्य होते, अशी आख्यायिका आहे. या भागात रावणाची बहिण त्राटिकेचे राज्य होते. अशी आख्यायिका येथील जाणकार सांगतात. तिच्या राज्य कारभाराविषयीचे वर्णन ‘त्राटिकेचे सोंगे’ या कार्यक्रमाद्वारे सादर केले जाते. तेव्हा युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे किंवा इतर प्राणीही सोंगांच्या रुपात दाखवले जातात. त्या काळातील कथा जिवंत केली जाते. ही सोंग सादर करण्यासाठी १२ बलुतेदार सहभागी असतात.
त्राटिकाचे सोंग घेणाऱ्या कलावंताला त्राटिकेचा मुखवटा लावला जातो. हा मुखवटा आकर्षक आणि आतिशय सुबक आहे. ४ ते ५ फुट मरगलवर असणार्या त्राटिकेची उंची २५ फूट इतकी असते. तिची वेशभूषा आक्राळ विक्राळ असते. मोठा मोर पिसारा, मोठे तोंड, १२ साड्या नेसलेली त्राटिका. त्राटिका आपल्या दरबारी असणाऱ्या पंतप्रधान, सेनापती, घोडेस्वार, काळीचूर, बनीचर, मोर यांच्यासह फिरते. सैनिक घेऊन चौका चौकात दरबार भरवला जातो. रात्री दहा वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरु केला जातो. हलगीच्या तालावर हा कार्यक्रम चालतो. त्राटिका काळ्या वेशातील सैनिकांना आपल्या राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न विचारते..सैनिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.
पाहा व्हिडीओ :